Aurangabad: शिवसेनेच्या आक्रोश मोर्च्याच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करणार; पोलीस आयुक्तांची माहिती
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबाद मध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मात्र या मोर्चाला परवानगी नसतानाही हा मोर्चा काढल्याने आता आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती, औरंगाबाद पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी दिली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
देशभरात वाढलेल्या महागाईचा निषेध करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या विरोधात आज शिवसेनेकडून औरंगाबादच्या क्रांती चौकातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्याला राऊत यांच्यासह शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे ,आमदार संजय शिरसाठ, आमदार अंबादास दानवे, प्रदीप जयस्वाल,उदयसिंग राजपूत,रमेश बोरणारे,शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यासह दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती.
राज्यात सध्या कोरोनाची परिस्थिती अजूनही पूर्णपणे नियंत्रणात नाही, त्यामुळे राज्य सरकारने मोर्चे, सभांना परवानगी दिली नाही.पण असं असतानाही सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासल्याच पाहायला मिळालं. याविषयी औरंगाबादचे पोलीस आयुक्त यांना विचारले असता, मोर्च्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नव्हती, त्यामुळे आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे.