एकनाथ शिंदे यांनी खरंच शिवसेनेच्या मुख्यनेते पदावर दावा केला आहे का?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा केला आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष टोकाला गेला आहे. त्यापार्श्वभुमीवर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मुख्य नेते पदावर दावा सांगितला असल्याची माहिती समोर आली आहे.;
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वपक्षाविरोधात बंड करून राज्यात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून राज्यातील सत्तासंघर्ष रंगला आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने राजकीय पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असं स्पष्ट केले. त्यानंतर निवडणूक आयोगाने 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. दरम्यान शिंदे गटाने धनुष्यबाण आमचाच असं म्हणत निवडणूक आयोगाला पत्र लिहीले आहे. त्यामध्ये आम्हाला 55 पैकी 40 आमदारांचा पाठींबा आहे. त्याबरोबरच 18 पैकी 12 खासदार यांच्यासह देशभरातील दीड लाख शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांना पक्षाचे अध्यक्ष म्हणून मान्यता दिल्याचे म्हटले आहे.
या पत्रातील परिच्छेद 13 मध्ये म्हटले आहे की, शिवसेना या राजकीय पक्षाच्या दीड लाख पेक्षा अधिक सदस्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यनेता किंवा पक्षप्रमुख म्हणून पाठींबा दिल्याचे म्हटले आहे. मात्र यावर शिवसेनेकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिदावा करण्यात आला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे एकानाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या मुख्यनेते पदी मान्यता द्यावी, अशी मागणी केली आहे.
काय आहे परिच्छेद 13 जाणून घेण्यासाठी पहा....
निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना 7 ऑक्टोबरपर्यंत कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते. त्यापैकी एकनाथ शिंदे यांच्या गटाने 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात धनुष्यबाण आमचाच असल्याचे म्हटले आहे. शिवसेनेच्या 55 पैकी 41 आमदारांचा आणि 18 पैकी 12 खासदारांचा आम्हाला पाठींबा आहे. तसेच शिवसेनेच्या प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीने एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता आणि अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. शिवसेनेच्या 144 पदाधिकाऱ्यांनी आणि 11 राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तसेच या दाव्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्र सादर केले आहेत. तसेच अजून काही कागदपत्रं सादर करण्याची प्रक्रीया सुरू आहे. दरम्यान या पत्रात म्हटले आहे की, उध्दव ठाकरे यांचा गट अजूनही लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र सादर करू शकले नाही. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आमचे असून ते तातडीने आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केली आहे.
या पत्रात पुढे म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने पक्षचिन्ह आणि राजकीय पक्षाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा असल्याचे म्हटले आहे. मात्र उध्दव ठाकरे यांच्या गटाकडे आवश्यक तेवढे समर्थन नाही. तरीही त्यांच्याकडून धनुष्यबाण चिन्हावर दावा केला जात आहे, असं शिंदे गटाने लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. याबरोबरच 3 नोव्हेंबरला अंधेरी पुर्व विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणूकीत ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होऊ शकतो, त्यामुळे हे चिन्ह तातडीने आम्हाला देण्यात यावे, अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
या पत्रात परिच्छेद 13 नुसार एकनाथ शिंदे यांनी मुख्यनेता किंवा पक्षाच्या अध्यक्षपदी मान्यता देण्याची मागणी केली आहे.