तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार? मनसेचा आदित्य ठाकरेंना सवाल

मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वार पलटवार सुरू आहेत. त्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला होता. त्यावर मनसेने पलटवार केला आहे.;

Update: 2022-04-15 04:58 GMT

राज ठाकरे (Raj Thackeray Speech) यांनी ठाण्याच्या सभेत आपण भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले. राज्य सरकारने 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर त्यानंतर मनसे मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यावर आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला होता. त्यावर मनसेने खोचक टीका केली आहे. (Aditya Thackeray Criticize to Raj Thackeray on Speaker)

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande tweet) यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना म्हटले की, महागाईवर आम्हीच बोलायचं, पेट्रोल दरवाढीवर पण आम्हीच बोलायचं, कोरोना काळात जेव्हा तुम्ही लपून बसला होता, तेव्हा लोकांच्या समस्या राज ठाकरेंनी सोडवायच्या. मग तुम्ही काय फक्त प्रॉपर्ट्या गोळा करणार आणि टेंडरमधलं कमिशन खाणार? असा सवाल संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांना विचारला.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?(Aditya Thackeray on Raj Thackeray)

राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या भुमिकेबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, मला या विषयावर फार टिपण्णी करायची नाही. पण मनसेने भोंगे लावल्यास त्यावरून त्यांनी देशातील जनतेला महागाईबाबत माहिती द्यावी. पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इतर गोष्टींची भाववाढ का झाली? याची माहिती द्यावी. तसेच मनसेने साठ वर्षांपुर्वीचा इतिहास न उगाळता गेल्या दोन तीन वर्षात काय झालं याबाबत माहिती द्यावी, असा टोला लगावला होता. त्यावर मनसेने पलटवार करत आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असतानाच आदित्य ठाकरे विरुध्द मनसे वाद रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Tags:    

Similar News