देवेंद्र फडणवीस अतिशय चांगले राजकारणी आहेत. त्यांच्या कार्यकर्तृत्वा बद्दल विरोधी पक्ष ही त्यांची तारिफ करत असतात. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांची आपण सकारात्मक दखल घेतो, आणि त्या पद्धतीने कार्यवाही करायचे आदेश ही देतो असं ते भाषणात सांगत असतात. असं असलं तरी त्यांच्याबद्दल सगळ्याच बातम्या सकारात्मक छापून येत असल्याने त्यांना कारवाई करण्यासाठीही बातम्या सापडत नसाव्यात असं वाटायला लागलंय.
देवेंद्र फडणवीस सध्या महाजनादेश यात्रेवर आहेत. या यात्रेची खरंच महाराष्ट्राला काही गरज नाहीय. ही यात्रा सरकारी आहे की शासकीय सुट्टी टाकून केली जातेय मला माहित नाही. ज्या अर्थी या यात्रेसाठी पक्षाच्या सोबतीने सरकारी यंत्रणा राबतेय, त्या अर्थी ही अर्धशासकीय यात्रा असावी असं गृहीत धरायला हरकत नसावी.
या यात्रेच्या काळात मुख्यमंत्री हाफ डे लावतात की पूर्ण दिवसांची सुट्टी लावतात, की सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे गैरजहर पण मस्टर वर हजर असं रेकॉर्ड बनवतात हा पूर्णतः तांत्रिक भाग आहे. देवेंद्र फडणवीस हे अद्यापही मुख्यमंत्री असल्याने, त्यांना कार्यवाही करण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे, म्हणून ही थोडीशी प्रस्तावना. या प्रस्तावनेतले मुद्दे नजिकच्या काळात मुख्यमंत्र्यांना त्रासदायक ठरणारच आहेत, पण त्यावर पुढे कधीतरी बोलता येईल.
इतर मुख्यमंत्र्यांपेक्षा देवेंद्र फडणवीस यांना जास्त धोका असल्याने त्यांना जास्तीची सुरक्षा असते. मध्यंतरी बातम्या आल्या त्याप्रमाणे त्यांना नक्षलवाद्यांकडून धोका आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला नक्षलवादी, दहशतवादी यांच्याकडून धोका असतोच. या पदावर बसलेल्या माणसाने हा धोका गृहीत धरलेला असतो. पण, सध्या मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जो धोका सामान्य माणसांना निर्माण झाला आहे, त्याबद्दल ही बोललं गेलं पाहिजे असं मला वाटतं.
मुख्यमंत्र्यांची यात्रा ज्या ज्या जिल्ह्यामधून जातेय तिथे तिथे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना ताब्यात घेतलं जात आहे किंवा स्थानबद्ध केलं जात आहे. मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या वृद्ध पत्नीला देवेंद्र फडणवीसांचे पोलीस कशाच्या आधारावर स्थानबद्ध करतात. असा कुठला धोका तुम्हाला एका मृत शेतकऱ्याच्या वृद्ध बायको पासून आहे. तुमच्यातली संवेदनशीलता संपलीय का... ज्या लोकांचा जनादेश तुम्हाला पाहिजे, त्यातल्या अशा पिडीत घटकाला तुम्ही पोलीसी कारवाईने दाबून टाकणार आहात का..?
आज सत्ता असल्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारले की लोकांना देशशद्रोही ठरवलं जातंय. पण हे प्रश्न तुम्हाला विचारले गेलेच पाहिजेत. मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून तुम्हाला जर लोकांची भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बंगल्यात बसा. रस्त्यावर फिरू नका. कधी गर्दीत साप सोडण्यात येण्याची अफवा पसरवायची, कधी राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायचं, कधी शेतकऱ्यांना स्थानबद्ध करायचं... आणि वर मला आशिर्वाद द्या अशी मागणी करायची. तुमचे आणि महाराष्ट्रातल्या सामान्य माणसांचे अधिकार सारखेच आहेत, सर्वच जण समान नागरिक आहेत. तुमच्या यात्रा बंद झाल्या चालतील पण लोकांच्या अधिकारांचा संकोच करू नका.