कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाचा २३ वा दिवस आहे. पण दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा कऱण्याचे सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश सरकारच्या किसान महासंमेलनात शेतकऱ्यांना संबोधित केले. जखम मांडीला मलम शेंडीला असाच हा प्रकार आहे. मोदींनी मध्यप्रदेशच्या शेतकऱ्यांसमोर भाषण केले पण पंजाबचे शेतकरी चर्चेच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्याशी चर्चेबाबत पंतप्रधान मोदी यांनी काहीही सांगितले नाही.
सिंघू बॉर्डरवरील शेतकऱ्यांचा विसर?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात हमीभाव कायम राहणार आहे, बाजार समित्या नष्ट होणार नाहीत असे दावे केले. राजकीय कटाला बळी पडू नका असे आवाहन केले. पण सिंघू बॉर्डरवर भर थंडीत गेल्या २३ दिवसांपासून बसलेल्या शेतकऱ्यांबाबत पंतप्रधानांनी एकही शब्द उच्चारला नाही. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या या संमेलनात त्यानी शेतकऱ्यांना संबोधित केले. विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. तसंच सरकार चर्चेसाठी तयार आहे, आपण चर्चा करा असे आवाहन केले. नेहमीप्रमाणे आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर आणि आधीच्या सरकारांवर शेतकऱ्यांच्या दूरवस्थेचे खापर फोडले.