झोमॅटो गर्ल तुरुंगाबाहेर, आता सन्मानाने जगण्याचं आव्हान
zomato girl comes out of jail but she is facing challenge to start life eagain;
एखाद्या व्यक्तीने चूक केली तर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. पण छोट्याशा चुकीसाठी तब्बल १४ महिने तुरुंगवास आणि सोशल मीडियावर बदनामी वेगळी....असा अनुभव आला आहे झोमॅटो गर्ल म्हणून चर्चेत आलेल्या महिलेला... 14 महिन्यांपूर्वी पोलिसांशी वाशीच्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांशी उभा पंगा घेणाऱ्या प्रियंका नावाच्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांच्या आरे ला कारे करणारी ही मुलगी झोमॅटो गर्ल म्हणून सर्व सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तिला तब्बल १४ महिन्यांनंतर जामीन मिळाला आणि ती भायखळा जेलमधून बाहेर आली. पण आता पुढे आता जीवनात परत उभे रहाणे हे मोठे आव्हान असल्याचे प्रियंकाने जेलमधून बाहेर आल्यानंतर म्हटले आहे.
प्रयास नावाच्या संघटनेने प्रियंकाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. तर क़ायद्याने वागा संघटनेने हातभार लावला. दोन महीने सतत पाठ पुरवा केला. त्यानंतर प्रियंकाची सुटका झाली. एका विशिष्ट परिस्थितीत प्रियंकाने चूक केली होती. पण तिला एवढे महिने तुरुंगात खितपत पडावं लागले याला पोलीस जबाबदार असल्याचा आरोप कायद्याने वागा चळवळीचे राज असरोंडकर यांनी केला आहे. तसेच सरकारने प्रियंका आण तिच्या ४ वर्षांच्या मुलीचे पालकत्व स्वीकारावे अशा मागणीचे पत्रही गृहमंत्र्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
आता प्रियंका बाहेर आली आहे, वृध्द आई-वडील, चार वर्षांची मुलगी आणि खिशात दमड़ी नाही, हाताला काम नाही अशा स्थितीत प्रियंकाला जीवनाची पुन्हा सुरुवात करायची आहे. त्यातच तिच्यावर पोलिसांनी दाखल केलेल्या खटल्याचे आव्हान आहे. पुढे कोर्टाची लढाई देखील लढायची आहे. ही लढाई लढण्यासाठी आता प्रिंकाला आर्थिक मदतीची गरज आहे. सरकारने तिच्यावरील गुन्हे मागे घेण्याची विनंती तिच्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामाजिक संघटना करत आहेत.
प्रियंकाचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे. तिने आपल्या आवडीच्या तरुणाची प्रेम विवाह केला. पण नंतर तिचे तिच्या पतशी न पटल्याने ती स्वतंत्र राहू लागली. ४ वर्षांच्या मुलीला घेऊन प्रियंकाने नव्याने जीवनाची सुरूवात केली. ती आधी गोव्यामध्ये HR कामाला होती. पण मुंबईत आल्यानंतर तिला नव्याने सुरूवात करावी लागली. दिवसाला दोन वेगवेगळ्या नोकऱ्या ती करु लागली. आपण दररोज तब्बल २० तास काम करत होतो, झोप मिळत नव्हती. पण मुलीला मोठं करुन आयुष्यात पुन्हा उभे राहण्यासाठी आपण काबाड कष्ट केले असे ती सांगते. पण एक दिवस अचानक पोलिसांनी आपली चूक नसताना दंड केला आणि त्यातून आपल्या संतापाचा उद्रेक झाला, असंही प्रियंका मान्य करते. पण या छोट्या चुकीची खूप जास्त शिक्षा आपल्याला मिळाली अशी खंतही ती व्यक्त करते.
पूर्वी गोवा इथे एचआरमध्ये ती कामाला होती. नंतर नवी मुंबईमध्ये झोमॅटोमध्ये डिलिव्हरी गर्ल म्हणून ती काम करत होती. पण एका छोट्याशा चुकीने तिचे जीवन बदलले. तुरुंगात काढलेल्या दिवसांबद्दल सांगताना ती म्हणते, अंडरट्रायल व्यक्तींना वेगळी कामे द्यावी असा नियम आहे, मात्र तिथे संडास साफ करण्यापासून सगळी कामे करावी लागली. त्यात जेवण चोरीला जाणे आणि इतर महिला क़ैदयांची वागणूक फार त्रासदायक ठरली. पोलिसांनी व्हिडिओ वायरल करून आपली प्रतिमा खुप खराब केली, अशी खंत ती व्यक्त करते.
८ ऑगस्ट २०१९ रोजी वाशी येथील सेक्टर १७ मध्ये नो पार्कींग झोनमध्ये गाडी लावल्याने प्रियांका मोगरेचा वाहतूक पोलिसांशी वाद झाला होता. तिच्या विरोधात वाशी पोलिस ठाण्यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे, शांततेचा भंग, धमकी देणे, अशी असी कलमं लावून गुन्हा दाखल केला गेला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. आपण नो पार्किंग झोनमध्ये गाडी लावली नव्हती. तर तिथे आपण गाडी थांबवली आणि गाडीवरच होतो असा दावा प्रियंका करते.
प्रयास संस्था आणि कायद्याने वागा लोक चळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी प्रियंकाला तुरुंगाबाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले. प्रियंकाच्या प्रकरणाचा कायद्याचा वापर तिला अद्दल घडवण्यासाठी केल्याचा आरोप राज असरोंडकर यांनी केला आहे.
दरम्यान प्रियंकाला जामीन मिळूनही तुरुंगात रहावे लागल्याचे सांगताना राज असरोंडकर यांनी याची जबाबदारी सरकारची असल्याचे म्हटले आहे. प्रियंकाची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली. तिला १४ महिने तुरुंगात काढावे लागले. त्यामुळे सरकारने आता तिचे पुनर्वसन करावे अशी मागणी राज असरोंडकर यांनी केली आहे. या दरम्यान प्रियंकाने महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेतली. त्यांनीही प्रियंकाला मदतीचे आश्वासन दिले आहे. प्रियंकाला आता आयुष्यात उभे राहण्यासाठी खूप मोठ्या आधाराची आणि मदतीची गरज आहे. तिला ती मदत मिळेलही, पण या निमित्ताने कायद्याचा आधार घेत एखाद्याला अद्दल घडवण्यासाठी पोलीस यंत्रणा कोणत्या थरापर्यंत जाऊ शकते ते दाखवणारी ही घटना आहे.
मुळात प्रियंका अर्थात झोमॅटो गर्लच्या या प्रकरणामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर त्या व्यक्तीला शिक्षा देण्याचा अधिकार न्यायालयाला आहे. पोलिसांना शिविगाळ करणारी एक झोमॅटो गर्ल त्या व्हिडिओमध्ये दिसते. हा व्हिडिओ पोलिसांनी शूट केला होता. दरोड्याचे कलम तिच्यावर का लावण्यात आले हा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑगस्ट २०१९ मध्ये अटक झाल्यानंतर तिला सत्र न्यायालयाने सप्टेंबर २०१९मध्ये जामीन मंजूर केला. पण तिला जामीनदार राहणाऱ्या दोन व्यक्तींची गरज होती. पण तिचे कौटुंबिक प्रश्न असल्याने एकाकी होती. त्यामुळे तिला जामीन देणारे कुणीच नसल्याने ती वर्षभर बाहेर येऊ शकली नाही. अखेर तिच्यासाठी लढणाऱ्या वकिलांनी कोर्टाला विनंती करुन सॉल्व्हन्सीची अट रद्द करण्याची विनंती केली. पण कोर्टाने ती विनंती फेटाळण्यात आली. अखेर प्रयास संस्थेने तिच्या जामीनासाठी प्रयत्न सुरू केले आणि यातून तिची जामिनावर सुटका झाली.
रोख रकमेच्या जामिनासाठी २५ हजार रुपये लागणार होते. अखेर प्रयास संघटना आणि कायद्याने वागा लोक चळवळीने ते पैसे उभे केले. यानंतर मात्र कोर्टानं आरोपपत्र वाशी न्यायालयातून ठाण्याच्या सत्र न्यायालयात आलेच नाहीये, असे सांगितले. जानेवारीमध्ये आरोपपत्र दाखल झाले होते. पण ते ठाणे सत्र न्यायालयात पोहोचले नव्हते. वाशी कोर्टातून ठाणे सत्र न्यायालयापर्यंत आरोपपत्र येण्यास एवढे महिने का लागले असा सवालही कायद्याने वागा लोक चळवळीचे राज असरोंडकर यांनी विचारला आहे.
त्यामुळे पोलिसांची या प्रकरणातील भूमिका संशयास्पद असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. तसंच वाहतूक पोलीस जेव्हा कारवाई करतात, लोकांच्या गाड्या उचलतात याबद्दल मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करुन ही कारवाई केली जात असल्याचा आरोप राज असरोंडकर यांनी केला आहे. या सगळ्यावरुन आपल्य़ा व्यवस्थेमध्ये बदल होण्याची किती गरज आहे हेच सिद्ध होते आहे.