परमबीर सिंहांचा पाय आणखी खोलात, ACB करणार चौकशी

Update: 2021-09-22 02:00 GMT

कल्याण :  ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना परमबीर सिंग ह्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आऱोप पोलीस निरीक्षक घाडगे यांनी केला आहे. त्यांच्या या तक्रारीवरुन त्यांनी केलेल्या आरोपांच्या अनुंषगाने एन्टी करप्शन विभागाने उघड चौकशी करावी असे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीतील विविध बिल्डर, भुमाफ़ीया, रेती माफ़ीया तसेच पोलीस अधिका-यांसह राजकीय नेत्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

कलम ३०७ च्या खोटया गुन्ह्यात अडकविण्यात आल्यामुळे पी.आय.घाडगेंनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये परमवीर सिंगासह ३३ लोकांविरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये पी.आय.घाडगे ह्यांनी परमवीर सिंग व सबंधितांवर ५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचा केल्याची तक्रार पोलिसांकडे केलेली होती. त्यांच्या तक्रारीतील २४ आरोपांच्या अनुंषगाने एन्टी करप्शन विभागाने उघड चौकशी करण्याचे आदेश झालेले आहेत.

परमवीर सिंग हे प्रत्येक डीसीपीकडुन दिवाळीत ४० तोळे सोने घेत होते, तसेच इतर पोलीस अधिका-यांनकडुन सोने घेणे, पोलीस स्टेशन इनचार्ज पद देताना पैसे स्वीकारणे, मिरारोड कॉल सेंटर केसमधील आरोपींची नावे काढणे, सोलापुर ड्रग्ज केसमध्ये आरोपींची नावे काढणे, गर्भश्रीमंत आरोपींची नावे काढण्यासाठी पैसे घेणे, बिल्डरांची सेटलमेंट तसेच रिव्हॉल्वर लायसन्ससाठी प्रकाश मुथा नामक व्यक्तीची त्यांनी कल्याणमध्ये नियुक्तीच केलेली होती, परमवीर सिंगाची शासकीय कार्यालये, कल्याण-डोंबिवलीतील टिडीआर घोटाळा, सलील चर्तुवेदी ड्रग्ज केस, तेलगीच्या बनावट स्टम्प छापखान्याला अभय असे एकुण मिळुन २४ आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले होते. या आदेशामुळे आता परमबीर सिंह यांच्याशी लागेबांधे असणाऱ्या सर्वांच्या मागे चौकशीचा ससेमिरा आणि पुढील कार्यवाहीची टांगती तलवार आहे.

Tags:    

Similar News