अहमदनगरमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून व्हिडीओ व्हायरल करत तरुणाची आत्महत्या
अहमदनगर : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून प्रतीक बाळासाहेब काळे या 27 वर्षीय तरुणाने नगर-औरंगाबाद रोडवर झाडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर येथून समोर आली आहे.
आत्महत्येपूर्वी प्रतीक काळे याने बनवलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या महाविद्यालयात तो नोकरीला होता तेथील वरिष्ठ देशमुख यांचे नाव घेत प्रतीकने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. जिल्ह्यात एक मोठे नाव असलेल्या राजकीय नेत्याचा पर्सनल सेक्रेटरी म्हणूनही त्याने यापूर्वी काम केल्याची चर्चा आहे.या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अहमदनगर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या अंगझडतीत तो काम करत असलेल्या संस्थेचे ओळखपत्र मिळाले आहे. या प्रकरणी मोठी चर्चा होत आहे.प्रतीक काळे हा मूळचा नेवासा तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी बनवलेल्या व्हिडिओत आपण मद्यपान केल्याचे त्याने म्हटले आहे, सोबतच आपल्या भावाला सहकार्य करा अशी विनंती तो करताना दिसत आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.