कोव्हिडकाळातील केदारनाथ : भाग 5

Update: 2020-10-10 03:15 GMT

दीड दोन तासांनंतर ही 'खडी चढाई' संपली आणि आम्ही बऱ्यापैकी सपाटीवर आलो. आता या उंचीवर आजूबाजूला झाडे दिसत नाहीत. बोडका मुलुख सुरू होतो आणि उन्हाचे चटके चांगलेच बसू लागतात. पुढच्या पंधरा मिनिटांतच एक छानसे वळण घेतल्यावर मला पहिल्यांदा लांबून केदारनाथाच्या कळसाचे दर्शन झाले. मन हरखून गेले. पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची, लांबून विठ्ठलाच्या देवळाचा कळस दिसल्यावर काय अवस्था होत असेल त्याची प्रचीती आली.

नकळत मान वाकवून मनोभावे हात जोडले गेले. काही वेळात घोडे तळ आला. येथे पायउतार होवून पुढे देवळापर्यंत दीड किमी पायी जावे लागते. एव्हाना बारा वाजत आले होते. देऊळ बारा ते पाच बंद असते. त्यामुळे आत्ता दर्शन होणे शक्य नव्हते. दुतर्फा दुकाने आणि हॉटेल्स असलेल्या मोठ्ठ्या रुंद रस्त्यावरून हळूहळू चालत देवळापाशी पोहोचलो. बंद देवळाला वंदन केले. देवाला त्याने दिलेल्या आदेशानुसार मी आल्याची वर्दी दिली. पोटात कावळे ओरडू लागले होते. एका साध्याशा हॉटेलात जाऊन पोटभर कढी भात जेवलो आणि राहण्यासाठी हॉटेलच्या शोधार्थ निघालो.

सध्या कोविड आणि लॉकडाऊन मुळे केदारनाथला अजिबात गर्दी नाहीये. हॉटेल्स आणि धर्मशाळा ओस पडल्या आहेत. अतिशय स्वस्तात राहण्याची व्यवस्था होतेय. मला तीन बेड्स असलेली रूम पाचशे रुपयांत मिळाली. त्यात मी एकटाच होतो. आंघोळीला गरम पाणी मिळण्याची सोय होती. एकूण व्यवस्था यथातथाच होती. परंतू एक रात्र काढण्यासाठी ठीक होती. बाहेर चक्क उकडत होते. या दिवसांत इथे दिवसा गरम होते आणि दुपारी चार नंतर तापमान घटायला सुरुवात होते. रात्री ते एक ते दोन डिग्री इतके खाली जाते. दुपारी घोड्यावरून उतरल्यावर दीड किमी चालतांना सूर्य खाली आल्यासारखा वाटावा इतके गरम होत होते. त्यामुळे माझे डोके थोडे दुखायला लागले. खोली मिळाल्यावर पंखा लावून पलंगावर लवंडलो तर झोपच लागली. जाग आली तेव्हा चार वाजून गेले होते.

बाहेरच्या हवेत गारवा यायला सुरुवात झाली होती. जोडीला वारं ही सुटलं होतं. रात्री काय होणाराय त्याची चाहूल लागत होती. जॅकेट आणि कानटोपी असा सरंजाम करून मी बाहेर पडलो. सर्वप्रथम गरमागरम चहा ढोसला. बाजारात फिरू लागलो. विशेष असे काहीच नव्हते. कुठल्याही देवस्थानाजवळ असतो तसाच बाजार आणि विकायला ठेवलेल्या प्रसाद, हार, लॉकेट्स, फोटो, लोह्चुंबकाच्या सहाय्याने गाडीत किंवा फ्रीझवर चिकटवायच्या देवाच्या छोट्या मूर्ती वगैरे तशाच ठराविक वस्तू. मला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता.

मी देवळाच्या विस्तीर्ण चौथऱ्यावर गेलो. देऊळ उघडायला अजून थोडा अवकाश होता. खालून सकाळी चालत निघालेले लोक हळूहळू पोहोचत होते. तरीही बिलकुल गर्दी नव्हती. जेमतेम दोन तीनशे पर्यटक असावेत. देवळाला एक चक्कर मारली. २०१३ सालच्या महापुरातून देवळाला वाचवणारी महाकाय भीमशीला देवळापासून पंधरा वीस फुटांवर भक्कम विसावलेली आहे. आता तिचीही पूजा सुरू झालीय. या भीमशीलेची कथा चमत्कारापेक्षा कुठेही कमी नाही.

देवळाच्या मागील डोंगरात काही हजार फूट उंचीवर असलेले ग्लेशियर ढगफुटीमुळे फुटले व पाण्याचा आणि दगडधोंडे चिखलाचा एका महाप्रचंड लोंढा भयानक वेगाने खालच्या केदारनाथ मंदिराच्या दिशेने चाल करून आला. त्या लोंढ्याबरोबर ही भीमशीला वाहत आली आणि देवळाच्या बरोब्बर मागे येऊन थांबली. तिने मागून घसरत येणारे दगडधोंडे, चिखल अडवला, पाण्याच्या लोंढ्याचे दोन भाग झाले व मंदिराच्या दुशी बाजूने पुढे वाहत गेले. मंदीर बालंबाल बचावले, सुरक्षित राहिले, परंतू बाकी आसपासची एकही इमारत शिल्लक राहिली नाही.

केदारनाथाचा उर्वरित परिसर पूर्णपणे उध्वस्त झाला. मी चमत्कारांवर विश्वास ठेवणारा माणूस नाही. प्रत्येक गोष्टीमागे शास्त्रीय कार्यकारण भाव असतो असे मी मानतो परंतू या भीषण आपदेत फक्त मंदीर कसे आणि कोणत्या शक्तीने सुरक्षित ठेवले ते समजण्यासाठी माझी बुद्धी, कल्पनाशक्ती तोकडी पडते. अशा वेळी फक्त हात जोडायचे आणि नतमस्तक होवून शरणागती पत्करायची बस्स.

मंदिरासमोर लोक विसावले होते. कुणी फोटो काढत होते, फिल्म घेत होते. मंदिराभोवती फिरत बारकाईने मंदिराच्या बांधणीचे निरीक्षण करत होते. एखाद दोघे चित्र देखील काढताना दिसले. कष्टप्रद ट्रेक केल्याने दमले भागलेले काही जीव स्वत:च्या हातापायांना मालीश करत बसले होते. गर्दी अजिबात नसल्याने कुठेही गडबड गोंधळ नव्हता.

मंदिराच्या तीन बाजूनी उंच उंच बाराही महिने बर्फाच्छादित असणारी शिखरे आहेत. अतिशय सुरेख नजारा आहे. दृष्टी त्या दृश्यावरून हटत म्हणून नाही. उजव्या हाताच्या डोंगरावर छोटेसे भैरवनाथ मंदिर आहे. अर्ध्या तासाचे ट्रेकिंग करून तेथे जाता येते. डाव्या हाताला असलेल्या उंच शिखरापलीकडे 'वासुकी ताल' हे सरोवर आहे. तेथे जाऊन येण्यासाठी एका संपूर्ण दिवसाचा ट्रेक करावा लागतो. त्याच्या शेजारच्या डोंगरात दोन गुंफा आहेत. त्यापैकी एक निसर्गनिर्मित आहे तर दुसरी मानवनिर्मित. याच निसर्गनिर्मित गुहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एक रात्र ध्यानाला बसले होते.

आता या दोन्ही गुंफा इच्छुकांना ध्यानधारणेसाठी भाड्याने घेता येतात. मला या यात्रेत यातले काहीही झेपण्यासारखे नव्हते. पाच वाजायला फारच थोडा वेळ उरला होता. लोक हळूहळू आपल्या जागेवरून उठून अगदी देवळासमोर गर्दी करू लागले होते. सध्या देवळात कुणालाही जाऊ देत नाहीत. मुख्य दरवाजाबाहेर पायऱ्या सुरू होतात तिथे एक तात्पुरता चौथरा उभारलेला आहे. त्यावर चढले की पंधरा वीस फुटांवरून उत्तम दर्शन होते.

बरोब्बर पाच वाजता मंदिराचा दरवाजा उघडला. मी चौथऱ्यावरच उभा होतो. समोरच्या पवित्र शिवरूपावर माझी नजर स्थिरावली. हिंदू धर्मियांचे हजार वर्षांचे संचित तेथे जमा झाले होते. गेली किमान दहा शतके अपार हालअपेष्टा सहन करत श्रद्धाळू येथे येत राहिले आहेत. कदाचित माझ्या पूर्वजांपैकी देखील कुणीतरी येथे येऊन नाक घासून गेला असेल. तुझ्या दर्शनाला पुन्हा येईन हा त्याने केलेला नवस अपुरा राहिला असेल आणि देवाने तो माझ्याकडून पूर्ण करून घेतला असेल. काय माहित? या सगळ्या आपल्या आकलना पलीकडच्या गोष्टी आहेत. मला एवढे मात्र माहित आहे की, माझे आजोबा प्रखर शिवभक्त होते. सतत बारा वर्षे त्यांनी राजापूरच्या आमच्या घरच्या विहिरीचे पाणी कावडीने नेऊन चार किमी लांब जंगलात असलेल्या धोपेश्वराला वाहिले होते. ही घटना शंभर वर्षांपूर्वीची आहे.

त्या काळात हे किती कष्टप्रद असेल याची आता आपण फक्त कल्पनाच करू शकतो. आजोबांच्या त्या साधनेतलाच काही अपूर्ण राहिलेला भाग माझ्याकडून पूर्ण करून घेतला जात होता का? उत्तर कधीच मिळणार नाही. मी देवापुढे हात जोडून उभा होतो. तोंडाने 'ओम नम: शिवाय' चा जप सुरू होता. डोक्यात विचारांचे चक्र फिरता फिरता कसलातरी शोध घेत होते. अचानक डोळ्यांना धार लागली ती थांबेचना. थोडा वेळ डोळे वाहू दिले. गर्दी नसल्याने देवासमोरून दूर करणारे कोणी नव्हते.

आजवर जे उत्तम आयुष्य भोगायला मिळाले त्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानले. बुद्धी, चित्त, वृत्ती स्थिर ठेव एवढेच मागणे मागितले आणि बाजूला झालो. गेली दोनेक वर्षे मनात दर्शनासाठी सतत चाललेली उलघाल थंडावली. संगीतकार यशवंत देव सर्वांना आशीर्वाद द्यायचे, 'मुक्त व्हा' ... त्याप्रमाणे कशातही मन न अडकवता आता मुक्त व्हायला हवे असे जाणवून गेले. हे पहिलेच देवस्थान जिथे माझ्यासारख्या जेमतेम श्रद्धाळू माणसालाही थोडे अध्यात्मिक होवून नॉर्मल जीवनाच्या पलीकडे पाहावेसे वाटले. एकूण अनुभूती फारच वेगळी होती. या परिसरात एक प्रकारची सकारात्मक उर्जातरंग (Positive Vibes) भरलेले आहेत हे निश्चित.

सायंकाळी साडे सहा वाजता आरती सुरू होते. जी एक तास चालते. या आरतीने मात्र, माझी साफ निराशा केली. आरती म्हणजे इथे चक्क लाऊडस्पीकर वर भजने वैगरे लावली जातात आणि एक जवान टोल बडवतो. आपल्याकडे जशी साग्रसंगीत आरती होते. त्याचा इथे मागमूस देखील नाही. तो प्रकार संपल्यावर समोरच्या प्रांगणात बसलेली मंडळी भोलेनाथाचा गजर करतात आणि मग काही वेळाने मंदिराचे दरवाजे बंद होतात. माझे दर्शन आधीच झालेले असल्याने आरतीनंतर मी पुन्हा दर्शनास गेलो नाही.

भाजपा नेत्या उमा भारती आलेल्या दिसल्या. एका खुर्चीवर शांतपणे बसल्या होत्या. लोक त्यांच्याही पायाला हात लावून वंदन करत होते. एव्हाना वातावरण चांगलेच गार झाले होते. मी जवळचे एक हॉटेल गाठले आणि सब्जी रोटी मागवली. सोयाबीन बटाट्याची फुळकवणी रस्सा भाजी होती. अजिबात आवडली नाही. जेवून हॉटेल गाठले. कपडे बदलून झोपायच्या तयारीला लागलो तेवढ्यात अचानक अंगात हुडहुडी भरून जबरदस्त थंडी वाजू लागली. मलेरियाच्या वेळी होते तसेच काहीसे झाले. दात वाजू लागले. थोडा ताप देखील आला. ताबडतोब पायात मोजे घातले, कानटोपी ओढली, अंगात माझे जाड जॅकेट चढवले, एक क्रोसिनची गोळी पाण्याबरोबर गिळली आणि जाड राजई ओढून पडून राहिलो. तरीही थंडीने कुडकुडायला होतच होते. साधारण तासभर ही अवस्था राहिली मग ताप उतरून केव्हातरी झोप लागली.

ज्या कारणासाठी या कोविडकाळात धोका पत्करून यात्रा केली होती तो उद्देश निर्विघ्नपणे पूर्ण झाला होता. आता पुढच्या दिवशी पासून परतीचा प्रवास सुरू होणार होता.

समाप्त

- उदय जोशी

Tags:    

Similar News