"राजनैतिक प्रक्रियेविना कलाकारांची भूमिका अपूर्ण"
- सोशल मीडियावर राजकीय पोस्ट टाकल्याने किरण माने यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप होतो आहे. किरण माने यांच्या समर्थनार्थ एकाही कलाकाराने भूमिका मांडलेली नाही. या वादावरुन कलाकारांनी राजकीय भूमिका मांडावी की नाही, असा वादही निर्माण झाला आहे. यासर्व पार्श्वभूमीवर कलाकार आणि राजकीय भूमिकेबद्दलचे चिंतन मांडले आहे रंगकर्मी सायली पावसकर यांनी...
2015 साली "अनहद नाद - अनहर्ड साउंडस् ऑफ युनिव्हर्स" रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटकाची सुरुवात आम्ही केली होती तेव्हा या नाटकाने कलाकाराच्या अस्तित्वाच्या लढाईचा बिगुल फुंकला. कलाकार आणि कलाजगताची आव्हाने या संदर्भात मोठी भूमिका घेतली होती या नाटकाने… ती भूमिका घेण्यामागे प्रबळ हेतू हा होता की कलाकार हे कोणाच्याही हातचे कठपुतली नाही आहेत आणि कला उत्पाद ( जी आता प्रॉडक्टायजेशनचे शिकार आहेत.) नाही आहे. कला माणसाला माणूस करते आणि समाजासमोर सत्याच्या सत्वाला प्रखरतेने मांडते.
मुळात कला विद्रोह आहे आणि कलाकार विद्रोही! कलाकाराने कलेच्या या पक्षाला समजायला हवे. कारण कलेची व्याप्ती समग्र आहे. त्यामुळे राजनैतिक प्रक्रियेला वगळून कलाकाराची भूमिका असू शकत नाही आणि कोणतेही कलाकार असे स्टेटमेंट देतात की "आपण भले आपले काम भले, माझे राजकारणाशी काही घेणं देणं नाही" तेव्हा त्यांनी हे समजावे की त्यांना देखील सत्तेची - व्यवस्थेची लाथ कधी ना कधी पडणार आहे.
हे म्हणण्याचे वा मांडण्याचे धाडस मला माझ्या रंगकर्मंच्या प्रतिबद्धतेने आणि कलेप्रति असणाऱ्या विश्वासाने दिले आहे. मी थिएटरमध्ये करियर करणार हे जेव्हा ठरवले तेव्हा माझ्या हे गावी देखील नव्हते की कलाकाराची वैचारिक भूमिका असते किंवा कलाकार हा समाजाप्रती बांधील असतो.
मी तर असे पाहिले की या आपले काम करा, पाकीट घ्या आणि निघा... पुन्हा नव्या कामाचा शोध घ्या ! म्हणजे एकप्रकारची वेठबिगारी होती ही, आणि त्याला प्रोफेशनलिसम म्हणण्यात धन्यता मानतात काही कलाकार. मुळात कमर्शियल किंवा प्रोफेशनल These are Jargons only !
So called कलाजगतात कलाकाराचे जगणे वरवर चकचकाटीचे असते आणि आत तेवढ्याच अंधकाराचे असते हे आपल्याला ठाऊक आहे..!
ज्यांच्या जीवनाचे लक्ष्य केवळ पोट भरणे हे आहे,ते जगात कुठेही पहा निव्वळ पोट भरण्याच्या चक्रात अडकलेले असतात. ते पोट भरण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात. पोटाच्या वर आपल्याला मेंदू आहे त्यात विचार करण्याची क्षमता आहे याची जाणीव त्यांना नसते. या पोटापाण्याच्या प्रश्नापासून हे असे कलाकार सुटलेले नाहीत. ते कलेच्या नावावर फक्त प्रदर्शन करतात,कलासत्व ,विचार किंवा राजकीय भूमिका याच्याशी त्यांची नाळच जोडलेली नसते. त्यामुळे मला कोणीतरी निर्माता किंवा मीडिया हाऊस काम देईल या जंजाळात अडकुन ते आपला आवाज ऐकणे बंद करतात.
मुळात कलाकार ते जे काळाला आकार देतात, आपल्या सृजशीलतेने नवा काळ रचतात.
स्वत:ला जिवंत ठेवून, संपूर्ण विश्वाला समग्रतेने जगणे म्हणजे कलाकार असणे!
समाजात घडत असणाऱ्या प्रत्येक घटनेचा, गोष्टीचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतच असतो. सत्तेवर बसलेला एक व्यक्ती काही निर्णय घेतो त्याचा प्रभाव आपल्या रोजच्या जगण्यावर पडतोच, मग एक कलाकार म्हणून यातून आपण अंग कसे काढू शकतो ?उलट एक कलाकार म्हणून आपण या बाबींना , गोष्टींना आपल्या कलेच्या माध्यमातून ठामपणे , निर्भयपणे मांडायला हवे. त्यांना वाचा फोडायला हवी.
कलेचा अतिशय महत्वाचा पैलू म्हणजे अभिव्यक्ती ! या अभिव्यक्तीच्या उर्मीतून प्रत्येकाला प्रश्न विचारण्यासाठी प्रेरित करायला हवे. ज्याने प्रत्येकात विचार करण्याची चेतना जागृत होईल.
"अनहद नाद - अनहर्ड साउंडस् ऑफ युनिव्हर्स" या नाटकाने रंगभूमीला दिशा दिली. रंगभूमी, रंगकर्मी आणि वैचारिक नाटकासाठी प्रतिबद्ध प्रेक्षक घडवले.
कलाकाराच्या आत असलेल्या या अस्वस्थतेचा शोध घेतला. त्याला सकारात्मक दिशा दिली. या नाटकाच्या प्रक्रियेत कला एक सिद्धी-साधना ही आग आम्हा कलाकारात निर्माण झाली. या साधनेच्या आणि वैचारिकतेच्या बळावर 300 रु पाकीट घेणारी एक कलाकार ते स्वतःचं रंगकर्म निर्माण करणारी, स्वामित्व गाठणारी रंगकर्मी हा पल्ला गाठला. आम्ही कलात्मक उनमुक्ततेचे सूत्र साध्य केले . त्याचे फलित आज आपल्या समोर आहे.
मराठी रंगभूमीवर वैचारिक प्रगतीशीलतेचा वारसा जगणारे व पाया मजबूत करणारे रंगकर्मी म्हणून आम्ही घडलो.कलाकाराने निस्सीमपणे त्याचे कार्य करणे महत्वाचे. आपण कलाकार म्हणून योग्य आहोत सोबत राजनैतिक भूमिका ही ठाम आहे तेव्हा कोणीही आपलं काही वाकडं करू शकणार नाही.
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिध्दांताच्या प्रक्रियेत आम्ही रंगकर्मींनी आपल्या सृजनशीलतेने पाठीचा मणका ताठ ठेवला आहे तो कोणत्याही सत्तेसमोर वाकणार नाही वा झुकणार नाही ! हो एवढे मात्र नक्की आपल्या कलेच्या प्रतिबद्धतेने सत्तेची पाळंमुळं हलवू शकतो, आणि सत्तेला हलवणे म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या भूमिकेसाठी जागरूक करणे, त्यांच्यात विचार पेटवणे मानवतेला अबाधित ठेवण्यासाठी !
हम हैं !