Palghar Mob lynching: कोणीही आग ओतण्याचं काम करु नये: उद्धव ठाकरे

Update: 2020-04-20 09:02 GMT

पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद: उद्धव ठाकरे

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गावकऱ्यांनी तिघांना चोर समजून ठार केल्याप्रकरणी पोलिसांनी ११० जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाला धार्मीक रंग दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर प्रथमच भाष्य केलं. त्यांनी फेसबूक लाईव्ह द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

पालघरमध्ये घडलेली घटना (Palghar Mob lynching) लांछनास्पद आहे. या प्रकरणात कोणीही आग ओतण्याचं काम करु नये. या संदर्भात गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरुन बातचित झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॉल करुन दोषींवर कडक कारवाई करावी करण्याची मागणी केली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही लोकांना अटक केल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दिली आहे. अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली आहे.

ज्या गावात ही घटना घडली. ते गाव दुर्गम भागात आहे. तिथे काही मीटरवर दादरा नगर हवेली म्हणजे केंद्रशासित प्रदेशाची हद्द सुरु होते. तिथे त्यांना अडवलं गेलं, त्यानंतर त्यांना परत पाठवलं गेलं. तिथे गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. दादरा नगर हवेलीतही त्यांना प्रवेश नाकारला गेला आणि त्यांना परत पाठवलं गेलं. त्या परिसरात गेले काही दिवस अशी अफवा आहे तिथे चोर फिरत आहेत. त्या सगळ्या गैरसमजातून हा प्रकार घडला.

पालघर जिल्ह्यामध्ये गडचिंचले येथे सुशील गिरी महाराज, जयेश आणि नरेश येलगडे हे तिघे एका कारमधून मुंबईहून सुरतला निघाले असताना त्यांची जमावाने हत्या केली होती.

पालघर जिल्ह्यातील आतल्या रस्त्यांवरुन ते निघाले होते. पण गडचिंचले गावाजवळ त्यांची कार आली असता, गावकऱ्यांना ते चोर असल्याचा संशय आला आणि त्यांच्या कारवर गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हल्ला केला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०० हून अधिक गावकऱ्यांनी चोर समजून या तिघांची गाडी थांबवली. सुरुवातीला त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि जेव्हा त्यांची गाडी थांबली तेव्हा तिघांना बाहेर काढून गावकऱ्यांनी त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत या तिघांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान याप्रकऱणी ताब्यात घेतलेल्या ११० जणांपैकी ९ जण अल्पवयीन असल्याने ९ जणांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले असून इतरांना पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकऱणाची उच्चस्तरीय चौकशी कऱण्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसंच या घटनेविषयी समाजमाध्यमांमधून काही जण धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, “ हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत, उगाचच समाजमाध्यमांमधून समाजात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलीस कारवाईचे आदेश दिले आहेत,” असा इशारा दिला आहे.

Full View

Similar News