गांधी नावाचा माणूस आणि मी

Update: 2024-10-02 10:19 GMT

माझ्या सामाजिक कार्याच्या प्रारंभीच्या काळात १९८५ साली कन्याकुमारी ते काश्मीर भारत भ्रमणणात मला गांधी नावाचा प्रभावी माणूस भेटला.‌ गांधी विविध ठिकाणी भेटत गेल्यावर गांधी समजून घेण्यासाठी गांधी सोबत चालत राहिले पाहिजे असे वाटले. १९८८ साली सेवाग्राम आश्रमात समविचारी युवक युवतींना घेऊन गेलो. आजतागायत माझा गांधी नावाचा माणूस समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गांधी नावाचा माणूस मला केवळ कुठल्या आश्रमात किंवा संस्थेत भेटत नाही तर सामान्य लोकांत, पुस्तकात, विविध कार्यक्रमात, राजकारणात, समाजकारणात, चर्चासत्रात, आंदोलनात, बाजारात, सिनेमात, प्रवासात आणि अनेक सार्वजनिक ठिकाणी भेटत राहतो. गांधी सोबत सातत्याने माझा संवाद होत राहतो. संवादासाठी गांधी नावाचा माणूस सहज उपलब्ध असतो. अनेक विषयांवर आमचा संवाद सुरू असतो.

गांधी नावाच्या या माणसाच्या वाट्याला भरपूर प्रेम, आदर आणि स्विकार आला आहे तेवढ्याच प्रमाणात द्वेष, तिरस्कार, नकार देखील आला आहे. गांधी बद्दल सातत्याने उलटसुलट चर्चा सुरू असतात. आजही स्थानिक आणि जागतिक पटलावर गांधी नावाचा माणूस हसत हसत प्रस्थापित आहे. गांधी नावाच्या या माणसाला टाळता येत नाही. गांधी नावाच्या माणसाला समजून घेण्यासाठी गांधीवादी असणे आवश्यक नाही. तसा आग्रह देखील नाही. गांधी कायम आपल्या विरोधात असणाऱ्या लोकांशी देखील संवादी असतो. जगभरातील विविध विषयांवर काम करणाऱ्यांना वैयक्तिक आणि सार्वजनिक स्तरावर गांधी नावाचा माणूस मार्गदर्शक आणि वैचारिक आधार वाटतो.

गांधी नावाच्या या माणसाची त्याच्या समकालीन नेत्यांसोबत तुलना होत राहते आणि तशी तुलना चिकित्सा व्हायला गांधीची हरकत नसते. ती स्वाभाविक गोष्ट आहे. गांधी नावाच्या माणसाने आपल्या समकालीन प्रभावी नेतृत्वावर अन्याय केला अशी चर्चा रंगवून केली जाते पण गांधींच्या प्रभाव काळात देखील अनेक मोठी माणसं समाजात नेतृत्व करत होती. गांधी सोबत काम करणारी माणसं आपापल्या परीने मोठी झालेली दिसतात. कारण गांधी नावाचा माणूस लोकांना वैयक्तिक पातळीवर सक्षम करण्यासाठी कायम कार्यरत आहे. गांधी नावाचा माणूस आपल्या विचार विरोधात असणाऱ्या लोकांशी देखील कायम संवादी असतो. संवाद हे सत्याग्रहाचे मोठे साधन आहे. असहकारात देखील एक संवाद असतो. संवाद तुटला की माणसं तुटतात आणि माणसं तुटली तर मग काय शिल्लक राहणार म्हणून संवाद महत्वाचा आहे .

गांधी नावाच्या माणसाने देखिल अनेक वेळा चुका केल्या आहेत आणि त्या प्रामाणिकपणे तो स्विकारतो ही त्याची महानता आहे. गांधी स्वताच्या आणि कार्याच्या चिकित्सेला भीत नाही निर्भय आहे. गांधीचा भर कर्म करण्यावर आहे कर्मकांडावर नाही. गांधीला मानणारे देखील कर्मकांडात अडकू शकतात हे गांधी नावाच्या माणसाला माहिती आहे. गांधी कुणाला स्वताचे भक्त बनायला सांगत नाही. बुद्धा प्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारे "अत्त दिप भव" म्हणत वैयक्तिक रित्या सक्षम व्हायला शिकवतो. गांधी नावाचा माणूस स्वताच्या महात्मा पणाच्या बाहेर पडून माणूस म्हणून जगतो म्हणून तो सर्वत्र भेटतो.

आज मी गांधी सोबत सेवाग्राम आश्रम परिसरात वर्तमान परिस्थितीवर गप्पा मारत बसलो आहे. आजच्या संवादातून या गांधी नावाच्या माणसाला देखील मनात काही खंत आहे हे जाणवते. सत्तासंघर्ष पेक्षा सहयोग सहकार्य यावर जोर दिला पाहिजे असे गांधी सांगताना जाणवतोय. समाजात परीवर्तन करण्यासाठी कृतीशील व्हा केवळ कार्यक्रमांत अडकून पडू नका असे गांधी सांगतोय. गांधीमार्गावर सक्षमपणे चालण्यासाठी गांधीवादी देखील आज कमी पडत आहे अशी भावना गांधीच्या मनात बळावलेली दिसत आहे. सत्ताधीश कायम आपल्या स्वार्थासाठी लढत असतात. लोकांना लाचार ठेवून आपले हितसंबंध जपण्यासाठी कार्यरत असतात तेव्हा लोकांमधे जाऊन गांधी नावाचा माणूस बनून लढणे अनिवार्य असते. निव्वळ गप्पा मारून प्रतिक्रिया देवून काही होणार नाही तर पुन्हा समाज उभारणी चा लढा सुरू केला पाहिजे असे मत आजच्या आमच्या संवादातून व्यक्त झाले. मी गांधी नावाच्या माणसाला म्हटले. बापू आजही प्रामाणिकपणे स्थानिक ते जागतिक पातळीवर अनेक लोक कार्यरत आहेत काळजी करू नका यावर गांधी नावाचा माणूस परत निरागस हसत चालायला लागला संवादासाठी... मलाही आजच्या संवादातून कार्यरत राहण्याची उर्जा मिळाली मी देखील बाहेर पडलो संवादासाठी...

लोकमित्र संजय काशिनाथ सोनटक्के

संयोजक : सहजीवन मिशन

Tags:    

Similar News