आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन ; एमएसपी, महागाई मुद्द्यावरून अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता
नवी दिल्ली // आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन (Winter session) सुरु होत असून पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपुर्वीच तीनही वादग्रस्त कृषी कायदे (Three Farm Laws) मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर कॅबिनेटनेही त्याला मंजुरी दिली. पण प्रत्यक्षात तीनही कायदे रद्द करणारं विधेयक आजच अधिवेशनात मांडलं जाईल आणि त्यानंतर इतर प्रक्रिया पार पडेल. विरोधी पक्षही फक्त तीन वादग्रस्त कृषी कायदेच नाही तर एमएसपीचा मुद्दा, महागाई अशा मुद्यावरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. मोदी सरकारविरोधात पहिल्या दिवसापासून विरोधी पक्ष आक्रमक होण्याची चिन्हं आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला तीन कृषी कायदे रद्द करण्याचं दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली जाणार आहे. पण विरोधी पक्षाच्या अजेंड्यावर आता मिनिमम सपोर्ट प्राईस आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींवरही आवाज उठवण्याची घोषणा केली आहे. पण अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांमध्येच फूट पडल्याचही पहायला मिळालं. त्यामुळेच मोदी सरकारविरोधात विरोधकांचा आवाज किती एकजुटपणे उठेल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे.
दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्या बैठकीतही याच मुद्यांवरून गरमागरमी पहायला मिळाली. आपच्या संजय सिंग यांनी ही बैठक अर्ध्यावर सोडली. तर टीएमसीचा प्रतिनिधी ह्या बैठकीत आलेच नाही.