"क्या यही प्यार है?"

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं या जगप्रसिध्द ओळी लता दीदी आणि किशोरदांच्या आवाजाबाबतीत आपण प्रत्येक जण अनुभवतोच. आज हे दोघेही हयात नाहीत पण त्या दोघांनी गायलेली गाणी ऐकला की म्हणावसं वाटतं ‘क्या यही प्यार है?’ असं का ते सोदाहरण जाणून घेण्यासाठी वाचा श्रीनिवास बेलसरे यांचा हा लेख...

Update: 2022-10-01 04:41 GMT

 जॉन अॅव्हील्ड्सन यांचा 'रॉकी' नावाचा अमेरिकी सिनेमा आला होता १९७६ला. जागतिक हेव्हीवेट बॉक्सिंग चॅम्पियन अपोलो क्रीड एक बॉक्सिंग स्पर्धा जाहीर करतो मात्र अचानक त्याचा प्रतिस्पर्धी 'मॅक ली ग्रीन' खेळू शकत नसल्याने क्रीड एका स्थानिक बॉक्सिंग खेळाडूला संधी द्यायचे ठरवतो. यातून निर्माण झालेले नाट्य ही सिनेमाची कथा होती. सिनेमाला १० अकादमी नामांकने मिळाली. त्याशिवाय ५ ब्रिटीश अकादमी फिल्म नामांकने आणि ६ गोल्डन ग्लोब नामांकने अशी इतर ११ म्हणजे एकूण २१ नामांकने मिळाली होती! त्यातली ३ अकादमी पारितोषिके आणि १ ब्रिटीश अकादमी फिल्म पारितोषिक त्याने पटकालेही!

पण याचा सुनील दत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या 'रॉकी'शी काहीही संबंध नाही. सुनील दत्त यांनी काढलेला 'रॉकी'(१९८१) हा केवळ संजय दत्तला चित्रपटसृष्टीत लाँच करण्यासाठी काढला होता! त्यात संजय दत्तची नायिका होती टीना मुनीम! याशिवाय रीना रॉय, अमझद खान, राखी, रणजीत, शक्ती कपूर, अरुणा इराणी, शशिकला, केस्टो मुखर्जी, इफ्तेखार, अन्वर हुसेन, जलाल आगा, गुलशन ग्रोव्हर असे एकापेक्षा एक कलाकार होते. स्वत: सुनील दत्त आणि शम्मी कपूरही पाहुणे कलाकार म्हणून कथेच्या ओघाने येऊन गेले. रॉकीमध्ये एकूण ७ गाणी होती. त्यापैकी "आ देखे जरा, किसमे कितना हैं दम!' आणि "क्या यही प्यार हैं?" ही दोन्ही हिट ठरली!

संजय दत्तच्या चेह-यावर एक जन्मजात निरागस, भाबडा भाव आहे. मुन्नाभाई मालिकेतले त्याचे बहुतेक सिनेमा हिट होण्यामागचे महत्वाचे कारण जसे राजकुमार हिरानी यांचे कल्पक दिग्दर्शन आहे तसेच संजयच्या चेह-यावर सतत विराजमान असणारा हा निरागसपणा, भाबडेपणाही आहे हे जाणकार मान्य करतील.

अबोध वयात जेंव्हा एखाद्या तरुणाच्या किंवा तरुणीच्या मनात प्रथमच प्रेमभावना जन्म घेते तेंव्हा त्याचे त्यालाच 'हे काय आहे' ते कळत नसते. तो आपल्या मनातच चाचपडत असतो. आनंद बक्षी या सिद्धहस्त गीतकारांनी ही केवढी तरी संदिग्ध, अमूर्त, अबोध मनोवस्था एका गाण्यात अवघ्या २ कडव्यात उतरवली होती. आर.डी.च्या जबरदस्त संगीत दिग्दर्शनात किशोरदांनी कहर केलेल्या या गाण्याचे शब्द होते-

"क्या यही प्यार है?
ओ दिल तेरे बिन कहीं लगता नहीं,
वक़्त गुजरता नहीं, क्या यही प्यार है?"

या गाण्याची गंमत म्हणजे ज्या किशोरदांनी सुनील दत्तला 'पडोसन' साठी १९६८ ला आवाज दिला तेच किशोरदा सुनीलजींच्या कोवळ्या वयातील मुलाला १९८१साली तोच आवाज देत आहेत. तेही तितक्याच समरसून, तितक्याच उत्कटतेने! आणि आपली लतादीदी तर काय, केवळ चमत्कारच! चिरतरुण स्वरांची प्रचंड खाण! रॉकीच्या रिलीजच्या वेळी फक्त २४ वर्षांची तरुणी असलेल्या टीना मुनिमाला ५२ वर्षांच्या लतादिदिनी असा आवाज दिलाय की कुणीही त्यांच्या जन्मतारखेबद्दल शंका घ्यावी! ज्याच्यासाठी गात आहोत त्याच्या व्यक्तिमत्वाशी पूर्ण समरस झाल्याशिवाय असा स्वर गवसूच शकत नाही. किशोरदा, लतादिदींची कलेवरची केवढी ही निष्ठा!

अतिशय मुग्ध, आत्ममग्न सुरात जेंव्हा संजयच्या तोंडी शब्द येतात, 'क्या यही प्यार हैं?' त्या पाठोपाठ टीनाच्या ओठावर एखाद्या हुंकारासारखा दिदीचा नितळ नाजूक स्वर येतो, "हा. यही प्यार हैं!" आणि मग श्रोत्याची तंद्रीच लागते.

'पहले मैं समझा, कुछ और वजह इन बातोंकी,
लेकिन अब जाना, कहाँ नींद गयी मेरी रातोंकी,
क्या यही प्यार हैं?...'

आणि हेच होते ना पहिल्यावहिल्या प्रेमात! मनासमोर दुसरा चेहराच येत नाही. सतत तोच एक चेहरा मनाचे अवघे आकाश व्यापून राहतो. शिवाय असे होण्याचे कारण काय तेही कळत नाही. तिचीही अवस्था तीच आहे. तीही म्हणते. मलाही रात्ररात्र झोप येत नाही. माझ्या रात्रीत तर चंद्र उगवतच नाही-

"जागती रहती हूँ मैं भी,
चाँद निकलता नहीं.
दिल तेरे बिन कहीं लगता नहीं,
वक़्त गुजरता नहीं...
क्या यही प्यार है?....'

अजून प्रेमाची निश्चिती झाली नाही आणि तरीही तिला पुढच्या संभाव्य दुराव्याची कल्पनाही सहन होत नाही. ती म्हणते-

"कैसे भूलूँगी, तू याद हमेशा आएगा.
तेरे जानेसे, जीना मुश्किल हो जाएगा.
अब कुछ भी हो दिलपे,
कोई ज़ोर तो चलता नहीं.
दिल तेरेबिन कहीं लगता नहीं,
वक़्त गुजरता नहीं. क्या यही..."

प्रेमात सुरवातीला पराकोटीचे सुख, आनंद, उन्माद अनुभवाला येतो आणि नंतर मात्र अनेक शंकाकुशंकाचा संशयकल्लोळ हेच जवळजवळ प्रत्येकाचे नशीब असते. मनात प्रेमाची बाग फुलून नाजूक गोड फुले डोलू लागली की हमखास शिशिराच्या शंकेचा थंडगार वारा सुटतो. वसंताचे हे सुख असेच टिकून राहील की नाही, ही चिंता मनाला भेडसावू लागते. आताचे उत्सवी मिलन शिशिरातही टिकून राहील? ही शंका मनात येत नाही तर लगेच दोघातील एक उत्तर देतो, "ऋतू बदलतील, जग बदलेल, पण आपले प्रेम असेच अखंड आणि शाश्वत राहील."

'जैसे फूलोंके मौसममें ये दिल खिलते है,
प्रेमी ऐसेही, क्या पतझड़में भी मिलते हैं?
ऋत बदले, दुनिया बदले, प्यार बदलता नहीं!
दिल तेरे बिन कहीं लगता नहीं, वक़्त गुजरता नहीं
क्या यही प्यार है, हाँ यही प्यार है....'

हे गाणे आजही ऐकले तर या सिनेमाला तब्बल ४१वर्षे होऊन गेली आहेत हे खरेच वाटत नाही! पण तसेही पंचमदाच्या संगीताला, आनंदजींच्या शब्दांना, किशोरदांच्या आणि दीदीच्या आवाजाला देवाने वयाची अट ठेवलीच नव्हती ना!

*

©श्रीनिवास बेलसरे

७२०८६३३००३

Tags:    

Similar News