वृक्षवल्ली आम्हा सोयरी: बिहार पॅटर्न कोपरगाव

देशी प्रजातीचे वृक्ष, फळझाडे, वनौषधी यासारखी जैवविविधतेने परिपूर्ण वनराईचा बिहारी पॅटर्न अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मध्ये सुरू झाला आहे. गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी अनुभवलेला‌ संवर्धित निसर्ग..

Update: 2022-07-09 14:42 GMT

 काल संवत्सरला गेलो होतो. ग्रामपंचायत कार्यालयातील काम आटोपून परतताना सवयीप्रमाणे माझी पावले वनराईकडे वळाली. नुकत्याच रिमझिम पाऊस सरी बसून गेल्या होत्या. त्यामुळे हवेत निर्माण झालेला गारवा अल्हाददायक वाटत होता. मावळतीने पश्चिम कॅनव्हासवर अप्रतिम रंगांची उधळण केली होती. एरवी मनाचा गाभारा पार काळवंडून टाकणारी कातरवेळ अशी क्वचितच आयुष्यात रंग भरते. पिंपळ पानांची चैतन्यमय सळसळ अवघं वातावरण भारून टाकत होती. पहिल्याच पावसाने दरवळणारा मृदगंध मला थेट कृषी पदवीच्या पहील्या वर्गात घेऊन गेला. एरवी कवी कल्पनेत वाचलेली हिरवा शालू परिधान केलेली पृथ्वीमाय कितीतरी देखणी दिसत होती.




 


वाऱ्याच्या मंद झुळूकिसरशी लयबद्धरित्या हवेत डौलणारी कोवळी झाडं ज्ञानोबा तुकोबांच्या दिंडीत टाळ पखवाजावर ताल धरणाऱ्या वारकऱ्यांसारखीच दिसत होती... निष्पाप, निरागस, निर्मोही, निष्पक्ष आणि निश्चयी देखील. एकमेकांचा पाठलाग करत काही पक्षी या फांदीवरून त्या फांदीवर उडत होते. आपल्या पिलांना चोचभर चारा मिळावा यासाठी दिवसभर वणवण उडणारे पक्षी सायंकाळी घरट्याकडे परत फिरण्यापुर्वी झाडांच्या फांद्यांवर क्षणभर विसावले होते. वाऱ्याच्या झोताबरोबर खालीवर लचकणारी झाडाची कोवळी फांदी जणू त्यांच्या थकल्या भागल्या मनाला रिझवत होती. हे दृश्य पाहून मला वसीम बरेलवींच्या गजलेतील ओळी आठवल्या...

थके-हारे परिंदे

जब बसेरे के लिए लौटें

तो सलीका-मंद शाखों का

लचक जाना जरुरी है..

वाऱ्यासरशी हलणारी फांदी आणि त्यावर आपल्या नाजूक पाय नखांनी पकड घेऊन डौलणारे पक्षी यांचा समन्वय अफलातून होता. आज खरोखर 'दिलकी वादी में चाहत का मौसम' होता आणि त्यामुळेच की काय, यादों की डालियों पर अनगिनत बिते लम्होंकी कलियां' महकत होती. शेजारी मुंबई नागपूर हायवे वर नेहमीप्रमाणे वाहनांची वर्दळ नव्हती. एरवी 'दिलवाले'छाप 'इक ऐसी लडकी थी..' ऐकत धीम्या गतीने घराकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवाल्याने देखील आज सूर बदलला होता. महेंद्र कपूरच्या आवाजात 'रूप तुजं लई छान गं...' ऐकताना वाकड्या टोपीवर हात देऊन 'च्यामायला ह्या पावसाची रीतच लय न्यारी' असं म्हणणारे अर्ध्या चड्डीतले दादा आठवून गेले.

संवत्सर ग्रामपंचायतीने उभारलेल्या महंत राजधर बाबा ऑक्सिजन पार्कासाठी गतवर्षी स्व. नामदेवराव परजणे पाटील सेवाभावी संस्थेने १००० वृक्षरोपे भेट दिली होती. ही रोपे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये संवर्धित करण्याचा निर्णय पंचायत समिती प्रशासनाने घेतला. पुढे याच धर्तीवर कोपरगाव तालुक्यात आणखी दहा हजार वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. सर्वच ठिकाणी #मनरेगा मजुरांनी ही वृक्षरोपे पोटच्या लेकराप्रमाणे जपली.




 


पहिल्या पावसात 'वनी नाचता मोर' पाहण्याएवढे भाग्य थोर नसले तरी, उद्यानात प्रवेश करताच समोर लांडोरीचे दर्शन झाले. पक्षी माणसाळलेला वाटत होता. कारण उद्यानाला फेरफटका मारतानाही ती मागेमागे बागडत होती. या वनराईतील वृक्ष संवर्धनाचे काम #मनरेगाचे मजूर करतात. समोरच महानुभाव पंथीयांचा आश्रम आहे. दिवसभर ही लांडोरी मजुरांबरोबर उद्यानातच असते. सायंकाळी मजूर घरी परततात. आणि लांडोरी आश्रमात. किती हे अद्वैत...

पहिला पाऊस हा असा असतो. त्याची नुसती एक सर जरी येऊन गेली, तरी झाडा पिकांना उभारी देऊन जाते. मनामनातली जळमटं दूर करणारा पहिला पाऊस नवनिर्मितीची चाहूल घेऊन येतो. या पहिल्या पावसाकडून अन्नदात्याची 'किमान ढेकळं तरी फुटावीत' एवढीच अपेक्षा असते. आंवदा चांगलं रान पिकू दे... ही अन्नदात्याची सदिच्छा सुफळ व्हावी, याचसाठी झाडं लावण्याचा आमचा अट्टाहास सुरू आहे. लावलेलं प्रत्येक झाड रुजलं पाहिजे, तरलं पाहिजे, जगलं पाहिजे, यासाठी सगळे सखेसोबती झटत आहोत. मानव-निसर्ग सहजीवनाला ठिकठिकाणी लागलेले सुरूंग पाहता, आमचा प्रयत्न फारच तोकडा देखील असू शकतो. अगदी चोचभर पाण्याने जंगल विझवण्यासारखा. मात्र लोकांचा वृक्ष लागवड मोहिमेला मिळणारा वाढता प्रतिसाद प्रचंड आशादायी वाटत आहे.




 



या वृक्ष लागवड मोहिमेच्या निमित्ताने दोन गोष्टींची गोळाबेरीज जमवायची आहे. आपण झाडं तोडतोय कुठली अन आपण झाडं लावतोय कुठं याचा ताळमेळ जुळत नाहीच. मात्र, आपण झाडं तोडतोय कोणती अन आपण झाडं लावतोय कोणती, याचाही मेळ काही केल्या न जुळणारा आहे. वड, पिंपळ, लिंब, जांभूळ, बाभूळ,कवठ, बेल यासारखे देशी वृक्ष तोडून, त्या ऐवजी विलायती वृक्ष लावायचा लटकेपणा फोटोपुरताच ठीक आहे. ह्या असल्या चमकोगिरीमुळेच आपट्याची तहान 'कांचन'वर भागवायची वेळ आलीये आपल्यावर. विकासाच्या नावाखाली दिवसाढवळ्या हजारो झाडांच्या केलेल्या खुलेआम कत्तलीचं प्रायश्चित्त सिमेंटच्या शिस्तबद्ध जंगलात, कंपाऊंडच्या आत, कुंडीत चार फुलझाडं लावून करण्याचा आपला निलाजरेपणा म्हणजे कळस आहे या सर्वांवर... यातून बाहेर पडायला हवं. शेताचे बांध, बोडके डोंगर, टेकड्या, दुतर्फा रस्ते, अतिक्रमणांच्या तडाख्यात सापडलेल्या शासकीय जमिनी, नदी-नाल्यांचा किनार शोधायला हवा. त्यासाठी प्रचंड कष्ट उपसावे लागणार आहेत. अंगाची काहिली करणाऱ्या उन्हाची तक्रार करत बसण्यापेक्षा, अंगाला गुदगुल्या करत निथळणाऱ्या घामाच्या धारेचा आनंद अधिक महत्त्वाचा आहे.

गतवर्षी कोपरगाव तालुक्यात अकरा हजार वृक्षरोपे लावली होती. यंदाच्या पहिल्या पावसाने या रोपांच्या मुळाशी घातलेले अमृत या वृक्ष लागवड मोहिमेसाठी झटणाऱ्या शेकडो हातांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला प्रबळ करणारं ठरलं. यावर्षी तालुक्यात ३१ गावात मिळून २०,००० वृक्षरोपे लावण्याची पूर्वतयारी केली आहे. खड्डे खोदकाम पूर्ण झालंय. पहिल्या पावसाची देरी होती. आता तो देखील आलाय. यंदा भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत नियोजित वृक्ष लागवड पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तुम्हीही या. कारण, लोकसहभाग असल्याशिवाय कोणतेही कार्य शाश्वत नाही. 'एक घर एक झाड' हा उपक्रम यासाठीच आहे. अनेक गावांनी, अनेक घरांनी यासाठी सहभाग नोंदवलाय. देशी प्रजातीचे वृक्ष, फळझाडे, वनौषधी यासारखी जैवविविधतेने परिपूर्ण वनराई आपल्या गावच्या सौंदर्यात नक्कीच भर घालेल.

मित्रहो...

कोणतंही झाड एकट्याने मूळ धरत नाही कधीच

त्या झाडासोबत एक आख्खी सृष्टी असते

त्याच्याभोवती हळुवार बागडणारी फुलपाखरं असतात

त्याच्या फांद्यांवर मुक्तपणे विहरणारे पक्षी असतात

त्याच्या आडोशाला बसणारी गाय गुरं असतात

आंबट गोड फळाच्या अपेक्षेने मधल्या सुट्टीत त्याच्याकडे धावणारी पोरं टोरं असतात

शेतात खुरपण करणाऱ्या मायचं लेकरू याच झाडाला बांधलेल्या झोळीत पहुडलेलं असतं

श्रावणात घरी आलेल्या माहेरवाशिनींसाठी बांधलेला पंचमीचा झोका याच झाडाच्या फांद्या किती अभिमानाने मिरवतात

आजही गावच्या अखंड हरिनाम सप्ताहाची वर्गणी झाडाच्या पारावर बसलेले स्वारच तर करतात

गावकी-भावकीच्या राजकारणातील जिरवाजिरवीचे असंख्य कट मूकपणे पाहात आलंय झाड

खुलत्या वयात एकमेकांच्या इश्कात पार बुडालेल्या युगुलांना भेटण्याची हक्काची जागा असतंय झाड

झाडंच तर आहे सासुरवाशींनींच्या दाटलेल्या हुंदक्याचा अव्यक्त स्वर ऐकणारा एकमेव साक्षीदार

बांधावर उभा राहून अन्नदात्याची रानातली मेहनत कौतुकाने पाहणारं झाड, त्याच अन्नदात्याच्या फासात लटकलेल्या मृतदेहाच्या ओझ्याने पार उन्मळून पडायला लागलंय

सावरायला हवं मित्रांनो...

अन्नदात्याला अन त्याच्याइतकंच महत्त्वाचं असणाऱ्या झाडालाही !!!




 

Global warming, Climate change, Ecological imbalance या सगळ्या concepts कशा अगदी clear आहेत आपल्याला. मात्र या 'कळत्या' गोष्टी 'वळत्या' काही केल्या होत नाहीत. निसर्ग संवर्धनाच्या बाबतीत कर्ते होण्यासाठी काळाने दिलेली ही शेवटची संधी आता दवडून चालणार नाही. 'आजादी का अमृत महोत्सव' आपल्यापुरता आपणच अजरामर करू या...

एक झाड लावुन,

यावर्षी...

दरवर्षी !!!

©️ सचिन सुर्यवंशी

प्रशासक तथा गटविकास अधिकारी

पंचायत समिती, कोपरगाव

sachinomics.mpkv@gmail.com

#sachinomics

#मनरेगा

#आजादीकाअमृत_महोत्सव

#बिहारपॅटर्नकोपरगाव

#एकघरएक_झाड

Tags:    

Similar News