राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले अतोनात नुकसान, नोव्हेंबर महिन्यातही न थांबणारा अवकाळी पाऊस, कधी चक्रीवादळ तर कधी ओला-सुका दुष्काळ, हे कमी की काय? म्हणून वाचलेल्या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव. ग्रामीण अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडणारं वर्ष. शहरातही धडाधड कारखाने बंद पडतायत. बेरोजगारी वाढतंय. रस्त्यांची दुर्दशा, रखडलेले प्रकल्प, बकालीकरण, आरोग्य अशा अनेक समस्या वाढतायत.
आर्थिक मंदींने दरवाजावर धडका द्यायला सुरूवात केली. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सत्तासंपादनाच्या यात्रेवर निघाले होते. इतकं सगळं होत असतानाही महाराष्ट्राच्या जनतेनं शिवसेना-भाजपाच्या पदरात सत्तेचं दान टाकलं. दान पदरात पडता क्षणी दानाच्या वाटणीवरून महाराष्ट्रात जो प्रकार सुरू आहे. तो संतापजनक आहे. जनतेनं तुम्हाला स्पष्ट जनादेश दिला आहे. त्याचा अपमान करून राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न केला तर सत्ताधारी पक्षाला ते महागात पडेल.
नोटाबंदी, जीएसटी यामुळे आर्थिक मंदीची चक्रं वेगाने फिरू लागली आहेत. भारत हा सर्वाधिक तरूणांचा देश आहे. या तरूणांच्या आशा-आकांक्षा-अपेक्षा पल्लवित करून नरेंद्र मोदींनी सलग दुसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवली.
याच विश्वासावर राज्यात शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारला जनतेने कौल दिलाय. जनतेने सुस्पष्ट कौल दिल्यानंतर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने जो खेळ चालवला आहे. तो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला अशोभनीय असाच आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेचा पूर्ण ताबा स्वतःकडे ठेवायचा आहे.
मागच्या सरकारमध्ये मित्रपक्षांना ज्या पद्धतीची वागणूक भाजपाने दिली होती. त्यानंतर यंदा तर अतिशय लाजिरवाण्या पद्धतीने मित्रपक्षांना भाजपामध्ये जवळपास विलिन करून टाकलं आहे. शिवसेनेलाही अशीच वागणूक दिली आहे. मागच्या वेळी केंद्रात एक मंत्री पद, यंदा ही एक मंत्री पद यापुढे भाजपा शिवसेनेला सत्तेत फार मोठा वाटा द्यायला तयार नाही.
राज्यातल्या सत्तेत ही शिवसेनेच्या ताटात अधिकचं वाढायला भाजपा तयार नाही. सत्तेचा समसमान वाटा ही शिवसेनेची मागणी जाहीररित्या मांडण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्या मागणीला जाहीर पत्रकार परिषदेमध्ये पुष्टी दिलेली आहे. या मित्रपक्षांमध्ये झालेला करार काय होता? हा जनतेसमोर जाहीर झालेला आहे.
त्या उपर बंद दरवाजा आड जर काही झालं असेल तर त्याच्याशी महाराष्ट्राचा काहीही संबंध नाही. आजच्या घडीला दोन्हीही पक्षांचे वेगवेगळे जाहीरनामे, नेते, कार्यक्रम यासोबत दोन्ही पक्षांची युती याला लोकांनी मतदान केलेले आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा आता महाराष्ट्राच्या जनतेचं देणं लागतात.
राज्य होरपळत असताना सत्ता स्थापन करता येत नाही, ही भाजपा आणि शिवसेनेची चूक आहे. विरोधी पक्षांना विरोधात बसण्याचा जनादेश मिळालेला आहे, सरकार स्थापन होत नाही याला विरोधी पक्ष जबाबदार नाहीत.
भारतीय जनता पक्षाची जी भक्त मंडळी दिवस-रात्र सोशल मिडीयावर ज्या पद्धतीच्या पोस्ट तयार करण्यात शक्ती घालवत आहेत. त्यांनी आपली शक्ती राष्ट्रनिर्माणासाठी वापरायला हवी. राज्यात सरकार अस्तित्वात यायला हवं, आणि ते ही लगेच.
जर सर्वांत मोठ्या पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ही संधी गमावली तर त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. तुमच्या सेटींग तुम्ही बंद दाराआड मिटवून घ्या. महाराष्ट्राच्या जनतेला स्थिर सरकार हवंय. ते देता येत नसेल तर भाजपाने तसं जाहीर करावं. लोकांचा अंत पाहू नये.
विरोधी पक्षांनी शिवसेनेसोबत आघाडी करून सत्तास्थापनेचा अनैसर्गिक प्रयोग करू नये असं आम्ही आधी म्हटलं होतं. पण भारतीय जनता पक्ष जर जनादेशाचा अपमान करत असतील तर अशा परिस्थितीत विरोधी पक्षांनी एकत्र येऊन समान कृती कार्यक्रम आखून सत्ता स्थापन केली पाहिजे.
कुठल्याही स्थितीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्लान हाणून पाडला पाहिजे. राज्यातल्या जनतेने आता हे प्रकरण आपल्या हातात घेतलं पाहिजे. राजकीय पक्षांना जनतेने दट्ट्या दिला पाहिजे, त्या शिवाय ती वठणीवर येणार नाहीत.