महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर घेणार पैठण घटनेतील पीडित महिलांची भेट
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आज औरंगाबाद दौऱ्यावर असून, पैठण तालुक्यात झालेल्या दरोडा आणि सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित महिलांची त्या भेट घेणार आहे. तसेच या घटनेबाबत त्या पोलिसांकडून माहिती घेणार आहे.
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावातील एका शेत वस्तीवर सात दरोडेखोरांनी हल्ला चढवत दोन महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यभरातून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता. तर दोन दिवसांपूर्वी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार घेणाऱ्या रुपाली चाकणकर आज पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे.
रुपाली चाकणकर सकाळी 10.15 वाजता घटनास्थळी भेट देऊन,पीडितांशी चर्चा करणार असून, त्यानंतर बिडकीन पोलीस स्टेशनला भेट देणार आहे. तसेच घटना आणि तपासाबाबत पोलिसांशी चर्चा सुद्धा करणार असल्याची माहिती आहे.
कालच चाकणकर यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले होते की, महिला आयोगाकडे येणाऱ्या बहुतांश तक्रारी या पोलीस विभागाशी संबंधित असतात त्यामुळे पोलीस विभागाने या तक्रारीचे वेळेत निराकरण करावे कारण उशिराने मिळालेला न्याय हा अन्यायसारखाच असतो, त्या अनुषंगाने महिला आयोग राज्यातील निर्भया पथकांच्या कामाचा अचानक आढावा घेणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान 2 दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील जवळा येथे एका अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्यानंतर मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून अत्याचार आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या पीडित कुटुंबाला भेट देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.