महागाईनं तुमचं बजेट कोलमडलयं का?

टोमॅटोने (Tomato) शंभरी पार केली. अगदी मॅकडोनाल्ड(MacDonald) मध्ये ही टोमॅटो दिला जाणार नाही अशी नोटीस आली. शेतमालाची महागाई नेहमीच गृहिणींची रडा रड सोशल मीडियातील मीम्स आणि सरकारी चिंतेचा विषय दाखवला जातो. महागाईची वस्तुस्थिती आणि सोशल मीडियातून तयार झालेला आपला भ्रम समजून घेण्यासाठी वाचा MaxKisan चे संपादक विजय गायकवाड यांचा डोळ्यात अंजन घालणारा हा लेख..

Update: 2023-07-08 11:13 GMT

टोमॅटो महाग झाल्यानंतर वर्तमानपत्रात रकानेच्या रकाने भरून येत आहेत. टीव्हीवरही लाल भडक बातम्या रंजक पद्धतीने दाखवल्या जात आहेत. समाज माध्यमांमध्ये मिम्सचा महापूर आला आहे. असं का होतं हे होण्यामागे नेमकी काय मानसिकता आहे आणि वस्तुस्थिती नेमकी कशी असते जाणून घेऊयात.

टोमॅटो हे उदाहरण घेतलं असेल तर आपण सर्वप्रथम टोमॅटोच्या वर्षभराच्या हंगामाचा विचार करू. कारण सध्या भाजीपाला बाजार आणि माध्यमांमध्ये चर्चा आहे ती टोमॅटोच्या वाढलेल्या भावाची. अगदी पंधरा दिवसांपुर्वी ५ रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो अचानक ५० रुपयांवर गेला. टोमॅटो ने लगेच शंभरी देखील पार केली. मग लगेच सरकार, माध्यम आणि मार्केटमध्ये टोमॅटो महागल्यानं सामान्यांचं कंबरडं कसं मोडलं, ग्राहकांच अर्थकारण कसं कोलमडलं याची अर्थशास्त्रीय चर्चा सुरु झाली.

यामध्ये नेहमी होणारी गोष्ट पुन्हा एकदा घडली ती म्हणजे टोमॅटो उत्पादक मालामाल…टोमॅटोने शेतकऱ्यांना केले लखपती या मथळ्याखाली बातम्या फिरू लागल्या.

आजही टोमॅटो महागच आहे. पण वर्षभरातील टोमॅटो हंगामांचा विचार करता शेतकऱ्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही हे उघड सत्य तुमच्या नजरेला पडेल त्यासाठी डोळस दृष्टी पाहिजे.

आता वर्षभराचा जर हंगामाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की पहिल्या हंगामात एक किलो टोमॅटोला १० ते १५ रुपये भाव मिळाला. तर दुसऱ्या हंगामातील भाव ५ ते १० रुपये होता. दुसरीकडे एक किलो टोमॅटोचा उत्पादन खर्च सरासरी १३ रुपयांपर्यंत येतो. बाजारात नेऊन विकेपर्यंतचा खर्च पकडल्यास म्हणजेच टोमॅटो बाजारात नेऊन विकेपर्यंत किलोला १६ ते १७ रुपये खर्च येतो. म्हणजेच मागील दोन्ही हंगामात शेतकरी पुरते तोट्यात आले हे उघड सत्य आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा विचार करूनच धंदा केला जातो.

आधीचे दोन्ही हंगाम तोट्यात गेल्याने लागवड कमी झाली. हे उघड आणि नैसर्गिक सत्य आहे हे नाकारून चालणार नाही.

महाराष्ट्र राज्याचा विचार जर केला तर टोमॅटोचे राज्यात मोठे क्षेत्र आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात टोमॅटोची लागवड केली जाते. चालू हंगामात २० जूननंतर टोमॅटो दरात अचानक वाढ झाली.

शेतमाल बाजाराच्या अभ्यासक शेतकरी शिवाजी आवटे यांनी ही भविष्यवाणी आधीच करून ठेवली होती. त्यामागे नैसर्गिक कारणे होती. हे देखील आपण लक्षात घ्यायला पाहिजे.

शिवाजी आवटे म्हणतात,"टोमॅटो बाजार भाव जून ते सप्टेंबर पर्यंत काय असेल या विषयावर 1 जून ला आपण VDO बनवला होता. त्या मध्ये आपण टोमॅटो लागवड करण्यासाठी पुढील तारीख 5 सप्टेंबर ते 5 आक्टोंबर अशी सुचवली आहे सध्या ची परिस्थिती पहाता तिथे लागवडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.

साधारण 2 जुलै 2021 पासून आपण जेव्हा जेव्हा टोमॅटो लागवडीसाठी आदर्श तारखा सुचवल्या होत्या त्या बऱ्यापैकी सक्सेस झाल्या आहेत. सध्याची परिस्थिती पाहता 5 सप्टेंबर ते 5 आक्टोंबर या कालावधीत टोमॅटो लागवड वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण सुचविलेली 5 सप्टेंबर ते 5 आक्टोंबर ही तारीख फ्लॉप ठरू शकते, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

टोमॅटोच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती गठीत करून सूचना मागवल्या आहेत. विशेष म्हणजे या समितीमध्ये मध्ये शेतकरी घटक नाही शेतकरी बांधवांनो विचार करा सरकारच्या दृष्टीने शेतकऱ्यांची किंमत काय आहे”. असा खडा सवाल शिवाजी आवटे यांनी उपस्थित केला आहे.

मॅकडॉनल्डने टोमॅटोचे दर ₹100 च्या पलीकडे गेल्याने परवडत नाही असे सांगत टोमॅटो युक्त पदार्थ देता येणार नाही असं सांगितल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना शेतकरी राजेश वाकचौरे म्हणाले,"ज्यांना परवडत नाही त्यांनी खाऊ नये अन बोंबलु पण नये. आम्ही शेतकरी पिझ्झा बर्गर खातही नाही अन् बोंबलतही नाही "

शेतमाल दरवाढीचा फायदा फक्त 10%टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत. पण शहरवासियांना वाटलं शेतकऱ्यांना तर खुप पैसे मिळतात. दीड दोन महिन्या पूर्वी काय परिस्थिती टोमॅटो ची. कुणी विचार पण करत नव्हतं. आता कांद्याची बारी येणार आहे, असेही वाकचौरे यांनी सांगितले.

अशीच प्रतिक्रियास कृषी विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांनी देत, "बदाम ५५० रु. आणि शेंगदाणे २०० रु. ज्याला जे परवडते त्याने ते खावे. घरचे शेंगदाणे असतील तर बातच वेगळी"

या मानसिकतेवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, शेतकरी समाधान अहिरराव म्हणाले," संकटाच्या काळात शेतकऱ्याचा विचार कोणी करत नाही. खाणाऱ्यांचाच विचार करणारे फुकटे आहेत त्यांची लायकी नाही. शेतकऱ्यांच्या मालाला किंमत द्यायची आता रक्त पिणारे ढेकूण आता बजेट कोलमडला म्हणण्या पेक्षा आपली लायकी काय ते तपासून बोलावे. ज्यांना जेवणासाठी बजेट कोलमडत असेल तर त्यांनी शेती करा स्वतः पिकवा प्रत्येक भाजीपाला मग कळेल कुठून कुठून घाम निघतो ते परवडत नसेल तर नोकरी सोडून घरी या".

बाजारातील आवक कमी झाल्याने दर वाढल्याचे सर्वच शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते एक मुखाने सांगत आहेत.

देशात एप्रिल महिन्यापासून वातावरणात मोठे बदल होत आले. बहुतांशी भागात उष्णतेची लाट होती. याचा फटका भाजीपाला पिकांसह टोमॅटो पिकालाही फटका बसला. जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. याचा चालू हंगामातील उत्पादकतेवर परिणाम झाला. वर्षात अनेक शेतकरी टोमॅटोचे तीन हंगाम घेतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

पण पहिले दोन हंगाम तोट्यातच गेले. त्यामुळे तिसऱ्या हंगामात लागवडी घटल्या, असे नगर जिल्ह्यातील सारोळा अडवाई येथील शेतकरी बी. एन. फंड यांनी सांगितले.

आधीच्या दोन हंगामांमध्ये टोमॅटोला चांगला भाव नव्हता. त्यामुळं हरियाणा, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी टोमॅटोऐवजी बिन्सला पसंती दिली होती. तसच बिपरजाॅय चक्रीवादळामुळे गुजरात, राजस्थान आणि इतर काही भागातील टोमॅटो पिकाचे नुकसान झाले. या सर्व घटकांमुळे बाजारतील आवक २० जूननंतर कमी झाली. यामुळे टोमॅटो दरात मोठी तेजी आली.

टोमॅटो उत्पादक मालामाल झाले की नाही हे ठरवण्यासाठी वर्षभराचा आढावा घ्यावा लागेल. वर्षभराचा विचार करता म्हणजे चालू वर्षातील तीनही टोमॅटो हंगामाचा विचार करता फारसं काही हाती लागलं नाही, असं शेतकरी सांगतात. एकरी सरासरी उत्पादन आणि तिन्ही हंगामात मिळालेल्या भावाचं गणित केलं तर किलोला १७ ते २० रुपये भाव मिळाला. पण हा सरासरी भाव त्याच शेतकऱ्यांचा आहे ज्यांनी चालू हंगामात ५० ते ६० रुपयांनी टोमॅटो विकला. ज्यांनी चालू हंगाम घेतला नाही ते पहिल्या दोन हंगामांमध्ये पुरते देशोधडीला लागले.

शेतकरी वैभव बेलवंकी म्हणाले,"जो स्वतः पिकवतो त्यालाच त्याची किंमत कळते असल्यास 40 टेंपरेचर मध्ये सुद्धा ज्याने टोमॅटो जगवला त्याला त्याची योग्य ती किंमत आता मिळत आहे.30 मे पर्यंत टोमॅटो 120 रुपये कॅरेट होता. त्यावेळी सरकारची डोळे उघडले नाहीत वाटतं. जरा कुठे शेतकऱ्याला दर मिळाला तर लगेच टोमॅटोचे दर वाढले लगेच बोंबाबोंब चालू केली.काही बजेट वगैरे ढासळत नाहीत. नाटके आहेत फक्त, एक किलो खायचे तर अर्धा किलो खावा पण तोंड मिटून गप बसा.

"वर्षभरात टोमॅटो उत्पादकांना मिळलेला भाव आणि उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांच्या हाती विशेष काही लागलं नाही, हे स्पष्ट आहे.

चालू हंगामात बदलते तापमान, गारपीट, पाऊस, पावसाचा खंड याचा मोठा फटका पिकाला बसला. आधीच्या हंगामात एक एकरात ४ हजार क्रेट माल निघाला होता. चालू हंगामात मात्र ८०० क्रेट मिळतील, असं एकंदरीत मार्केटमधील परिस्थिती आहे.

प्रश्न फक्त टोमॅटोचा नाही तर सर्वच शेतमालाचा आहे. कोविड महामारी दरम्यान लॉकडाउन काळात देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असताना देशाला सावरणाऱ्या बळीराजाला आजही दुय्यम वागणूक दिली जात आहे. अल्पकाळासाठी शेतमालाची महागाई झाली असताना इतर वेळी सर्वच भाजीपाला व फळे कवडीमोल भावाने विकला जात आहे.

शेती दोन दशकात खर्चिक झाली आहे की ती करून ठेवली आहे, हा संशोधनाचा विषय आहे. यावर आधारित बाजारपेठ कोट्यवधीची उलाढाल करत आहे. पण शेतकरी दिवसेंदिवस बॅकफूटवर जात आहे. शेतकऱ्यांना दाखवलेले मृगजळ म्हणजे द्राक्षाला औषध मारा, ब्लोअर घ्या, ती व्हरायटी लावा, विशिष्ट ड्रीप वापरा या सर्व तंत्रज्ञानावर जितका खर्च होत आहे त्याच्या एक टक्काही खर्च कोणी हक्काच्या बाजारपेठेसाठी बाजारभाव मिळावा म्हणून करत नाही. हीच परिस्थिती कांदा व इतर भाजीपाला पिकांची आहे.

कोणीही द्राक्ष, कांदा किंवा भाजीपाला यांचे भाव पडले म्हणून रास्ता रोको किंवा रेल्वे रोको केला नाही. याबाबत शेतकरीच गंभीर नसेल तर व्यवस्था कशी बदलणार?साधे निर्यातीचे अनुदान चालू करण्यासाठी कोणी आंदोलन केले नाही, अशी खंत शेतमाल निर्यातदार प्रमोद निर्मळ यांनी व्यक्त केली.

भाव जे कमी झाले ते वाढलेच नाही. आजही अनेक ठिकाणी शेतकरी शेतीत जगातील सर्वात्तम तंत्रज्ञानाचा वापर करतो. ज्याने उत्पादन खर्च अधिक आहे. त्याप्रमाणे बाजारपेठ किंवा बाजारभाव उपलब्ध नसेल तर महाग तंत्रज्ञानाचा वापर करून तयार होणारा शेतमाल किती दिवस कवडीमोल दराने दलालांच्या घशात घालायचा, असा प्रश्न आहे.

महागाई सर्व क्षेत्रांत वाढत असताना शेतीमालाचे भाव मात्र अत्यंत कमी व न परवडणारे आहे. कधी कधी शेतकऱ्याला बाजारपेठेमध्ये स्वतःलाच मालाबरोबर विकून यावे लागते, ही खंत आहे. त्या मुळे उत्पादन खर्च आणि प्रत्यक्षात विक्री, यात मोठी तफावत आहे. हमीभावशिवाय शेतकरी जगूच शकत नाही. इतर उत्पादक त्यांच्या मालाची किंमत ठरवितात; मात्र शेती त्यास अपवाद आहे, असे वडनेरभैरवचे शेतकरी बापूसाहेब पाचोरकर म्हणाले.

महागाईच्या विषयावर नेहमीच शेतमाला अधोरेखित केला जातो, त्यावर बोलताना सह्याद्री ऍग्रो प्रोडूसर कंपनीचे प्रमोद राजे भोसले म्हणाले,

"महागाई वाढवणारे काही ठराविक घटक असतात आणि त्यातील काही घटक सामान्य माणसाला समजतात. ते म्हणजे कर, इंधनाचे दर, कच्च्या मालाचे वाढलेले दर, वाहतुकीचे दर इत्यादी. अमुक वस्तूवर जीएसटी लागला, इंधनाचे भाव वाढल्याने वस्तू महाग झाल्या हे आपण वारंवार ऐकतो. विशेषत: यातील बहुतांश चर्चा व्यापक प्रमाणावर होते ती किरकोळ विक्रीच्या ठिकाणी म्हणजे रिटेल स्टोअर्स किंवा विक्रीच्या पॉईंटला. त्यातही जिथे वस्तू खरेदीविक्रीच्या वेळी घासाघीस (म्हणजे आपले निगोशिएशन) होते, तिथे तो जो कोणी विक्रेता असतो, तो वस्तू महाग का याला वर सांगितल्याप्रमाणे कुठल्यातरी प्रकारामुळे दर वाढले, असे ठोकून सांगत असतो. यामध्ये काही बाबतीत तथ्य असतेही. मात्र फळे-भाजीपाल्याबाबत यात अजिबातच तथ्य नसते. हे थोडेसे अव्यवहार्य वाटेलही. पण आपण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे असेल ते म्हणाले.

राजेभोसले पुढे म्हणाले,दर नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकले. उत्पादन खर्चा एवढाही भाव न मिळाल्याने कांद्याचे टॅक्टर रस्त्यावर ओतून दिले. उलटी पट्टी येण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी मार्केट यार्डातच भाजीपाला टाकून दिला. अशा अनेक बातम्या आपण विविध माध्यमांमध्ये पाहत असतो. मग अशावेळी महागाईवर परिणाम करणारे घटक कुठे जातात? अशावेळी शेतकऱ्यांना माल उत्पादन करायला काहीच खर्च आलेला नसतो का? वस्तुत: शेती उत्पादन घेताना महागाई वाढविणारे घटक शेतकऱ्यांचा करेक्ट कार्यकम करीत असतात. म्हणजे करवाढ, युद्ध, पुरवठा साखळ्या विस्कळीत होणे, इंधन दरवाढ यामुळे महाग झालेल्या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना खरेदी कराव्याच लागतात. मात्र, या खर्चानुसार तो किंमत ठरवू शकत नाही.

मला मुद्दा म्हणजे फळे-भाजीपाला यांच्या किंमतीचा संबंध असतो तो केवळ आणि केवळ मागणी-पुरवठ्याच्या स्थितीवर. ताज्या फळे आणि भाजीपाल्याची आवक किती होते, यावरच हे भाव ठरतात. इथे दुसरा कुठलाही घटक म्हणजे महागाईचा वगैरे काहीही परिणाम करीत नाही. म्हणूनच वरती दिलेल्या टोमॅटो-कांदा फेकण्याचे उदाहरण दिले आहे. देशात किंवा कुठेही महागाईचे चित्र काहीही असू देत, ताज्या फळ-भाजीपाल्याचे दर किती वर-खाली होतात हे आपण वर्षानुवर्ष अनुभवतो आहोत. ग्राहक म्हणूनही आपण त्याचा अनुभव घेत असतो. पाच रूपये किलो कांदा ते ५० रुपये किलो कांदा असे चित्र आपण अनेकवेळा पाहतो. म्हणून ताज्या फळ-भाजीपाल्याला महागाईशी जोडणे व माध्यमे किंवा आंदोलनामध्ये प्रतीकात्मक म्हणून ते वापरणे चुकीचे आणि शेतकऱ्यांवर ते अन्यायकारक देखील आहे.

सारांश एकच आहे. फळे भाजीपाला व बाजारातील दर मागणी-पुरवठ्यावरच असतात. राहतील. मात्र कधीतरी शेतमाल बाजारभाव उसळण्याचा संबंध महागाईशी लावणे अगदी प्रतीकात्मक का होईना चुकीचे आहे. महागाई वाढवणारे विविध घटक आहेत, त्यांच्यामुळे महागाई वाढते असे असंख्य उत्पादने, सेवा असतात. महागाई वाढते, तेव्हा ते दाखविले पाहिजे, असे ते शेवटी म्हणाले.

शेतकऱ्यांपुढे आर्थिक आणि सामाजिक समस्या देखील आहेत.आजघडीला देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचा आकड़ा सर्वाधिक आहे. शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा आणि दुःखद विषय आहे. सरकारने शेतकरी आत्महत्यांचा आकड़ा जाहिर करणारा अहवाल गेल्या दोन वर्षांपासून प्रदर्शित केलेला नाही. शेतमाल योग्य रीतीने मेहनतीने पिकवूनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्यामुळेच शेतकरी आत्महत्या करतात हे वास्तव लपवून ठेवल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील किंवा आत्महत्या थांबतील, असेही नाही. त्यामुळे असे अहवाल लपवून ठेवण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला बाजारभाव मिळेल अशी धोरणे सरकारने राबवली पाहिजेत.

'आमचे प्रश्न वार्षिक ठराविक मदत देऊन सुटणारे नाहीत. आमची अशी मागणीही नाही आणि अशा आर्थिक सहनुभूतिची आम्हाला आवश्यकता नाही. आम्ही आमचा शेतमाल निसर्गाशी दोन हात करून, मेहनतीने, तूटपूंजे भांडवल असूनही त्याचे योग्य व्यवस्थापन करून पिकवत असतो. तुम्ही तुमची शेतकऱ्यांसाठी असलेली धोरणे योग्य रीतीने राबवून आम्हाला आमच्या घामाचे दाम मिळू दया' , असा सूर शेतकऱ्यांमधून उमटला जातो आहे. पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळाला तरच शेतकऱ्यांचा प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल, असे शेतकरी अभिजीत बोरस्ते म्हणाले.

1.

"शेतमाल महागला म्हणून ज्यांच्या जेवणाचे बजेट कोलमडत सेल तर त्यांनी शेती करा स्वतः पिकवा. प्रत्येक भाजीपाला मग कळेल कुठून कुठून घाम निघतो? ते परवडत नसेल तर नोकरी सोडून घरी या".

-समाधान अहिरराव, शेतकरी




 


2

"उत्पादनात पाच पटीने घट झाली. त्यामुळे सध्या भाव जास्त दिसत असला तरी हाती आलेले उत्पादन आणि उत्पादन खर्चाचा विचार करता हंगाम बरोबरीतच जातो की काय असं वाटतं'

- राहूल यादव, टोमॅटो उत्पादक, धुंकवाड, जि. नगर




 


3.

"चालू वर्षातील तीनही टोमॅटो हंगामाचा विचार करता फारसं काही हाती लागलं नाही, एकरी सरासरी उत्पादन आणि तिन्ही हंगामात मिळालेल्या भावाचं गणित केलं तर किलोला १७ ते २० रुपये भाव मिळाला"

- बी. एन फंड, शेतकरी, सारोळा अडवाई, जि. नगर




 


4.

"टोमॅटोचे दर वाढले लगेच बोंबाबोंब चालू केली.काही बजेट वगैरे ढासळत नाहीत. नाटके आहेत .फक्त, एक किलो खायचे तर अर्धा किलो खावा पण तोंड मिटून गप बसा'

- वैभव बेलवंकी, शेतकरी




 


5."कोणीही द्राक्ष, कांदा किंवा भाजीपाला यांचे भाव पडले म्हणून रास्ता रोको किंवा रेल्वे रोको केला नाही. साधे शेतमाल निर्यातीचे अनुदान चालू करण्यासाठी कोणी आंदोलन केले नाही" प्रमोद निर्मळ,शेतमाल निर्यातदार




 


6."MacDonald कंपनी किंमत वाढली म्हणून टोमॅटो चा वापर करणार नाही म्हणते इथं हातावर पोट भरणारे 50 रुपये पावकिलो घेऊ शकतात भिकारी कोण ?"

- शिवाजी आवटे, शेतमाल विश्लेषक




 


Tags:    

Similar News