लडाख, सॅनिटरी पॅड्स आणि भारतीय सिनेमा…
समाजात चित्रपटांमुळे बदलाव होतो का? समाजाला चांगले-वाईट वळण चित्रपटांमुळे लागते का? वास्तवात जगताना प्रत्येकाला एकदा तरी या गोष्टीचा अनुभव येतो... असाच प्रवासातला अनुभव शेअर करतायेत अजित अनुशशी...;
सिनेमाने प्रबोधन होतं का? किंवा सिनेमातल्या वाईट गोष्टींनी समाजाला चुकीचं वळण लागत का? मग सिनेमा हा कशासाठी बनवावा? निव्वळ फायद्यासाठी का समाजाला भलंबुरं वळण लावण्यासाठी? हे सगळे अनेक दशक चालत आलेले वादाचे विषय आहेत.
पण सिनेमाचा परिणाम असतो यात शंका नाही आणि याचं एक अतिशय प्रत्ययकारी उदाहरण मला माझ्या लडाखच्या टूर मध्ये दिसलं. कोणी एकेकाळी लेह हे अत्यंत मागास, छोटसं, खडतर नैसर्गिक परिस्थितीत कसंबसं जगणारं आणि तुलनेत गरीब म्हणता येईल, असं शहर होतं. 99 चा कारगिल युद्ध सोडलं तर लेहच्या आजूबाजूच्या ठिकाणांची फारशी कोणालाच माहिती नव्हती. साहसाची हौस असलेले काही देशी-विदेशी बाईकर्स किंवा ट्रेकर्स वगळले तर इथे फारसे पर्यटक फडकत नसत. पण आमिर खानचा थ्री इडियट झाला आणि त्यातल्या Pangong lake ची अत्यंत रमणीय चित्रं पाहून भारतीय पर्यटकांचे कुतूहल जागं झालं. त्यानंतरच्या 15 वर्षात, एक महाकाय रोगाची साथ धरून सुद्धा, या संपूर्ण शहराचा पूर्ण कायापालट झालेला आहे. शहरात घरापेक्षा जास्त हॉटेल्स किंवा होम स्टेज आहेत. जागोजागी पर्यटकांना गाड्या भाड्याने देण्याची दुकान आहेत. रेस्ट्रॉ वगैरे तर आहेतच. आजूबाजूच्या प्रदेशातल्या रमणीय स्थळांकडे नेणाऱ्या रस्त्यांची परिस्थिती ही बरीच सुधारलेली आहे. कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. वेगवेगळ्या स्तरातले लडाखचे नागरिकच ही गोष्ट अतिशय स्वच्छपणे मान्य करतात.
असाच दुसरा किस्सा अक्षय कुमारच्या पॅडमॅन चा आहे. काही वर्षांपूर्वी एका सामाजिक संस्थेसाठी छत्तीसगड मधल्या अर्धशिक्षित कार्यकर्त्यांच्या गटासाठी मी वक्तृत्व प्रशिक्षण कार्यशाळा घेत होतो. खरंतर या कार्यकर्त्यांची विचारधारा ही काहीशी प्रतिगामी म्हणता येईल, या सदरातलीच… म्हणून मी मुद्दामहून त्यांना ‘पाळीच्या काळात स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन’ असा विषय त्यांची अभिव्यक्ती मांडण्यासाठी दिला. त्यातल्या 80% लोकांनी या काळात स्त्रीकडे सकारात्मकपणे पाहिलं पाहिजे, तिला खूप थकवा येऊ शकतो, तिची काळजी घ्यायला पाहिजे, त्यात काहीच वाईट किंवा अस्वच्छ नसतं, अशा स्वरूपाचे विचार मांडले. (अर्थात या विषयाच्या अनुषंगाने अजून एक किस्सा आहे जो मी स्वतंत्र पोस्टमध्ये मांडेन.) नंतर चहापानाच्या वेळी त्याच लोकांशी गप्पा मारताना जाणवलं की त्यांच्या विचारात पडलेला हा फरक अक्षय कुमारच्या पॅडमॅन मुळे आहे. भले त्याची सत्ताधार्यांना धार्जिनी वृत्ती कितीही निषेधार्थ असो, आंबा चोखून कापून वगैरे असले भंपक प्रश्न त्याला पडत असतील. पण पॅडमॅन करून त्याने नक्कीच भारतीय समाजाला महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.
ही फक्त निरीक्षण आहेत. सिनेमामुळे चांगलंच होतं किंवा वाईटच होतं किंवा याच कारणासाठी ते बनवले जावे अशा प्रकारची कुठलीही मांडणी करण्याचा प्रयत्न नाही…