मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो!
मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो! डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म का सोडला? वाचा सुराज कुटे यांचा लेख Why Did BR Ambedkar Quit Hinduism and Convert to Buddhism;
14 एप्रिल 1891 हा दिवस भारताच्या इतिहासात आमूलाग्र महापरिवर्तन घडवणारा ठरला असंच म्हणता येईल. कारण याच दिवशी भारतरत्न महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अष्टपैलू व्यक्तीमत्वाचेधनी, महान विचारवंत, थोर तत्वज्ञानी, न्यायप्रेमी, मानवतावादी, बाबासाहेबांनी भारताच्या अनेक समाज उपयोगी बाबींवर लक्ष केंद्रित केलं आणि समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकला. त्यांच्या मते जाती वर्णाच्या भेदाभेदात गुरफटलेली समाज व्यवस्था कधीच प्रगती करू शकणार नाही. समतावादी दृष्टिकोन ठेवणाऱ्या या महापुरुषाने विषमतावादी अन्यायकारक जातीव्यवस्था उखडून फेकण्यासाठी संघर्ष उभा केला.
जातीवादामुळे उच्चजातीचा स्वतःला श्रेष्ठ समजणारा घटक खालच्या जातीच्या म्हणजेच बहुजन वर्गाला निसर्गाचे मूलभूत सिद्धांत जसे स्वातंत्र्य,हक्क,विचार मांडण्याच्या संधीपासून वंचित ठेवेल. जो शेकडो वर्ष वंचित ठेवत आला आहे. पण भविष्यात असं होऊ नये म्हणून अस्पृश्य आणि दलितांसाठी त्यांचा कैवारी बनून या दुर्लक्षित समाज घटकाला समाजात मोलाचं स्थान मिळवून देण्यासाठी बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला. यासाठी विश्वश्रेष्ठ बौद्धधम्माचा म्हणजेच मानवतावादी धर्माचा त्यांनी अंगीकार केला. विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धाला स्वीकारतांना बुद्धाचे तत्व आणि विचार लोककल्याणासाठी कशा प्रकारे उपयोगाचे आहे हे त्यांनी जगाला पटवलं.
बंधुत्वाची भावना अंगीकारणारा समाज सदैव शांतीपूर्वक जीवन जगेल आणि प्रगतीशील राहिल अश्या विचारसरणीचा प्रचार प्रसार बाबासाहेबांनी केला. "माणूस धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसांसाठी आहे" ह्या ठाम विश्वासाने त्यांनी भारतीय समाजाला विज्ञानवादी दृष्टीकोण आणि विवेकवादी विचार दिला. प्रत्येक मनुष्याला त्याचं स्वातंत्र्य मिळावं. उच्चवर्णियांची हुकूमशाही नसावी. समान हक्क मिळावा. स्त्री-पुरुष समानता असावी, रंगभेद, जातीभेद, धर्मभेद नसावा आणि सर्वांना न्याय सुरक्षितता लाभावी यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी केली. म्हणूनच इतिहासाच्या पानावर 'भारतीय संविधानाचे शिल्पकार' म्हणून बाबासाहेबांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरल्या गेले आहे.
ज्या धर्मा मध्ये माणसाला माणुस म्हणून जगता येत नसेल,
ज्या धर्माच्या चुलीवर विशिष्ट घटक स्वार्थाची पोळी भाजून घेत असतील,
ज्या धर्माच्या नावाखाली शोषित वंचितांची पिळवणूक आणि शोषण होत असेल,
जो धर्म मानवीहक्कांच्या सिद्धांताला विरोध करत असेल,
जो धर्म स्त्रियांना हीन लेखत असेल,
ज्या धर्मात बंधुत्वाला मान्यता नसेल,
ज्या धर्मात पारतंत्र्याची गुलामी पत्करावी लागत असेल,
अश्या धर्माला धर्म म्हणणे योग्य नाही. मुळात तो धर्मच नाही, अशी स्पष्ट विचार धारा बाबासाहेबांची होती आणि म्हणूनच बाबासाहेबांचं म्हणणं होतं की मला स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व शिकवणारा धर्म आवडतो !
- सुराज साधना सुरेश कुटे
(कल्याण)
संपर्क - 7021264578
मेल - Surajkute1@gmail.com
14 एप्रिल 2021