ओबामांचे पुस्तक आणि भारतातील राजकारण

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या पुस्तकावरुन सध्या भारतात राजकारण तापले आहे. पण ओबामांनी भारताबद्दल, राहुल गांधी यांच्याबद्दल नेमके काय म्हटले आहे हे भारतीय प्रसारमाध्यमांत तोडूनमोडून दाखवले गेले आहे का, हे जाणून घ्यायचे असेल तर ओबामा यांच्या पुस्तकाबद्दल सांगणारा प्रतीक पाटील यांचा लेख नक्की वाचा...;

Update: 2020-11-18 01:28 GMT

नुकतंच प्रसिद्ध झालेलं बराक ओबामा यांचं ए प्रॉमिस लँड हे पुस्तक सध्या प्रचंड चर्चेत आहे. जगभरात या पुस्तकात ओबामांनी व्यक्त केलेल्या मतांवर, नमुद केलेल्या अनुभवांवर उलट सुलट चर्चा सुरू आहेत. प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतात तर त्यावर राजकारणच तापलं आहे.

प्रॉमिस लँड या नावाने ओबामा दोन खंडात विभागलेलं पहिलं पुस्तक घेऊन आले आहेत. त्याचा दुसरा खंड लवकरच प्रकाशित होईल. पहिल्या खंडात एकुण सात मुख्य प्रकरणे, त्यात २७ उपप्रकरणे आहेत. एकनॉलेजमेंट, फोटो अल्बम, फोटो क्रेडीट आणि अनुक्रमणिका अशी मांडणी आहे. माझं स्वतःचं अजून पूर्ण पुस्तक वाचून होणं बाकी आहे. तरी आतापर्यंत वाचलेल्या एकुण कंटेट वरून एवढं लक्षात जरूर आलंय की ओबामा यांनी त्यांच्या २००८ सालच्या प्रेसिडेंशल कँपेनिंग पासून सुरूवात करत अबोटाबाद येथे सर्जीकल स्ट्राईक करून ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यापर्य़ंतचा प्रवास वर्णन केला आहे.

त्याच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या टर्मच्या चार वर्षांच्या कालावधीतील हा लेखाजोगा मांडताना त्यांनी भारताचे पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग, युपीए नेत्या सोनिया गांधी, राहूल गांधी यांच्यासोबत झालेल्या भेटी, त्यात त्यांना आलेले अनुभव, त्यासंदर्भात त्यांनी व्यक्त केलेली मते असं सर्व काही सविस्तर आलेले आहे. सोबतच भारतीय उपखंडातील विविध भाषा, धर्म, धर्मग्रंथ, आख्यायिका, महाकाव्य आणि महानाट्य, संगीत याबद्दलच्या आठवणीही सांगितल्या आहेत. या आठवणींवरूनच गदारोळ माजला आहे. त्यावर आपण चर्चा करूयात.

पण तत्पूर्वी पुस्तकाच्या सुरूवातीला असलेल्या दोन कविता वाचकांचं लक्ष वेधून घेतात... त्या अश्या..

O, fly and never tire,

Fly and never tire,

Fly and never tire,

There's a great camp-meeting in the Promised Land.

—FROM AN AFRICAN AMERICAN SPIRITUAL

Don't discount our powers;

We have made a pass at the infinite.

—ROBERT FROST, "KITTY HAWK"

आता त्या पुस्तकातील २४ वे प्रकरण पाहूयात. ज्याचा थेट संबंध भारताशी आहे.

एनडीटीव्ही पासून सर्वच न्यूज पोर्टल्सनी वन लाईनर बातमी दिली आहे. ज्याची हेडींग अश्या प्रकारची आहे.

"Spent Childhood Listening To Ramayana, Mahabharata": Obama In Memoir

त्याखाली विविध पोर्टल्सनी त्यांच्या सवडीनुसार बातमी लिहीली आहे. पण त्या हेडलाईनमधून ओबामा यांच्यावर रामायण आणि महाभारताचा प्रभाव किती आहे, त्यामुळेच त्यांची प्रगती कशी झाली हे ठसवण्याचा प्रकार अधिक झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला ४० पैसे प्रति पोस्ट दराने काम करणाऱ्या आयटीसेलने याचा प्रचार मोदींमुळे हिंदुत्वाचा असलेला विजय वगैरे नरेटिव्ह्ज रचणे अतिशय वेगाने सुरू आहे.

सदर पुस्तकातील पान क्रं. ५९७ वर ओबामांनी आठवण लिहितांना स्पष्ट लिहीले आहे...

I'D NEVER BEEN to India before, but the country had always held a special place in my imagination. Maybe it was its sheer size, with one-sixth of the world's population, an estimated two thousand distinct ethnic groups, and more than seven hundred languages spoken. Maybe it was because I'd spent a part of my childhood in Indonesia listening to the epic Hindu tales of the Ramayana and the Mahābhārata, or because of my interest in Eastern religions, or because of a group of Pakistani and Indian college friends who'd taught to me to cook dahl and keema and turned me on to Bollywood movies.

More than anything, though, my fascination with India had to do with Mahatma Gandhi. Along with Lincoln, King, and Mandela, Gandhi had profoundly influenced my thinking.

यात ओबामांनी स्पष्ट म्हटलेलं आहे... मी भारतात यापूर्वी कधीही आलेलो नव्हतो. पण भारताबद्दल मला एक प्रकारची विशेष उत्सुकता होती. २००० अधिक भाषा, जगातील १ षष्ठांश लोकसंख्या, विविध भाषा वगैरे वगैरे...त्यामुळेच माझ्या कल्पनेत मला जसे चितारता येईल तसं भारताबद्दलचं चित्र चितारलं होतं. कदाचित माझं लहानपण मलेशिया, इंडोनेशियामध्ये गेल्यामुळे तिथं अनेकदा रामायण आणि महाभारत माझ्या कानी पडले होते. माझे भारतीय आणि पाकिस्तानी मित्र होते. ज्यांनी मला दाळ आणि खिमा असे पदार्थ बनवायला शिकवले आणि त्यांच्यामुळेच मला बॉलीवूड सिनेमांबद्दल रुची निर्माण झाली.

पण मला भारताबद्दलचं आकर्षण होतं ते गांधीजीमुळेच. लिंकन, ल्युथर, मंडेला आणि गांधी यांनी माझ्या विचारांना खूप प्रभावित केलं आहे.

आता यात बनेलपणा कसा केला आहे भारतीय माध्यमांनी ते पाहा... ओबामांनी महाभारत आणि रामायणाचाच माझ्यावर प्रभाव आहे असे म्हटलेले नाही. या उलट पूर्वेकडील सर्व धर्मांबाबत मला उत्सुकता आणि आस्था होती. मलेशिया आणि इंडोनेशियात लहानपणी रामायण आणि महाभारत ऐकण्यात आले होते. त्यावरून इथले भक्तगण प्रचंड खुश आहेत. ते खुश असण्याचं कारण म्हणजे माध्यमांनी येथे केलेले त्याचे रिपोर्टींग. पण एक बरं झालं.. ओबामांनी रामायणात काय ऐकलं हे सांगितलं नाही तेच बरं झालं. मलेशिया आणि इंडोनेशियात असलेल्या रामायणाचे व्हर्जन भारतीय व्हर्जनपेक्षा फार निराळे आहे. त्या व्हर्जनमध्ये तर सीता ही रावणाची मुलगी आहे. आपली मुलगी पुरूषप्रधान संस्कृतीत राहू नये. यासाठी रावणाने आपल्या मुलीला तेथून सोडवून आणल्याचे एक व्हजर्नदेखील आहे रामायणाचे. तर .. असो...

तीच गत पान क्रं. ५९९ वर असलेल्या मजकुराबाबत आहे. पान क्रं. ५९९ ते ६०२ या तीन पानांवर ओबामांनी सविस्तरपणे सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग आणि राहूल गांधी यांच्याबाबत, त्यांच्या झालेल्या भेटीनंतर आलेल्या अनुभवाचे सविस्तर वर्णन केलेले आहे. त्या वर्णनाचे इंग्रजीतून मराठीत भाषांतर केले आहे प्रतिक शिवाजीराव पाटील यांनी... ते पुढीलप्रमाणे आहे...

"मेजवानी दरम्यान सोनियांजींबद्दलचं एक निरीक्षण म्हणजे त्यांचा बोलण्याऐवजी ऐकण्यावर अधिक भर होता. धोरणात्मक गोष्टींमध्ये मनमोहन सिंगांपासून फारकत घेत त्या अधूनमधून संभाषण त्यांच्या मुलाकडे नेत होत्या. त्या सगळ्यामधून मला एक गोष्ट जाणवली ती म्हणजे त्यांची ताकद ही त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेचा आविष्कार होती. आईचंच रुबाबदार रूप घेतलेला राहुल हुशार आणि प्रामाणिक वाटला. तो पुरोगामी राजकारणाच्या भविष्याबद्दलचे त्याचे विचार सांगतानाच अधूनमधून माझ्या 2008 च्या प्रचारयंत्रणेच्या तपशिलांबद्दलही विचारत होता. तो जरासा चिंताक्रांत आणि अपरिपक्व वाटला. म्हणजे शिक्षकावर प्रभाव पाडण्यासाठी अत्युत्सुक असलेला, सर्व अभ्यासक्रम वाचलेला पण आत खोलवर त्या विषयासंबंधी फार आसक्ती नसलेला.

डॉ. मनमोहन सिंहांचा थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा घोट घेत झोप घालवण्याचा प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे उशीर होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. निरोप घेण्याची वेळ आली असं मी मिशेलला खुणवलं. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी आम्हाला सोडवायला कारपर्यंत आल्या. त्या मंद उजेडात मला थकलेले पंतप्रधान त्यांच्या वयापेक्षा अधिक वृद्ध वाटले. तिथून निघताना ही व्यक्ती पदावरून पायउतार झाल्यानंतर कसं होईल हाच प्रश्न माझ्या मनात घोळत होता.

त्याच्या आईने निगुतीने जोपासलेला, भाजपच्या द्वेषामूलक आणि दुफळी माजवणाऱ्या राष्ट्रवादाला न जुमानता काँग्रेस पक्षाला मिळवून दिलेल्या यशाचा आणि भविष्याच्या रोखाने आखलेला वारसा यशस्वीपणे राहुलकडे सोपवला जाईल का? मी साशंक होतो. मनमोहन सिंहांची अजिबात चूक नव्हती. त्यांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली होती. शीतयुध्दोत्तर काळातील उदारमतवादी लोकशाही देशांप्रमाणे, संवैधानिक मुल्यांचा मान राखत आणि विहीत जबाबदार्याह पार पाडत असताना उच्चांकी जीडीपी गाठत, सामाजिक सुरक्षेचं मजबूत जाळं विणत त्यांनी विकास साधला. भारत किंवा अमेरिकेसारख्या सारख्या बहुभाषिक, बहुसांस्कृतिक आणि बहुधर्मीय देशांमधील लोकशाही व्यवस्थेत हा विकासाचा परमावधी असावा असं माझ्याप्रमाणे त्यांचं देखील मत होतं. अतिधाडसी क्रांतिकारक पावलं किंवा सरसकट सांस्कृतिक बदल, किंवा सगळ्याच सामाजिक विकृतींवर उपाय शोधत बसणं, आयुष्याचा शाश्वत अर्थ शोधणाऱ्यांचं समाधान पाहत बसण्यापेक्षाही संयमीपणे संवैधानिक नियमांचं पालन करणे, सहिष्णुता जोपासणे आणि लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी, उत्तम शिक्षण सगळ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हेच समग्र मानवतेचे मापदंड उंचावण्यासाठी अधिक परिणामकारक ठरेल.

- बराक ओबामा

यातील एक उतारा...

आईचंच रुबाबदार रूप घेतलेला राहुल हुशार आणि प्रामाणिक वाटला. तो पुरोगामी राजकारणाच्या भविष्याबद्दलचे त्याचे विचार सांगतानाच मधुन मधुन माझ्या 2008 च्या प्रचारयंत्रणेच्या तपशिलांबद्दही विचारत होता. तो जरासा चिंताक्रांत आणि अपरिपक्व वाटला... म्हणजे शिक्षकावर प्रभाव पाडण्यासाठी अत्युत्सुक असलेला, सर्व अभ्यासक्रम वाचलेला पण आत खोलवर त्या विषयासंबंधी फार आसक्ती नसलेला.

आता हा उतारा २०१० सालच्या आसपासचा अनुभव. यात अमेरिकेसारख्या महासत्तेच्या म्होरक्यासमोर बसलेला चाळीशीतला युवक. सोबतीला आई सोनिया गांधी आणि प्रचंड विद्वान डॉ. मनमोहन सिंग. या विद्वानांच्या पंगतीला असताना कुणासही दडपण येणं साहजिकच आहे. राजकारणात ४० वर्षे वय हे फार काही मोठे नसते. अजून बरंच शिकणं अपेक्षित असतं. त्यामुळे राहूल गांधींबाबत मत व्यक्त करताना ओबामा त्यांना अपरिपक्व म्हणाले आहेत हेच सांगत होते. दुसऱ्या बाजूला भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यानंतर काय होईल. ही व्यक्त केलेली काळजीदेखील माध्यमांना रिपोर्ट करावीशी वाटली नाही किंवा.. मूळ इंग्रजी उतारासुद्धा सांगण्याची तसदी कुणी घेतली नाही.

एकुणात माध्यमांनी एकप्रकारे ओबामांनी मोदींचा उल्लेखही केला नसल्याचे उट्टे फेडले असल्याचे वरकरणी दिसत आहे.

आता याच पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशित होईल तेव्हा मजा येईल. कारण त्या पुस्तकात २०१२ ते २०१६ हा कालावधी असेल. मोदी आणि ओबामा यांच्या भेटीचा उल्लेखही असावा अशी अपेक्षा आहे. त्यात ओबामा मग मोदींना काय म्हणतायेत आणि त्याचं रिपोर्टींग भारतातील सवर्ण माध्यमं आणि सवर्ण पत्रकार कसे करतायेत हे पहावं लागेल.

Tags:    

Similar News