राहुल यांचे टोकदार भाषण का झोंबले? सामनातून भाजपवर हल्ला

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राहुल गांधी यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. तसेच काही प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तर न देता भाजपाने राहुल गांधींवर टीका केली. त्याचा संदर्भ देत राहुल यांचे टोकदार भाषण का झोंबले? असा सवाल सामनातून मोदी भाजपवर केला आहे.;

Update: 2022-02-05 02:59 GMT

संसदेच्या अर्थसंकल्पिय भाषणात विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील मुद्द्यांवरून भाजपने त्यांना ट्रोल करत राहुल गांधी यांची खिल्ली उडवली. त्यावरून सामनाच्या अग्रलेखात राहुल गांधी यांनी संसदेत केलेले भाषण का झोंबले, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, 2014 साली देश निर्माण झाला असे ज्यांना वाटते त्यांच्यासाी राहुल गांधी यांनी डोक्याला शॉट दिला. संसदेच्या अधिवेशनात राहुल गांधी म्हणाले होते की, "माझे पणजोबा पंडित नेहरू हे देशासाठी 15 वर्षे तुरुंगात होते. माझ्या आजीने, इंदिरा गांधींनी देशासाठी 35 गोळ्या झेलल्या. माझे वडील राजीव गांधीसुध्दा देशासाठी हुतात्मा झाले. तर तुम्ही मला काय देश शिकवता?" असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला होता. तर मला माझा देश माहित आहे, असा तीर राहुल गांधी यांनी विचारला होता. यामुळे सत्ताधारी पक्ष घायाळ झाला. तसेच अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, चीनी सैन्य लडाखमध्ये का घुसले असे विचारणाऱ्यांना चीनचे एजंट ठरवणे म्हणजे राज्य करणे नव्हे. राहुल गांधी यांनी याच प्रवृत्तीवर जोरदार हल्ला केला. त्यामुळे राहुल गांधी यांचे टोकदार भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले की, कालच्या अर्थसंकल्पात गरीब लखपती बनले, मालामाल झाले. त्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या बोलण्यावर टाळ्या वाजवल्या त्यावरून टोला लगावत अग्रलेखात म्हटले आहे की, भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोदींचा जयजयकार केला. तर पंतप्रधान घर योजनेत तीन कोटी गरीबांना घरे देऊन सात वर्षात लखपती बनवल्याचा दावा केला. तर पंतप्रधानांनी गरीबांचे पैसे इस्टेटीत गुंतवले आहेत, असे म्हटले. यावरून राहुल गांधी यांनी संसदेत भाषण करत पंतप्रधानांच्या दाव्याची चिरफाड केली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, देशात दोन भारत निर्माण होत आहे. एक गरीबांचा आणि एक श्रीमंतांचा. राष्ट्रपतींनी केलेल्या भाषणात बेरोजगारीवर भाष्य नाही म्हणजे देशात बेरोजगारी नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना सांगितले की, देशात सात कोटी बेरोजगार वाढले आहेत. त्यामुळे देशातील लोक गरीबीकडे घसरत आहेत. देशातील 84 टक्के लोकांचे उत्पन्न घटले. मात्र युपीएच्या काळात 27 टक्के गरीब लोकांचे जीवनमान उंचावले होते. मात्र गेल्या 7 वर्षात 23 कोटी लोकांना गरीबीत ढकलल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. परंतू देशाचे पंतप्रधान यावेळी संसदेत उपस्थित नव्हते. विरोधकांच्या भाषणावेळी पंतप्रधानांनी उपस्थित रहावे, असे संकेत आहेत. त्यामध्ये पंडित नेहरूंपासून ते अटल बिहारी वाजपेयीपर्यंतच्या पंतप्रधानांचा संदर्भ देत पंतप्रधानांना टोला लगावला आहे. या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, पिलू मोदी हे इंदिरा गांधींच्या सरकारचे वाभाडे काढत पण भाषण संपताच इंदिरा गांधी पिलू मोदींना चिठ्ठी पाठवून त्यांच्या भाषणाचे कौतूक करत, मात्र संसदेत राहुल गांधी यांनी भाषण केल्यानंतर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी तुच्छतेने राहुल गांधींवर टीका केली आणि भाजपचे पगारी प्रवक्ते सायबर फौजेसह राहुल गांधींवर तुटून पडले, असा टोला सामनातून लगावला आहे.

देशातील शंभर लोकांकडे देशातील 30 टक्के संपत्ती आहे. हे शंभर लोक कोण? ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली त्यांच्या उद्योगामुळे देशात किती रोजगार वाढले? देशाची विमानतळ, बंदरे, कंपन्या, शेती उद्योग शंभर लोकांच्या मालकीचे आहेत. त्यामुळे विमानतळावर आता देशाचे नाही तर उद्योगपतींचे नाव दिसते. त्यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावरून भाजपने राहुल गांधींवर जोरदार टीका केली, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

बिहारमध्ये रेल्वे भरतीत लाखो बेरोजगार तरूण रस्त्यावर आले. त्यांना चोप देऊन हा प्रश्न सुटणार नाही. तुमच्याकडे काय उपाय आहेत ते सांगा. विरोधी पक्षनेत्याने प्रश्न विचारला तर सरकारने उत्तर द्यावे, विरोधकांना मुर्ख म्हणू नये. देशातील 15 हजार कोटी रुपये पेगॅसिससाठी खर्च केलेय ही उधळपट्टी म्हणजे देशद्रोह नाही का? असा सवाल सामनातून विचारला.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, सरकारच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह, असा नवा फंडा तयार होत आहे. त्यामुळे विरोधकांना संसदेत बोलू दिले जात नाही. तसेच चीन आणि पाकिस्तानला एकत्र येण्याची संधी सरकारने दिली, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. त्यावरून सामनात म्हटले आहे की, चीनने केलेले अतिक्रमण असो वा पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी यावर बोलले की चीन किंवा पाकिस्तानचे एजंट ठरवले जाते. या मुर्खपणास काय म्हणावे, असा टोला सामनातून मोदी सरकारला लगावला आहे.

सामनाच्या अग्रलेखाच्या उत्तरार्धात म्हटले आहे की, मोदी सरकारला विस्मरणाची कला आहे. त्यांना सत्य ऐकून घ्यायचे नाही. त्यांनी 2014 च्या प्रचारात दिलेली आश्वासने त्यांच्या स्मरणात नाहीत. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये, महागाई समाप्त, इन्कम टॅक्स समाप्त, पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात आणणार, दोन कोटी युवकांना रोजगार, देशातील गरीब श्रीमंतातील दरी यावर राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केले त्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या वचनाची आठवण करून दिली. तर त्यांना देशद्रोही ठरवले जाते असे सामनातून म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या भाषणाचा संदर्भ देत देशासाठी बलिदान, रक्त सांडणे, त्याग वैगेरे गोष्टींशी सध्याच्या केंद्र सरकारचा संबंध नाही. तर देशाचे चक्र दोन पाच उद्योगपतींभावतीच फिरते. सरकार म्हणजे काय? असा सवाल सामनातून विचारला आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स हेच मंत्रीमंडळाचे सदस्य आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना पुलवामा का घडडले असे विचारणारे पाकिस्तानचे एजंट ठरवले जात आहेत. तर चीनी सैन्य लडाखमध्ये घुसले आहे, त्यावर बोलणारांना चीनचे एजंट ठरवले जात आहे. मात्र राहुल गांधी यांनी याच प्रवृत्तीवर जोरदार प्रहार केला. त्यामुळे राहुल गांधी यांचे भाषण सत्ताधाऱ्यांना झोंबणारच, असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे.

Tags:    

Similar News