झंडा ऊँचा रहे हमारा…!

भारताच्या राष्ट्रध्वजाबद्दल तुम्हाला हे माहित आहे का? तीन रंगांचा झेंडा भारताला कसा मिळाला? जाणून घ्या संजय आवटे यांच्याकडून….;

Update: 2021-08-15 00:30 GMT

भारताचा राष्ट्रध्वज सर्वप्रथम फडकला तो लाहोरमध्ये. नेहरूंच्या हस्ते. रावी नदीच्या किनारी. ३१ डिसेंबर १९२९ रोजी झालेल्या या कार्यक्रमातलं नेहरूंचं भाषण म्हणजे कविता होती! त्यानंतर मग २६ जानेवारी १९३० हा स्वात्रंत्र्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. कारण, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव तोवर मंजूर झालेला होता.

भारताला राष्ट्रध्वज असावा, ही कल्पना मांडली, ती महात्मा गांधींनी. 'यंग इंडिया'मधून १९२१ मध्येच गांधींनी ही कल्पना मांडली. मध्यभागी चरखा असलेला राष्ट्रध्वज असावा, हेही सुचवले. त्यापूर्वीही राष्ट्रध्वजाचे प्रयत्न झालेले होते. मात्र, गांधींनी या मुद्द्याला अधिक महत्त्व दिले. सुरुवातीला दुरंगी असलेला हा ध्वज पुढे तिरंगी झाला. १९३१ मध्ये कॉंग्रेसने हा ध्वज ऑफिशियली मान्य केला.

पुढे घटना समिती स्थापन झाल्यानंतर ध्वज ठरवण्यासाठी समिती स्थापन झाली. डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष होते. तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद, सरोजिनी नायडू, सी. राजगोपालाचारी, के. एम. मुन्शी हे सदस्य होते. त्यांनी चरख्याच्या ऐवजी अशोकचक्राची कल्पना मांडली आणि नेहरूंनी ती उचलून धरली. अशोकाचे धम्मचक्र २४ आ-यांसोबत ज्या मूल्यांचा आग्रह धरते, ती समता-बंधुता-प्रगती-आरोग्य यासारखी मूल्येही या समितीने सांगितली. देशाला बुद्धाच्या रस्त्याने जायचे आहे, असे राजेंद्रप्रसादांनी आपल्या त्या भाषणात सांगितले. बुद्धाचे तत्त्वज्ञानच देशाला शाश्वत विकासाचा मार्ग दाखवू शकते, ही बाबासाहेबांची भूमिका होती.

२२ जुलै १९४७ रोजी घटना परिषदेत नेहरूंनी हा प्रस्ताव सादर केला आणि देशाचा नवा ध्वज ऑफिशियली स्वीकारला गेला. (पुढे देश स्वतंत्र झाल्यावर सलग सतरा वर्षे नेहरूंनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला.)

देशाला स्वातंत्र्य लवकर मिळत असल्याने २६ जानेवारी या पूर्वघोषित स्वात्रंत्र्यदिनापर्यंत थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन झाला असला, तरी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा बहुमान मिळाला.

२६ जानेवारी १९३० लाच देशात जागोजागी तिरंगा फडकला होता!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ची. संघाने मात्र तेव्हाही तिरंगा फडकवला नाही. आणि, त्यानंतरही. स्वातंत्र्याच्या कोणत्याही आंदोलनात संघ सहभागी नव्हता. मुळात तिरंगा आणि अशोक चक्राला संघाचा विरोध होता. तीन हा आकडाच अशुभ आहे, तेव्हा असा काही झेंडा आपला असू नये, असे सांगण्यासाठी साधूंचे एक शिष्टमंडळ बाबासाहेबांना भेटल्याचा उल्लेखही सापडतो. अर्थात, त्यामुळे काही फरक पडला नाही.

गांधी-नेहरू-आंबेडकर इथेही सोबत होते. मौलाना आझाद आणि राजेंद्रप्रसाद तेच सांगत होते. 'जय हिंद' ही नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या आझाद हिंद सेनेची घोषणाही अधिकृत झाली होती. नेताजींचा मार्ग भलेही वेगळा असेल, पण त्यांच्या देशभक्तीविषयी कोणालाच शंका नव्हती. म्हणून गांधी त्यांची 'जय हिंद' घोषणा देत होते, तर नेताजीही आझाद हिंद सेनेत 'गांधी रेजिमेंट' स्थापन करत होते…! एवढेच नाही, 'झंडा उंचा रहे हमारा' हे 'झंडागीत' कॉंग्रेसच्या ज्या १९३८ च्या अधिवेशनात अधिकृत झाले, ते मंजूर केले नेताजींनीच. श्यामलाल गुप्त यांचे झंडागीत 'एडिट' करवले गांधींनी आणि मंजूर केले नेताजींनी.

"शान न इसकी जाने पाये

चाहें जान भले ही जाये

विश्व विजय कर के दिखलायें

तब होवे प्रण पूर्ण हमारा,

झण्डा ऊँचा रहे हमारा"

या ओळी नेताजींना प्रचंड आवडल्या होत्या. इथल्या सामान्य माणसाने आपल्या खांद्यांवर अशोक चक्रासह तिरंगा घेतला आणि तो उंच आकाशात विहरू लागला.

जय हिंद!


Tags:    

Similar News