५० गायींचा मृत्यू आणि गो रक्षकांची गुपचिळी, सुमंगलम कुणाचे..?

गायींच्या मृत्यूनंतर कणेरी मठ चर्चेत आला आहे. निसर्गरम्य ठिकाण ते सनातन वैदिक परंपरेचा पुरस्कार करणाऱ्यांचा अड्डा असा या कणेरी मठाचा प्रवास मांडला आहे पत्रकार सुशील लाड यांनी...;

Update: 2023-02-25 15:30 GMT


कोल्हापूरजवळच्या कणेरी मठावर पंचमहाभूत लोकोत्सवाचे अतिभव्य आयोजन करण्यात आले आहे. २५-३० वर्षांपूर्वी शंकराची भव्य मूर्ती आणि मठाचा विलोभनीय परिसर यामुळे बच्चे कंपनीच्या शालेय सहलींव्यतिरिक्त या भागाकडे कुणी फिरकतही नव्हते. पण गेल्या १०-१५ वर्षात मात्र इथले वातावरण आमूलाग्र बदलून गेले आहे. कणेरी मठावर साकारण्यात आलेली शिल्पसृष्टी, प्राचीन भारतीय परंपरा (?) दर्शविणारे मूर्तिकाम व सिद्धगिरी म्युझियम पाहण्यासाठी अलीकडच्या काळात अलोट गर्दी होत आहे. सशुल्क प्रवेश असला तरी अलीकडच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून कणेरी मठ प्रसिद्धीच्या झोतात आला.

जशी गर्दी वाढू लागली तशी ही गर्दी 'इनकॅश' करण्यासाठी, मठ संस्थानने अनेक उत्पादने तयार करून त्याची विक्री सुरू केली आणि खऱ्या अर्थाने कणेरी मठाच्या अर्थकारणाला गती मिळाली. हळूहळू ज्या उद्देशाने कणेरी मठाची स्थापना झाली तो विचार मागे पडून, अर्थकारणाला बळ देण्यासाठी सनातनी - वैदिक धर्मपरंपरेचा प्रसार या मठाच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर होऊ लागला. त्याचेच भव्य मूर्तरूप म्हणजेच सध्या आयोजित करण्यात आलेला पंचमहाभूत लोकोत्सव..!




 

प्राचीन भारतीय परंपरा असा ज्यावेळी आपण सतत उल्लेख करतो, त्यावेळी आपण हे लक्षात घायला हवे की प्राचीन भारतीय परंपरा ही केवळ सनातनी, वैदिक परंपरा नव्हती.. तर बौद्ध, जैन, लिंगायत, वारकरी अशा कितीतरी अनेक परंपरा भारतात राहिल्या आहेत, विस्तारल्या आहेत, बळकट झाल्या आहेत आणि आजही अस्तित्वात आहेत. विशेष म्हणजे या परंपरांनी सनातन वैदिक धर्म परंपरेतील शोषणव्यवस्थेला नाकारत, चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या या सनातन वैदिक परंपरेवर कठोर प्रहार केले आहेत. यापैकीच एक श्री बसवेश्वर यांच्या लिंगायत परंपरेशी नाते सांगत स्थापन झालेला हा कणेरी मठ आहे, हे विशेषकरून आपल्याला लक्षात घायला हवे. म्हणूनच शंकराची भव्य मूर्ती आणि तिची साधना करणारा हा निसर्गरम्य मठ, एवढेच अस्तित्व असलेले हा मठ आता सनातन वैदिक परंपरेचा पुरस्कार करणाऱ्यांचा अड्डा बनला आहे, असे खेदाने म्हणावे लागेल..

भारतीय प्राचीन परंपरा म्हणजे सनातन वैदिक परंपरा हे रुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न सिद्धगिरी म्युझियमच्या माध्यमातून करण्यात आल्याचे जाणकारांना सहज लक्षात येईल. ग्रामीण जीवन या नावाखाली तिथे स्थापन केलेल्या मूर्त्यांमधून थोर प्राचीन भारतीय परंपरेत चातुर्वर्ण्य व्यवस्था कशी होती आणि ती कशी आदर्श होती, हे बिंबविण्याचा प्रयत्न अगदी पध्दतशीरपणे या म्युझियमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. याचीच व्यापक आवृत्ती सध्या आयोजित लोकोत्सवाच्या रूपाने पुढे आली गेली आहे. या लोकोत्सवाच्या निमित्ताने पंचमहाभूतांच्या आडून सनातन वैदिक परंपरा लाखो लोकांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न, या परंपरेला विरोध करणाऱ्या बसवविचारांच्या कणेरी मठाच्या सध्याच्या मठाधिपतींकडून होणे, हे निश्चितच दुर्दैवी म्हणायला हवे.

याठिकाणी अतिभव्य अशा स्वरूपाच्या एकेका मंडपाच्या माध्यमातून वायू, अग्नी, जल, पृथ्वी, नभ या पंचमहाभूतांचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. वास्तविक मनुष्यजातीच्या अस्तित्वापासून असलेल्या या पंचमहाभूतांचे महत्व आपण सर्वचजण जाणतो आणि या पंचमहाभूतांचे रक्षण, संरक्षण का गरजेचे आहे, हेही विज्ञानाच्या पाठपुस्तकातून आपण शिकत आलो आहोत. पण या लोकोत्सवात मात्र पंचमहाभूतांचे अस्तित्व दाखविताना, त्याला प्राचीन भारतीय परंपरेच्या नावाखाली सनातन वैदिक धर्माची जोड देण्याची चलाखी; किंबहुना लबाडी करण्याचा प्रयत्न जागोजागी केला आहे.

उदाहरण सांगायचे झाल्यास, प्रत्येक दालनाची सुरवात वेदातील एका श्लोकापासून होते. अग्नी या नावाच्या भव्य दालनाची सुरवातही वेदातील एका श्लोकापासून होते आणि याठिकाणी सुरवातीलाच यज्ञ करणारे ऋषीमुनी दाखविण्यात आले आहेत. याठिकाणी लिहिलंय, की दगडांचे एकमेकांवर घर्षण करून अग्नी प्रज्वलित करण्याच्या शोधाचा जनक एक ऋषी आहे. खरं वास्तव आपल्या सर्वांना माहिती आहे, की आदिम काळातच माणसाला आग कशी निर्माण होते, याचा शोध लागला होता. पण सनातन वैदिक परंपरेचं महत्त्व ठसविण्यासाठी ऋषीने आगीचा शोध लावला असे लिहीलेय. पुढे याचा दालनात वॉशिंग मशीन, फ्रीज इत्यादी गोष्टी अग्नी तत्व या मुद्द्याखाली येतात हे सांगत असताना, याचा शोध मात्र विज्ञानाने लावला आहे हे मात्र चलाखीने लपवले गेले आहे.

प्राचीन भारतीय कला या नावाने मांडण्यात आलेले प्रदर्शनही असेच जाणीवपूर्वक आणि अगदी साळसूदपणे ब्राह्मण्यवर्चस्ववादी प्रतिमा बळकट करण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच प्राचीन भारतीय कला यामध्ये वादन, नृत्य, युद्धकला अशा विविध कला सादर करणाऱ्या व्यक्ती मूर्तीरूपात याठिकाणी दाखविण्यात आल्या आहेत. गंमत अशी की या सर्व मूर्ती जानवेधारी आणि बहुतांशी शेंडीधारी आहेत. अगदी हलगी वाजविण्याची कला सादर करणारेही जानवेधारी..! प्रत्येक दालनात अशाप्रकारे चलाखीने काही गोष्टी पेरण्यात आल्या आहेत, ज्या नकळतपणे सनातन वैदिक परंपरेचा पगडा निर्माण करतात.

वरील विवेचन वाचल्यानंतर अनेकांना वाटेल की चांगल्या कामात खोड काढायची तुमची सवयच आहे. एवढा भव्य दिव्य सोहळा होतोय, तरी तुम्ही त्यात मुद्दाम खोट काढताय. पण जे तुम्हाला चांगले (?) किंवा भव्य दिव्य वाटतेय, त्यामागचा उद्देश जो दाखविला जातोय तो खरा की त्याआडून आणखी काही वेगळीच डाळ शिजतेय, हेही तपासले पाहिजे. पंचमहाभूतांचा वापर, संरक्षण आणि संवर्धन गरजेचे आहे, हे अनेकदा सांगून झाले आहे. गरज आहे ती त्याबाबत योग्य आणि सकारात्मक पावले उचलण्याची.. आणि यात मोठा वाटा आहे तो शासकीय धोरणांचा..!

दुर्दैवाने काल याच कणेरी मठावर शिळे अन्न खाल्ल्याने ५० हून अधिक गायी मृत्यूमुखी पडल्या. एकीकडे गेल्या ७-८ वर्षात गोहत्या या विषयावरून चांगलेच रणकंदन माजले असताना, या गायींच्या मृत्यूबद्दल मात्र गो रक्षकांकडून अवाक्षरही निघू नये, हे जरा आश्चर्यकारक वाटते. गेल्या काही वर्षात घरात गोमांस सापडले असे खोटे भासवून खून पाडण्याचे प्रकार भारतात घडले आहेत. अगदी गेल्या महिन्यात कोल्हापूरात गोहत्या विरोधी कायदा करा म्हणून मोठा मोर्चा काढला गेला. या मोर्चेकऱ्यांची काही पावले आता कणेरी मठाकडे वळतील काय? की 'त्यांचा' अजेंडा कणेरी मठाकडून राबविला जात असल्यानेच, तथाकथित गोरक्षक मोर्चेकरी या गाय मृत्यूप्रकरणावर अळीमिळी गुपचिळी भूमिका घेऊन गप्प बसले आहेत?

- सुशील लाड, कोल्हापूर

Tags:    

Similar News