दारुबंदीसाठी दारु विक्री, महिलांच्या अनोख्या आंदोलनाने व्यवस्थेला चपराक
जेव्हा कोणतीही यंत्रणा तुमच्या न्याय मागण्यांकडे लक्ष देत नाही, तेव्हा आंदोलनाशिवाय पर्याय नसतो... काट्याने काटा काढावा असे म्हणतात....याचप्रमाणे दारुबंदीसाठी वारंवार विनवण्या करुनही जेव्हा यंत्रणेला जाग आली नाही तेव्हा बुलडाणा जिल्ह्यातील या महिलांनी चक्क दारुविक्री करुन व्यवस्थेला हादरा दिला आहे.;
बुलढाणा : गावात सुरू असलेल्या अवैध दारूविक्री विरोधात वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या. मात्र काहीही कारवाई होत नसल्याने संतापलेल्या महिलांनी चक्क गावातच दारू विक्रीचा बाजार मांडला. हा बाजार संध्याकाळी साडे चार वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सुरूच होता. संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ गावातील महिलांनी अचानक दारू विक्रीचा बाजार भरवला. गावात अवैध दारू विक्री वाढल्याने अनेक कुटुंबात वाद होत आहेत. सध्या शाळा बंद असल्याने लहान मुलं पूर्णवेळ घरीच असतात. त्यात घरातील व्यक्ती दारु पिऊन आली की लहान मुलांवर त्याचा परिणाम आहे, असे या महिलांचे म्हणणे आहे.
अवैध दारुमुळे गावातील अनेक लहान शाळकरी मुले सुद्धा दारूच्या व्यसनाधीन झाल्याची तक्रार अनेकदा पोलिसांकडे केली होती, असे या महिलांचे म्हणणे आहे. पण तक्रार करूनही काही फायदा होत नसल्याने या महिलांनी दारु विक्रीचा बाजार भरवून अनोखे आंदोलन केले. जोपर्यंत गावातील अवैध दारूविक्री बंद होत नाही तोपर्यंत गावातील सर्व महिला बिनधास्तपणे अशीच विक्री करणार असल्याचा पवित्रा महिलांनी घेतलाय.
चांगेफळ हे आदिवासी बहुल गाव असून या परिसरात अवैध दारू बनविण्याचे अनेक कारखाने बिनधास्तपणे सुरू असल्याचे व्हिडीओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामुळे या महिला आक्रमक झाल्या आहेत. आता यावर पोलीस आणि लोकप्रतिनिदी काय भूमिका घेतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.