महिला वृत्तनिवेदकांना चेहरा झाकण्याची सक्ती, मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून निषेध

जगभरात धार्मिक कट्टरतावादाने उच्छाद मांडला आहे. त्यातच गेल्या वर्षभरात अमेरीकी सैनिकांच्या माघारीनंतर अफगाणिस्तानने सत्ता हाती घेतली. त्यानंतर महिलांवर अनेक बंधने घालण्यात आली. तर आता थेट महिला वृत्तनिवेदकांना चेहरा झाकण्याची सक्ती करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Update: 2022-05-23 03:09 GMT

जगभरात धार्मिक कट्टरतावादाचा उन्माद सुरू आहे. त्यातच अमेरीकी सैन्याच्या माघारीनंतर अफगाणिस्तान पुन्हा एकदा कट्टरतावादी तालिबानच्या हाती सापडला आहे. तर तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर पुन्हा एकदा महिलांवर जाचक बंधने घातली आहेत. महिला वृत्तनिवेदकांना वृत्तनिवेदन करताना चेहरा झाकण्याची सक्ती करण्यात आल्याचा फतवा गुरूवारी जारी करण्यात आला. मात्र हा तालिबानी कट्टरतावादाचा भाग असल्याने या भुमिकेचा जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदवला आहे.

कट्टरतावादी तालिबानने हा आदेश जारी केल्यानंतर मोजक्या वृत्तवाहिन्यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास सुरूवात केली आहे. तर अनेक महिला वृत्तनिवेदकांनी त्यांचे चेहरे झाकले होते.

तालिबानने गुरूवारी दुरचित्रवाणीवर वृत्तनिवेदन करताना चेहरे झाकण्याचा आदेश जारी करताना हे धोरण अंतिम असून यात तडजोड केली जाणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र अशा प्रकारच्या संस्कृतीमुळे आम्हाला बळजबरीने चेहरा झाकण्यास सांगणे ही आमच्यावर जबरदस्ती आहे. त्यामुळे कार्यक्रम सादरीकरण करताना आम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, असे टोलो न्यूजच्या निवेदिका सोनिया नियाझी यांनी म्हटले आहे.

मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून निषेध

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने घेतलेल्या निर्णयामुळे महिलांच्या मानवी अधिकारांचे हनन होत आहे. त्यामुळे तालिबानी वृत्तीचा आणि सरकारचा जगभरातील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला आहे.

महिला वृत्तनिवेदकांमध्ये भीतीचे वातावरण

तालिबान सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार वागले नाही तर आमची हत्या केली जाऊ शकते, अशा प्रतिक्रीया अफगाणिस्तानातील महिला वृत्तनिवेदकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केल्या आहेत.

Tags:    

Similar News