एकनाथ खडसे जाहीर करणार ऑडिओ क्लीप्स, चंद्रकांत पाटील यांना आव्हान

Update: 2021-12-26 08:39 GMT

जळगाव : आपल्यामागे ईडी लागली तर सीडी लावू असा इशारा देणाऱ्या एकनाथ खडसे यांच्या सीडी अजून बाहेर आलेल्याच नाहीत. पण आता एकनाथ खडसे यांनी ऑडिओ क्लीप्स जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. पण यावेळी हा इशारा भाजपमधल्या कुठल्या नेत्याबद्दल नाहीये. तर एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचे मुक्ताईनगरमधील आमदार चंद्रकांत पाटील यांना इशारा दिला आहे. राज्याच्या सत्तेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत. पण आता मुक्ताईनगरमध्ये खडसे विरुद्ध आमदार चंद्रकांत पाटील असा संघर्ष पेटला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांच्या ड्रायव्हरनेच एका महिलेशी अश्‍लील भाषेत संभाषण केले असून त्या ऑडिओ क्लीप्स आपल्याकडे आहेत, असा दावा खडसे यांनी केला आहे. यातील एका क्लीपमध्ये महिलेच्या नवर्‍याला ती व्यक्ती त्याच्या पत्नीला आमदारांकडे पाठविण्याचे स्पष्टपणे सांगत आहे. यामुळे आमदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खडसे यांनी केली आहे. तसेच 'मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत, त्याविरोधात आम्ही तक्रार केल्यामुळे आता पोलीस कारवाई सुरू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहे. यातूनच ते निरर्थक आरोप करत आहेत, असा दावा खडसे यांनी केला आहे.

तर आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे, यामुळे ते बेछूट आरोप करत सुटले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. हिंमत असेल तर खडसेंनी त्या ऑडिओ क्लीप्स नक्की जाहीर कराव्या आणि यात काही तथ्य आढळून आले तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ पण क्लीप खोटी असली तर खडसे राजकारण सोडणार का असे आव्हान पाटील यांनी दिले आहे.

Tags:    

Similar News