" देव - दानव " यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरील महाड मधील गवळ आळीतील होळी.

Update: 2024-03-26 05:33 GMT

महाड मधील श्री विरेश्वर महाराजांचा छबिना उत्त्सव झाला की वेध लागतात ते होळीचे. पोर्णिमेच्या आधी पासूनच त्याची तयारी चालू असते. फाल्गुन महिन्याच्या पंचमी पासून होळी लावायला सुरवात होते . त्याला होलिष्टक म्हणतात. तिचे स्वरूप लहान असते. मिळेल त्या लाकडाची आणि अनावश्यक गोष्टी या होळी मधे भस्मसात केल्या जातात. लहान मुले यात हिररीने भाग घेतात. त्यांच्या मदतीला तरुण वर्ग असतो.

मुख्य होळी पौर्णिमेच्या दिवशी महाडच्या गाव देवीची होळी मुहूर्ताप्रमाणे प्रथम लागते. त्याआधी ग्रामदेवता श्री जाखमाता देवीच्या मंदिरात गावकरी जमतात. श्री विरेश्वर महाराज संस्थानचे सरपंच आणि पंच यांना आमंत्रण दिले जाते. महाजन येतात, गुरव वाजंत्री घेऊन येतात, ग्रामदेवता श्री जाखमता देवीची अर्चना आणि मनसून मानाची काठी आणि अबदाऱ्या घेऊन नगारा ढोल ताश्याच्या जोरावर गावकरी सालिवाडा येथे जातात. तिथे प्रथेप्रमाणे जंगम आणि महाजन यांच्या मार्गदर्शना खाली पूजा अर्चा होते आणि होळी भोवती फाक म्हणत होम लावला जातो.अलोट गर्दी आणि तरुणांचा उत्साह ओसंडून वहात असतो, होमाला श्रीफळ आर्पीले जाते, महिला वर्ग खूप मोठ्या प्रमाणात उपस्थित असतो.

गावदेवीचा होम लागला की महाड मधील सर्व अळी मधील होम लावले जातात. एव्हढंच नव्हे तर सावित्री नदी मधील खडी मधे राहणारे आदिवासी बांधव यांची सुद्धा होळी लागते. हळू हळू महाडकरांची पावले गवळ अळी कडे पडू लागतात. गवळ अळी मधील होळी मोठ्या स्वरूपात रचली जाते. होमाला लागणारे हळकुंड (शेवर किंवा तत्सम मोठे झाड) वाजत गाजत खालू, बाजा आणि लेझिम नाचवत बैल गाडीतून आणले जाते. तरुण वर्ग सदरहू जागेची साफसफाई करून पाणी शिंपडतात. मानकरी गणपत लक्ष्मण पाटील त्यांचा मुलगा अविनाश पाटील आणि कुटुंबीय उपस्थित असतात. गणपत पाटील आणि आळीतील ज्येष्ठ नागरिक यांच्या कमिटी मार्गदर्शनाखाली होळी रचली जाते. रांगोळी काढली जाते. गणपत पाटील यांनी वयोमानापरत्वे मानकरी म्हणून असणारे याबाबतीतले मान आळीतील स्थानिक समितिकडे आता सोपवलेले आहेत. त्याप्रमाणे तरुण वर्ग काम करत असतो.

होळी रचतात त्याला शाकारणे असे म्हणतात. हे शाकारण्याचे काम मुख्य हळकुंड होळीच्या जागेवर आल्यानंतर चालु होते.मिळालेली फाटी, लाकडे, पेंढा मूळ हळकुंडाच्या भोवती रचून एका काळकीच्या काठीला शित बांधले जाते. शीत म्हणजे कोंबडे बांधले जाते आणि ते शीत रचलेल्या होळीलाच लावले जाते. सडा शिंपून रांगोळ्या काढल्या जातात.रीतसर मानकरी पूजा अर्चा करून होळीला मनसतात. नवैद्य दाखवला जातो. तत्पूर्वी तरुणांचा एक मोठा गट ' होळी शिंपयाला चला र - होळी लावायला चला र ' असे आवाहन करीत गवळ आळीतून परीट अळीतून फिरतात. त्याबरोबर बनवलेली सोंगे हातगाडीवर असतात. होळी भोवती मोठ्या संख्येने जमून गोल रिंगण करून

फेरा घेत फाक म्हटला जातो. हा फाक पूर्वी गणपत पाटील यांचे बंधू मेहतर पाटील म्हणत असत.

फाक खालील प्रमाणे म्हटला जातो -----

तो ह्यो कल्कीचे बेटी एक कोंब उपजला

वाकडा - तिकडा कोम गगनाशी गेला

त्ये ह्यो कोंम गेला सुतारा घरी

सुतार दादांनी सुतार माझा त्यो केला

तो ह्यो कोम त्यानं पालखी जोडीला

त्या ह्यो पालखीत कोण देव बस

त्या ह्यो पालखीत चंद्र सूर्य बस

सोन्याचं दांड म्हंजे रूप्याच ठस

वाकडा तीकडा कोंब गगनाशी गेला

तो ह्यो पालखीत कोण देव बस

तो ह्यो पलाखित गणपती बस

सोन्याचं दांड म्हंजे रूप्याच ठस

सोन्याचं दांड जस रूप्याच ठस

वाकडा - तिकडा कोंम गगनाशी गेला

तो हो कोंब गेला सालिया घरी

सालिया दादांनी हू तू तू तू केला

त्त्यो हो कोंम त्यानं पालखी जोडीला

त्यो हो पालखीत कोण देव बस

त्या हो पालखीत विरोबा बस

कल्कीचे बेटी एक कोंबडी बांधिला

वाकडा - तीकडा कोंम गगनाशी गेला

त्या हो कोंम गेला सोनारा घरी

सोनारा दादांनी हु तू तू तू केला

सोनियाच नांग म्हंजे रुपयाचं ठस

त्योहो कोंम त्यानं पालखी जोडीला

त्याहो पालखीत कोण देव बस

त्या हो पालखीत झोलाई बस

कल्कीचे बेटी एक कोंबडी बांधिला

वाकडा - तिकडा कोंम गगनाशी गेला

त्योहों कोंम गेला लोहरा घरी

लोहारा दादांनी लव्ह बंद केला

त्यो हो कोंम त्याने पालखी जोडीला

त्या हो पालखीत कोण देव बस

त्या हो पालखित जाखमाता बस

कल्कीचे बेटी एक कोंबडी बांधला

वाकडा - तिकडा कोंम गगनाशी गेला

त्यो ह्यो कोंम नेला पालखी जोडीला

त्या हो पालखीत कोण देव बस

त्या हो पालखीत कोटेश्वरी बस

कल्कीचे बेटी एक कोंबडी बांधला

वाकडा - तिकडा कोंम गगनाशी गेला

त्यो ह्यो कोंम नेला पालखी जोडीला

त्यो ह्यो पालखीत कोण देव बस

त्यो ह्यो पालखीत सोमजाई बस

कल्कीचे बेटी एक कोंबडा बांधिला

वाकडा - तीकडा कोंम गगनाशी गेला

त्यो ह्यो कोंम नेला पालखी जोडीला

त्यो ह्यो पालखीत कोण देव बस

त्यो ह्यो पालखीत कळंबा बस

असा फाक म्हणत म्हणत संपत आला की , ' सन सनुन टिंग्री रे ---------- अशी जोरात हळी मारून होम लावला जातो आणि त्याच्या दोन उलटे - सुळते रिंगण करून ' होयद बा , होयद बा ' म्हणत हातातील लाकडाने एकमेकांच्या लाकडाना

मारत फेर धरला जातो.त्याच वेळेस दानवांची फेऱ्यात गुपचूप शिरलेली टोळी हळूच होळीला बांधलेलं शीत ( कोंबड )काठी सकट पळवून नेतात.

दानवांची टोळी सावित्री नदीच्या राम घाटावर पळवलेल शीत ( कोंबड ) भाजून त्यावर ताव मारतात.परत होळीच्या संरक्षण करणाऱ्या देवांवर हल्ला करण्याचा बेत अखून काही मिळतंय का याचा विचार करतात.त्यासाठी ते जळत्या पलित्यांचा शस्त्र म्हणून उपयोग करतात. देव बेसावध असतील असे वाटून होळी भोवती जमलेल्या देवानं वर हल्ला करतात.देव पण जशाश तसे उत्तर देतात.जळत्या पलित्यांच घमासान युद्ध होते.

हे युद्ध पाहण्यासाठी अलोट गर्दी श्री प्रभू राम मंदिर आणि कारेकर आणि जैतपाल यांच्या घरासमोर होते.ही प्रथा शेकडो वर्षांची आहे.रायगड जिल्हाच नव्हे तर कोकणात इतर कोठे आहे हे ऐकिवात नाही.फार मोठी दुखापत झालेली पण ऐकिवात नाही.युद्ध संपल्यावर दोन्ही कडच्या बाजूचे सैनिक एकमेकाची विचारपूस करून फेकलेले पलिते घेऊन परत होळी भोवती उलटे - सुलटे गोलरींगण हातातले पलीते एकमेकांच्या पलित्यावर अपटत ' होयद बा, होयद बा ' करत गोल फिरतात. परत सन सनुन टींग्री रे ज्याला लावायची आहे त्याला तींग्री लावतात.

हा सगळा सोहळा रंग - पंचमी पर्यंत चालतो.दिवस बघून गोंधळ घातला जातो. सवाशिणी पुजल्या जातात.मान दिला जातो.त्याचे वाटप घरोघरी व्यवस्थित केले जाते.रात्री गोंधळ मोठ्या प्रमाणात होतो. रंग - पंचमीला सगळे सोपस्कार पुरे करून रंग - पंचमी मोठ्या प्रमाणात साजरी होते.अबाल वृद्ध सगळे त्यात भाग घेतात.गावदेविची रंगाची गाडी श्री विरेश्वरास रंग उधळून आली की रंगपंचमी थांबते. मानकरी कमिटी होळीच्या ठिकाणी परत जाऊन मनसतात पाया पडतात आणि सर्वांच्या शुभ कामना व्यक्त करतात.

@ मिलिंद टिपणीस

     महाड

Tags:    

Similar News

यंदा कोण...?