प्रियंका गांधी चमत्कार घडवणार का?

आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या निवडणूक प्रभारी प्रियंका गांधी अॅक्टीव झाल्या आहेत. 'लडकी हूँ लड सकती हूँ' चा नारा देत त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना तिकिट देणार असल्याचं जाहीर केलं.हिंदुत्व, हिंदू-दलित-मुस्लीम अशा धार्मिक मु्द्यांवर होणारी युपीची निवडणुकीसाठी महिलांमध्ये स्वाभिमान, संघर्षाची उर्जा निर्माण करण्याचा प्रियांका गांधीचा प्रयत्न चमत्कार घडवेल का? या समीकरणाचा एक्प्लेनर व्हिडीयो...;

Update: 2021-10-23 12:55 GMT


गेल्या काही दिवसांपासून प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या राजकारणात अॅक्टीव झाल्या आहेत. मग तो लखीमपूर खेरी घटनेतील शेतकऱ्यांचा मुद्दा असो की दलित समाजातील अत्याचाराचा मुद्दा असो किंवा मग हाथरस सारख्या घटनांमधील महिला अत्याचाराचा मुददा असो. प्रियंका गांधी सातत्याने योगी सरकारला प्रश्न विचारत निडरतेने भाजप सरकारशी लढत आहे. उत्तर प्रदेश पोलिस सरकारी आदेशानं त्यांना वारंवार अटक करत आहेत. अटकदम्यानही झाडू हाती घेत त्या गांधीगिरी करत आहे. प्रियंका गांधींचा 'लडकी हूँ लड सकती हूँ' चा नारा महिलांमध्ये स्वाभिमान, संघर्षाची उर्जा निर्माण करेल का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

देशाच्या राजकारणात सध्या भाजपाचा बोलबाला आहे. उत्तर प्रदेश म्हणजे काऊबेल्ट. मोदींच्या करिष्म्यावर गेली पाच वर्षे सत्तेत असतेल्या योगी आदित्यनाथ यांच्या युपीत आता निवडणूकांचा बिगूल वाजला आहे. प्रत्येक पक्ष आपले नवनवीन डावपेच आखत आहे. प्रियंका गांधी, योगी आदित्यनाथ, मायावती, अखिलेश यादव यासह सर्व छोटे मोठे पक्ष मैदानात दंड थोपटून उभे आहेत. तसं जर पाहिलं तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक म्हणजे धार्मिक जातीय समीकरणाची गोळा बेरीज.. असं चित्र सातत्याने आपण पाहत आलो आहोत. हिंदुत्व, हिंदू-दलित-मुस्लीम या मुद्द्यांच्या पलिकडे उत्तर प्रदेशची निवडणूक कधी गेली नाही. मात्र, यंदाच्या निवडणूकीत कॉंग्रेसने महिला कार्ड खेळत या सर्व मुद्द्यांना खो दिला आहे.

प्रियंका गांधींनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये ४० टक्के महिलांना तिकिट देणार असल्याचं जाहीर केलं. आणि जाती, धर्माच्या नावावर निवडणूका लढणाऱ्या राजकीय पक्षांबरोबरच मतदारांना देखील जात, धर्म आणि वर्गाच्या पलिकडे जात मतदान करण्यासाठी वेगळा पर्याय पुढे मांडला , प्रियंका गांधींच्या या आंदोलनाने किंवा पीडित कुटुंबियांची भेट घेतल्याने कॉंग्रेस पासून दुरावलेला मतदार परत येईल का? कॉंग्रेस पक्ष आत्तापर्यंत मतदार म्हणून ब्राह्मण, दलित आणि मुस्लीम समाजावर आपलं लक्ष केंद्रीत करत आला आहे. कारण उत्तर प्रदेशात ब्राह्मण – १२ टक्के, दलित-२०टक्के, मुस्लीम-१८ टक्के आहे. मात्र, कॉंग्रेसचा हा मतदार काँग्रेसपासून दुरावला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानाची टक्केवारी ६३ टक्क्यांहून अधिक होती. ती पुरुषांपेक्षा ४ टक्के जास्त होती. राज्यात महिला मतदार साडेदहा कोटींपेक्षा जास्त, म्हणजे ४६ टक्के आहेत. हे आकडे कोणत्याही पक्षाला मोहात पाडणारे आहे.

उत्तरप्रदेश विधानसभेत ४०३ पैकी ३८ महिला सदस्य आहेत. हे प्रमाण १० टक्केही नाही. त्यात काँग्रेसच्या २, भारतीय जनता पक्षाच्या ३२ तर इतरांच्या मिळून ४ महिला आमदार आहेत. तसेच मायावती यांनी उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद भूषविले असले तरी बहुजन समाज पक्षाने कधीच महिलांना पुढे आणले नाही. महिलांविषयी या राज्याचा व पक्षांचा दृष्टीकोन कळण्यास ही आकडेवारी पुरेशी ठरावी. सर्वाधिक महिला अत्याचार होणाऱ्या उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांनी 'लडकी हूँ लड सकती हूँ' चा नारा देऊन महिलांमध्ये स्वाभिमान, संघर्षाची ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यंदाच्या या निवडणुकीत कॉंग्रेसच्या महिला आणि शेतकरी कार्डने हा मतदार पुन्हा कॉंग्रेसकडे येईल का? प्रियंका गांधींचं महिला कार्ड भाजपच्या हिंदूत्वाच्या अजेंड्याला टक्कर देऊ शकेल का? सपा, बसपा च्या सामाजिक समीकरणाला प्रियंका गांधी यांच्या महिला कार्डने छेद जाईल का? कॉंग्रेसच्या या महिला कार्ड मुळे ही निवडणूक जाती, धर्म आणि वर्गाच्या वर जाऊन लढवली जाईल का? कॉंग्रेसच्या महिला उमेदवारांना तिकिट देण्याच्या धोरणामुळे राजकीय पक्षांना महिलांना उमेदवारी देणं भाग पडेल का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई म्हणाले, मला याचा फायदा काँग्रेसला होईल असं सध्या तरी वाटत नाही. मात्र, काँग्रेसच्या या निर्णयामुळे निवडणूक रणनितीबाबत बोलायला लागले आहे. काँग्रेसला किती मत मिळतील. हे सध्या सांगण कठीण असल्याचं राजदीप सरदेसाई यांनी म्हटलं आहे. काँग्रेसच्या या निर्णयामुळे भाजपने सपा बसपा आणि भाजप महिलांना तिकीट द्यावं असा दबाव नक्कीच निर्माण झाला आहे. मात्र, ते या वर्गातील लोकांना तिकीट देतील हे सांगण कठीण आहे सांगता येत नाही...

राजकीय विश्लेषक हेमंत देसाई म्हणाले, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची तेवढी ताकद नाही की ,ते भाजपाला टक्कर देऊ शकतील. सध्या काँग्रेसकडे त्यांचा मतदार नाही. पूर्वी काँग्रेसचा मतदार दलित, ओबीसी, ब्राह्मण आणि मुस्लीम होते. ब्राह्मण आणि यादव समाजातील ओबीसी मतदार भाजपाकडे शिफ्ट झाले. दलित समाजातील मतदार बसपा म्हणजेच मायावतीकडे गेल्यामुळे सध्यातरी काँग्रेसकडे त्यांचा असा मतदार वर्ग नाही. काँग्रेसकडे काही नसल्यामुळे त्यांनी महिलांना ४० टक्के उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला... तो चांगलाच आहे. या निर्णयामुळे बाकीच्या पक्षावरही महिलांना जास्तीत जास्त तिकिट देण्याचं दडपण आलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वत्र त्यांची चर्चा सुरु आहे. जसं ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक महिलांना उमेदवारी दिली होती. त्या तुलनेत भाजपने खूप कमी तिकिट महिलांना दिली होती. महिलांचा राजकारणातील टक्का वाढवण्यासाठी काँग्रेसचा हा निर्णय चांगला आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणुका कॉंग्रेसच्या महिला कार्ड मुळे जाती, धर्म आणि वर्गाच्या वर जाऊन लढवली जाईल का? असा सवाल देसाई यांना केला असता ते सांगतात की, असं काही होण्याची शक्यता नाही. त्याचबरोबर प्रियंका गांधी ज्या पद्धतीने सक्रीय झाल्या आहेत. लोकांमध्ये त्यांची चर्चा सुरु आहे. त्यांच्या भोवतालची गर्दी पाहता काँग्रेसला जनतेचा प्रतिसाद मिळतो आहे. काँग्रेस हारणार हे जरी नक्की असलं तरी जिद्द, चिकाटी काँग्रेस प्रयत्न करत आहे हे ही महत्वाचं आहे. सत्तेत येण्याची शक्यता नसल्यामुळे मुलींना स्मार्ट फोन आणि इलेक्ट्रॉनिक स्कूटी देण्याचं निर्णय हा आधुनिक तंत्रज्ञानाशी ग्रासरूटवरील लोकांना जोडण्याचा प्रयत्न चांगला आहे. असं मत हेमंत देसाई यांनी मॅक्स महाराष्ट्राशी बोलताना मांडलं.

Full View

Tags:    

Similar News