केंद्र सरकारमध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातील दोघांना मंत्रिपदं दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महाराष्ट्र सरकारमध्ये नव्यानं सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि शिवसेनेला एक अशी एकूण दोन कॅबिनेट मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीय. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या आधीच हा विस्तार केला जाणार असल्याचीही माहिती पुढे येतेय.
केंद्र सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात होण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत. यात शिवसेनेतून सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आणि मुंबईतल्या दक्षिण-मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे यांचं. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका लक्षात घेता राहुल शेवाळे यांना केंद्रात मंत्रिपद देणं गरजेचं असल्याचं शिवसेना-भाजप नेतृत्वाला वाटतं आहे. तर दुसरीकडे कामं जलदगतीनं पूर्ण करणारे खासदार म्हणूनही शेवाळे यांची ओळख आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचेच आणखी एक खासदार श्रीरंग बारणे यांचंही नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे. मात्र, बारणेंनी अजित पवारांचे पूत्र पार्थ यांच्याविरोधात लोकसभा निवडणुक लढवली होती, त्यामुळं कदाचित पवार हे बारणेंना विरोधही करू शकतात.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नव्यानं सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव सर्वात आघाडीवर आहे.
विस्ताराबरोबरच केंद्रात मंत्री असलेल्या महाराष्ट्रातील काहीजणांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. यामध्ये भिवंडीचे खासदार असलेले केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्य मंत्री नारायण राणे यांचं मंत्रिपद काढून त्यांचे आमदार पूत्र नितेश राणे यांची महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदी वर्णी लागू शकते. याशिवाय पियुष गोयल यांचंही मंत्रिपद जाण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी सांगितलं.