Ramesh Holbole : मराठी दिग्दर्शकाचा जर्मनीच्या मदतीनं चित्रपट, धिस साइड ऑफ पॅराडाईज

Update: 2025-04-20 15:23 GMT

महाराष्ट्रातल्या दुर्गम भागातला, दलित कुटुंबातला रमेश होलबोले पुण्यात शिक्षणासाठी येतो. फर्ग्युसन महाविद्यालयात शिकतो. त्यानंतर तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकण्यासाठी जातो, तिथं अभ्यास करतो आणि प्राध्यापक होण्यासाठीच्या सेट-नेट या परीक्षाही उत्तीर्ण होतो. मात्र, त्याचं सृजन मन तिथं काही रमत नाही...नंतर तो भारतातील एका राष्ट्रीय चित्रपट संस्थेत प्रवेश घेण्यासाठीची तयारी करतो. तब्बल दहा वर्षे तयारी केल्यानंतर त्याला त्यात यश मिळतं. मात्र, तरीही त्याच्या मनातली अस्वस्थता त्याला काही शांत बसू देईना...त्याला मोठी कलाकृती रुपेरी पडद्यावर आणायची होती...त्यातूनच त्यानं जर्मनी गाठली आणि तिथं चित्रपटाचं शिक्षण घेतलं... आता याच मराठमोळ्या दिग्दर्शक असलेल्या रमेश होलबोले यांचा धिस साइड ऑफ पॅराडाईज हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. त्यानिमित्तानं विनायक लष्कर या त्यांच्या मित्रानं सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या या भावना इथं मांडल्या आहेत.

खरंतर रमेशचा आणि माझा पहिला परिचय झाला तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये. निमित्त होते तो अमेरिकेतील ब्लॅक थिएटरवर पीएचडीचे संशोधन करत होता. जस जसा आमचा परिचय वाढत गेला तसतसा रमेश मला उलगडत गेला. महाराष्ट्रातील दुर्गम भागातील दलित कुटुंबात जन्माला आलेला रमेश प्रचंड विलक्षण वाटला. त्याची उत्कंठा, नवीन काहीतरी चांगलं करण्याची आस माझ्या मनाला भावत गेली. तो भेटला की नेहमी त्याच्या प्रादेशिक जात वर्गीय अनुभवांविषयी भरभरून बोलायचा. प्रचंड आत्मविश्वास, उत्साह आणि आपल्या जगण्याला अंतर्बाह्य बदलण्यासाठीचे सततचे प्रयत्न हे मला अधिक आश्वासक वाटत गेले. मी नकळतपणे त्याच्या जगण्याचा भाग होत गेलो.

रमेशची कौटुंबिक पार्श्वभूमी अत्यंत बेताची. परंतु अभ्यास आणि कमालीची जिद्द या बळावर तो नेहमीच चांगलं काहीतरी करत आयुष्य जगण्याचा अट्टाहास धरत राहिला. नांदेड जिल्ह्यातील अतिशय छोट्या गावापासून ते जर्मनीपर्यंतचा त्याचा प्रवास थक्क करणारा आहे. खरंतर तो उच्च शिक्षण घेणारा पहिल्या पिढीतील मुलगा. आई वडील बांधकाम मजूर असल्याने सतत आर्थिक अडचणीत जीवन जगणारा. तो महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्यात आणि त्यातही फर्ग्युसन महाविद्यालयात आला, याची मला खूप कमाल वाटली. माझं देखील स्वप्न पुण्यात आणि फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकण्याचं होतं. माझ्या घरची परिस्थिती चांगली होती तरी पण मला माझी ही इच्छा पूर्ण करता आली नाही त्यामुळे मला रमेशचा नेहमीच हेवा वाटत राहिला.


 



नंतर तो पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये दाखल झाला. त्याने पहिल्याच प्रयत्नात प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणाऱ्या सेट आणि नेट या दोन्ही पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यानंतर तो संशोधनात रमला. परंतु त्याची कलात्मक दृष्टी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो सातत्याने वसतिगृहामध्ये त्याच्या खोलीतील संगणकावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रपट पाहायचा त्यांचे विश्लेषण करायचा आणि आम्हाला प्रत्येक गोष्ट उलगडून सांगायचा. त्याच्यातला कलाकार त्याला शांत बसू देत नव्हता. याच अशांततेने त्याला भारतातील नामांकित चित्रपट निर्माण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रेरित केले. जवळपास तो दहा वर्ष या संस्थेची चाचणी परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करत होता. अखेर त्याला यश आले आणि तो या राष्ट्रीय संस्थेचा विद्यार्थी झाला. या संस्थेमध्ये शिकत असताना त्याने त्याच्या अनुभवांना कलात्मक दृष्टिकोनातून आकाराला आणण्याचा अतोनात प्रयत्न केला. या प्रयत्नासाठी त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवण्यात आले. यानंतरही तो शांत राहिला नाही. त्याने पुढील शिक्षणासाठी जर्मनी गाठले. आणि आज तो आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक म्हणून नावारूपाला येत आहे. भरपूर काम करत आहे.

रमेशच्या या प्रामाणिक प्रयत्नांना आपण बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे आणि त्याला बळ दिलं पाहिजे. असं मला प्रामाणिकपणे वाटतं. एखादी व्यक्ती जग बदलण्यासाठी अल्पसा वाटा उचलत असेल तर आपण त्याला सकारात्मक आणि कृतीशील साद दिलीच पाहिजे. त्याला अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्याचं काम अधिक चांगलं होण्यासाठी त्याच्या कामाची चिकित्सा देखील केली पाहिजे.

Tags:    

Similar News