राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी संध्याकाळी दिल्लीला जाणार असल्याची चर्चा होती. पण आता देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा रद्द झाल्याचे सांगितले जाते आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र जाणार असल्याचे सांगितले जात होते. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटेच दिल्लीला रवाना होणार आहेत.
मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचा गेल्या २७ दिवसातील पाचवा अधिकृत दिल्ली दौरा असणार आहे. यामध्ये काहीवेळा मुख्यमंत्री हे एकटे दिल्लीला गेले होते. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेसाठी फडणवीस का जाणार नाहीत, यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. राज्यात ठाकरे सरकार पाडून भाजप-शिवसेनेचे सरकार आणण्यात देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा आहे, असे असूनही मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला देवेंद्र फडणवीस हे गैरहजर राहणार असल्याने याचे कारण काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे सरकार स्थापन होऊन जवळपास एक महिना उलटला आहे. पण अजूनही मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीची वारी करावी लागते आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपमध्ये राज्यातील नेत्यांपेक्षा पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातल्याचे दिसत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना या विस्ताराच्या चर्चेपासून लांब ठेवले गेले आहे का, अशीही चर्चा आहे.
उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असेच सगळ्यांना वाटले होते. पण शेवटच्या क्षणाला पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. अमित शाह यांनी ट्विट करुन फडणवीस हे सरकारमध्ये सहभागी होतील, असे जाहीर केले होते. त्यानंतर फडणवीस यांनी नाराजीनेच उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर फ़डणवीस यांना मुद्दाम लांब ठेवले जात आहे का, अशीही चर्चा रंगली आहे.