संपूर्ण महाराष्ट्राचे स्फुर्ती स्थान असलेल्या किल्ले रायगड हे तमाम मराठी माणसांचे श्रद्धास्थानही आहे. याच किल्ले रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालविताना छत्रपती शिवाजी महाराजांचा कडक शिरस्ता होता. सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर गडावर कोणालाही प्रवेश मिळत नसे. अगदी दस्तुरखुद्द राजांच्या कुटुंबालादेखील हा शिरस्ता लागू होता. मात्र, आजकाल त्याच रायगडाची अवहेलना आणि कुचेष्टा होऊ लागली आहे.
कोरोना काळात किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद असतानाही काही तरुणांनी जबरदस्ती महादरवाजा उघडून गडावर प्रवेश केला. तसेच त्यांना अटकाव करणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या कर्मचा-यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी महाड पोलिसांनी दंडात्मक कारवाई करून सोडून दिले.
कोरोना काळात राज्यातील सर्व पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. यात रायगडाचाही समावेश आहे. मात्र, शिवराज्याभिषेक दिनाच्या दुसऱ्याच दिवशी काही उद्धट तरुणांनी महाराजांचा हा शिरस्ता तोडून चक्क पाइपने महादरवाजाच्या भिंतीवर चढून व जबरदस्तीने हे द्वार उघडून किल्ल्यात प्रवेश केला.
या वेळी त्यांनी अटकाव करणाऱ्या पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीही केली. असाच प्रकार काही वर्षांपूर्वी महादरवाजा येथे घडून मोठी दुर्घटना झाली होती. मात्र, ताज्या प्रकरणी महाड तालुका पोलिसांनी या ३१ तरुणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे.