अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नाचगाण्यासाठी भाग पाडणाऱ्या महिलेला अटक
अहमदनगर : नगर शहरातील केडगाव येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला नाचगाण्यासाठी भाग पाडणाऱ्या महिलेला जामखेड येथून कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे, त्या अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका केली आहे. दरम्यान संबंधित आरोपी महिलेला न्यायालयामध्ये हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे,आरोपी महिलेने केडगाव येथे राहणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून जामखेड येथील कलाकेंद्रात नाच-गाण्यासाठी नेल्याचे उघड झाले. संबंधित मुलीच्या घरच्यांनी तिचे अपहरण झाल्यानंतर तिचा बऱ्याच ठिकाणी शोध घेतला होता, पण ती मिळून आली नव्हती.
दरम्यान त्या अल्पवयीन मुलीला जामखेड येथे गेल्यावर अमानुषपणे वागणूक देण्यात येत होती, तिने आजूबाजूच्या नागरिकांशी संपर्क करून तिने आपल्या घरी दुसऱ्याच्या फोनवरून फोन केला आणि मला जामखेड येथे आणलेले आहे मला खूप त्रास दिला जात आहे माझी सुटका करा असे सांगितले.
दरम्यान या घटनेची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ जामखेड या ठिकाणी पोलिसांचे पथक पाठवले. सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे व गणेश धोत्रे,नकुल टिपरे,आदी सह पोलिस पथक जामखेड येथे संबंधित कला केंद्राच्या ठिकाणी गेले त्यांना ती अल्पवयीन मुलगी आढळून आली, पोलिसांनी तिची सुखरूप सुटका करून तिला नगर येथे आणले व नातेवाईकांच्या ताब्यात दिले. ज्या महिलेने तिचे अपहरण केले होते त्या महिलेला पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरु केला आहे.