शिवडीतील उमेदवार बदलणार का?

Update: 2024-10-19 05:41 GMT

शिवडी विधानसभा: शिवडी आणि चेंबूरमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. गुरुवारी मातोश्रीवर झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, सर्व पक्षांनी तयारी सुरु केली आहे.

अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत आणि शिवडी व चेंबूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. चेंबूरमध्ये माजी नगरसेवक अनिल पाटणकर उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. तर शिवडीमध्ये लालबागचा राजा मंडळाचे सुधीर साळवी यांचे नाव चर्चेत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाने साळवींना समन्वयक म्हणून नियुक्त केले होते.

शिवडी हा शिवसेनेचा पारंपारिक गड असून, फक्त 2009 च्या अपवादाशिवाय या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. 2009 मध्ये मनसेचे बाळा नांदगावकर यांनी दगडू सकपाळ यांचा पराभव केला होता, परंतु 2014 मध्ये अजय चौधरींनी पुन्हा भगवा फडकवला.

2024 च्या निवडणुकीसाठी मनसेने बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे, आणि त्यांचा प्रचार सुरु आहे. शिवडीमध्ये ठाकरे गटाची ताकद अद्याप कायम आहे. शिवसेना फुटल्याचा तिथल्या कार्यकर्त्यांवर फारसा परिणाम झाला नाही.

अजय चौधरींनी यापूर्वी निवडणुकांत चांगली कामगिरी केली असली तरी, लोकसभा निवडणुकीत घटलेल्या मताधिक्क्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे सुधीर साळवींच्या नावाचा विचार होऊ शकतो, हे संभाव्य बदल दर्शवित आहे.

Tags:    

Similar News