एसटी संपावर तोडगा निघणार का? विधानपरिषद सभापतींनी सूचवला उपाय
एसटी संपाचा तिढा सूटण्याची आशा वाढली.;
गेल्या चार महिन्यांपासून राज्यातील एसटी कर्मचारी एसटीच्या विलिनीकरणासाठी संपावर आहेत. मात्र त्यावर अजूनही ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे या संपावर तोडगा काढण्यासाठी विधानपरिषद आणि विधानसभेच्या संयुक्त सदस्यांची समिती स्थापन करून तातडीने तोडगा काढावा, अशा सूचना विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना दिले.
राज्यातील एसटी कर्मचारी विलिनीकरणाची मागणीसाठी 120 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून संप करत आहेत. मात्र अजूनही या संपावर तोडगा निघाला नाही. तर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी विलिनीकरणाबाबतचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल विधानपरिषदेत सादर केला. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चार महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून सरकार तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. त्यावरुन एसटीच्या प्रश्नावर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना निर्देश देत संपावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करावी, अशी सूचना दिली.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधानपरिषद आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते, सदाभाऊ खोत, गोपिचंद पडळकर यांच्यासह दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची संयुक्त समिती स्थापन करून एसटी संपावर तोडगा काढण्याचे निर्देश विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारला दिले.त्यामुळे एसटी संप मिटण्याची शक्यता वाढली आहे.