राहुल गांधी सुरत न्यायालयात राहणार हजर, काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन
राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर अपिल करण्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली होती. त्यातच राहुल गांधी यांनी न्यायालयात जाणार की नाही? याविषयी स्पष्ट भूमिका घेतली नव्हती. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यातच सोमवारी सुरत न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसाठी राहुल गांधी हजर राहणार असून त्यावेळी काँग्रेसने मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे जाहीर केले आहे.
मानहानीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर तब्बल दहा दिवसांनी अखेर आज बडतर्फ खासदार राहुल गांधी हे सुरतच्या न्यायालयात हजर राहणार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षातील देशभरातील वरिष्ठ नेते देखील उपस्थित राहणार आहे.
सुरत न्यायालयाने खासदार राहुल गांधी यांना आपल्या वक्तव्यावरून २३ मार्च रोजी दोषी ठरवले. त्यानंतर स्वतःचा बचावकरण्यासाठी व अपिलाला आव्हान देण्यासाठी त्यांना तीस दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र बडतर्फ खासदार राहुल गांधी हे दहा दिवसानंतर आज सुरत न्यायालयात हजर राहणार आहे. यावेळी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते देखील उपस्थिती लावणार असून यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. याठिकाणी महाराष्ट्र्र राज्यातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये सर्वच चोरांचे नाव मोदी कसे? अशी टिपण्णी केली होती. यावरून राहुल गांधी यांच्याविरुद्ध कोर्टात याचिका दाखल करण्यात आला होती. याचा निकाल नुकताच २३ मार्च रोजी सुरत न्यायालयाने दिला आहे. खासदार राहुल गांधी यांना त्यांनी केलेल्या वक्त्यावरून त्यांना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यावर संपूर्ण देशात काँग्रेस पक्षांकडून आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांनी खासदारकीबाबत न्यायालयात जावे, अशी भूमिका अमित शाह यांनी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही राहुल गांधी हे न्यायालयात जाणार की नाही, हे स्पष्ट नव्हते. मात्र आता अखेर राहुल गांधी यांनी कारावास टाळण्यासाठी वरिष्ठ न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे राहुल गांधी हे सुरत न्यायालयात हजर राहणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात, नाना पटोले, यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक नेते गेले आहेत. मात्र माजी मंत्री यशोमती ठाकूर यांना गुजरात पोलिसांनी अडवले आहे.