उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमधे शेतकऱ्यांना चिरडून मारण्याच्या घटनेवरुन देशभरात संताप होता. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन आज राज्यव्यापी महाराष्ट्र बंद आयोजीत केला होता. कॉंग्रेस- राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येऊन ताकद लावल्याने बंदला चांगला प्रतिसाद मिळाला.
आघाडी सरकारच्या दृष्टीने बंद यशस्वी झाला ही चांगली बातमी असली तरी केंद्रीय तपास संस्थांचा आघाडीसरकारच्या मागे लागलेला ससेमिरी काही थांबलेला नाही. १०० कोटींच्या हप्तेवसुलीच्या आरोपावरुन पायऊतार झालेले मंत्री अनिल देशमुख यांचा सध्या थांगपत्ता नाही. परंतू आज सकाळी सीबीआयचे एक पथक त्यांच्या नागपूरच्या निवासस्थानी पोचले होते. सीबीआयने सकाळी 8 च्या सुमारास ही छापेमारी केली. सहा-सात अधिकाऱ्यांनी देशमुखांच्या नागपुरातील घरात प्रवेश करुन झाडाझडती सुरु केली. सीबीआयच्या धाडीननंतर बाहेर पडताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सीबीआय विरोधात घोषणाबाजी केली.
अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँडरिंग आणि 100 कोटी वसुली प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. मागील आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांना नोटीस बजावून 16 नोव्हेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार देखील केंद्रीय तपास संस्थाच्या रडावर आहेत.अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या काही कंपन्या आणि कारखान्यांची आयकर विभागाकडून सुरु असलेली छापेमारी पाचव्या दिवशीही सुरुच आहे. महाराष्ट्रातील तपास पूर्ण झाल्यानंतर आज आयकर विभागाने हैदराबाद आणि जयपूरमधील काही धाडी टाकल्या. हैद्राबाद मधील Hetero फार्मास्युटिकल ग्रुप वर धाडीत १४२ कोटी रूपयांची रोकड सापडल्याचे वृत्त आहे. तर जयपूरमधील फेअरमाऊंट, ली मिरीडीअन हॉटेल्सवरही धाडी टाकल्या आहे. एकंदरीत एका बाजून महाराष्ट्र बंद यशस्वी होत असताना केंद्रीय तपाससंस्थांच्या कारवाईनं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवली आहे.