सुशांतसिंगच्या मृत्यूचे सत्य सीबीआय का लपवत आहे ? सचिन सावंत

महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठीच भाजपाने सुशांतसिंगच्या आत्महत्येचा वापर केला असून अँटिलीया प्रकरणातील मास्टरमाइंडला एनआयए का पकडू शकत नाही? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची चौकशी का होत नाही? असे प्रश्न आज काँग्रेसने उपस्थित केले आहेत.

Update: 2021-06-14 09:17 GMT

courtesy social media

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या दुर्दैवी मृत्यूला आज एक वर्ष लोटले. सुशांतची हत्या की आत्महत्या याचा तपास करणाऱ्या सीबीआय चौकशीला आज ३१० दिवस व एम्स पॅनेलने सुशांतच्या हत्येचा मुद्दा निकाली काढण्याला २५० दिवस झाले. परंतु आजपर्यंत सुशांतच्या बाबतीत सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत आलेली नाही. सुशांतच्या मृत्यूबाबत अंतिम निष्कर्ष सीबीआय केव्हा सांगेल ? सीबीआयने सत्य लपवून का ठेवले आहे ? अशी प्रश्नांची सरबत्ती करून सीबीआयवर दिल्लीतील राजकीय वरिष्ठांचा प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, सुशांतसिंगने आत्महत्याच केल्याचे मुंबई पोलिसांनी त्यांच्या तपासातून स्पष्ट केले होते. सुप्रीम कोर्टानेही मुंबई पोलिसांचा तपास योग्यच होता असे म्हटले आहे. असे असतानाही आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी भारतीय जनता पक्षाने सुशांतसिंगच्या आत्महत्येला राजकीय रंग देत त्याचा बिहार विधानसभा निवडणुकीत मुद्दा बनवला होता. सुशांतसिंग प्रकरणात ड्रग कनेक्शनही उघड झाले होते त्याचे धागेदोरे भाजपाच्या अत्यंत जवळच्या लोकांपर्यंत असल्याचे आम्ही पुराव्यानिशी वारंवार उघड केले परंतु सीबीआय अथवा एनसीबीने त्याचा छडा लावला नाही. भाजपाचे नेते, प्रवक्ते आणि भाजपाच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या काही फिल्मस्टार्सनीही या बदनामी मोहिमेत सहभाग घेतला होता. सुशांतच्या निधनाला एक वर्ष झाल्यानंतरही सीबीआय कोणत्याच निष्कर्षापर्यंत पोहचू शकलेली नाही. केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच सुशांतसिंग प्रकरणाचा गैरवापर भाजपाने केला.

अँटिलीया प्रकरणातही एनआयए मास्टरमाईंडपर्यंत अजून पोहचलेली नाही. अँटिलीया कट रचणारे बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेसह सर्व पोलीस अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त कार्यालयातील होते व परमबीर सिंग यांच्या थेट हाताखाली काम करत होते असे असतानाही एनआयए मास्टरमाइंडला का पकडू शकत नाही? मास्टरमाईंडला संरक्षण देण्याचा केंद्र सरकारचा त्याच्याशी काही गुप्त करार झाला आहे का? परमबीरसिंग यांची चौकशी का होत नाही? एनआयएने कोर्टामध्ये जास्त वेळ मागितला आणि अद्याप काहीच का केले नाही? जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अँटेलिया प्रकरणातील परिस्थितीजन्य पुराव्यांपेक्षा परमबीर यांच्या निराधार आरोपांना जास्त महत्त्व दिले जात आहे. मविआला बदनाम करण्यासाठी मोदी सरकार एनआयए, ईडी व सीबीआयचा वापर राजकीय शस्त्र म्हणून करत आहे. परंतु सत्य लपवता येत नाही अखेर सत्याचाच विजय होतो हे लक्षात ठेवा, असेही सावंत म्हणाले.

Full View
Tags:    

Similar News