अहमदाबादमध्ये दहशतवाद्यांनी 'सपा'चे चिन्ह 'सायकलचा' का वापर केला?, पंतप्रधान मोदींचा अजब सवाल
पाच राज्यातील निवडणूक आरोप प्रत्यारोपांसह अजब दाव्यांनी गाजल्या. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातील हरदोई येथे बोलताना दहशतवाद्यांनी वापरलेल्या सायकलचा सपच्या चिन्हाशी संबंध लावत अमहदाबाद बाँबस्फोटासाठी दहशतवाद्यांनी सपचे चिन्ह असलेल्या सायकलचा का वापर केला? असा अजब सवाल उपस्थित केला.
उत्तरप्रदेशात निवडणूक प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यातच आरोप प्रत्यारोपांनी राजकीय हवा गरम झाली आहे. उत्तरप्रदेश जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच 18 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद बाँबस्फोटातील 38 आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या बाँबस्फोटात वापरलेल्या सायकलचा संबंध समाजवादी पक्षाच्या सायकल या चिन्हाशी लावला. तर सपचे चिन्ह असलेली सायकल दहशतवाद्यांनी बाँबस्फोटासाठी वापरल्याने मी हैरान आहे, असा अजब दावा केला.
उत्तरप्रदेशातील हरदोई येथे बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना अहमदाबाद येथे बाँबस्फोट झाला होता. त्यातील दहशतवाद्यांना तीनच दिवसांपुर्वी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र मी या प्रकरणाचा संदर्भ यासाठी देत आहे, कारण दहशतवाद्यांवर काही राजकीय पक्षांनी मेहेरबानी केली होती. त्यामुळे त्या पक्षांपासून देशाच्या सुरक्षेला धोका आहे, असे म्हणत दहशतवाद्यांनी बाँबस्फोटासाठी सपचे चिन्ह असलेली सायकल वापरल्याने मी हैरान आहे, असे अजब वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले की, अहमदाबादसह देशात अनेक ठिकाणी बाँबस्फोट घडवण्यात आले. मात्र यापैकी 2013 मध्ये समाजवादी पक्षाच्या सरकारने शमीम अहमद, तारीक काझमी या आरोपीवरील खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना अहमदाबाद येथे झालेल्या बाँबस्फोटातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली. कारण त्यावेळी मी निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी लोकांना दया न दाखवण्याचा निर्णय घेतला होता आणि तो मी पुर्ण करून दाखवल्याचे तुम्ही पाहिले आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.