राजधानी दिल्लीच्या सिंघू सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलन आता आंतराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. याला कारण ठरलेली मूळची स्विडनची रहिवासी आणि मानवतावादी पर्यावरणवादी कार्यकर्ती नोबेल पुरस्कार नामांकन झालेली ग्रेटा थनबर्ग हीला विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बोलविण्यात आले आहे.
काल नाशिकमध्ये संविधान सन्मानार्थ सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. ग्रेटाने दिल्ली परिसरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दिला असून, भावना भडकविण्याचे कारण देत तिच्यावर दिल्ली पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल झाल्यानं सध्या वादंग माजला आहे.
ग्रेटा थनबर्गनं आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं होतं, मी आताही शेतकऱ्यांच्या बाजूने उभी आहे. त्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचं मी समर्थन करते. कोणत्याही प्रकारची तिरस्कारयुक्त भावना, धमकी अथवा मानवाधिकारांचे उल्लंघन याला बदलू शकत नाही.
रविवारी नाशिकमध्ये होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या नियोजित समित्यांबाबत चर्चा झाली. अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या तारखांच्याच दिवशी हे संमेलन घेऊन प्रस्थापितांसमोर वैचारिक आणि सांस्कृतिक लढा देणे आणि संविधानाच्या सन्मानार्थ व बाबूराव बागूल, लोकशाहीर वामनदादा कर्डक, दादासाहेब गायकवाड, अरुण काळे आदी साहित्यिकांच्या विचारांना घेऊन आमनेसामने उभे ठाकण्याचा निर्धारही या वेळी केला आहे.
येत्या रविवारी (ता. १४) विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन व विविध समित्या, ठरावांबाबत चर्चा केली जाणार आहे. एक मूठ धान्य, एक रुपया संकल्पनेवर आधारित निधी संकलनासाठी २० ते २५ मार्चदरम्यान बाबूराव बागूल यांच्या स्मृतिदिनानिमित्त सप्ताह राबविला जाणार आहे. यात त्यांच्या निवासस्थान असलेल्या विहितगाव येथून मशाल ज्योत काढून संमेलनाचे दीपप्रज्वलन त्याच मशालीने करण्याचा निर्णय झाला. बैठकीस अश्पाक कुरेशी, सदाशिव गनगे, अर्जुन बागूल, विजया दुर्धवळे, राजेंद्र जाधव, नीलेश सोनवणे, वामनदादा गायकवाड, रवींद्र पगारे, ताराचंद मोतमल, दीपाली वाघ आदी उपस्थित होते.
बैठकीस प्रा. प्रतिमा परदेशी, गणेश उन्हवणे, किशोर ढमाले, राजू देसले, नितीन रोठे-पाटील, मन्साराम पवार, प्रभाकर धात्रक, चंद्रकांत भालेराव, व्ही. टी. जाधव, सुभाष काकुस्ते आदी उपस्थित होते. या वेळी संमेलनाचे नियोजन आणि भूमिकेबाबत उपस्थितांनी मार्गदर्शन केले. सुरवातीस रमाई यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. नंतर प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रास्ताविक केले.