हिंडेनबर्ग या रिसर्च संस्थेने अदानी समूहाबाबत प्रसिध्द केलेल्या रिपोर्टमध्ये धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. त्यानंतर शेअर्स बाजारात खळबळ उडाली आहे. त्यापार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणावर भाजप समर्थक अदानी समूहाच्या समर्थनार्थ उतरल्याचे पहायला मिळत आहे.
हिंडेनबर्गच्या अहवालानुसार (hindenburg research) 17 हजार 800 अब्ज मूल्याचे अदानी समुहाकडून (Adani Group) 'स्टॉक मॅनिप्युलेशन आणि अकाऊंटिंग फसवणूक' (stock manipulation adani) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढंच नाही तर हिंडेनबर्गचा अहवाल अदानी समुहातील एन्टरप्रायझेसच्या 20 हजार कोटी रुपयांच्या एफपीओ ( Follow on Public Offering) च्या आधी समोर आला आहे. त्यामुळे भारतीय शेअर्स बाजारात खळबळ उडाली आहे. मात्र दुसरीकडे अनेक भाजप समर्थकांनी अदानींना पाठींबा दिला आहे.
भारतीय गुंतवणूक संस्था आणि न्यायालयाने फेटाळलेले दावे वापरून हिंडनबर्ग संस्थेने प्रकाशित केलेला रिपोर्ट अदानी समूहाला बदनाम करण्यासाठी असल्याचे भाजप समर्थक @BjpKhushi यांनी म्हटले आहे.
बँकींग आणि अर्थव्यवस्थेवर हल्ला करून देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणता येऊ शकते. त्याप्रमाणेच हिंडनबर्गने अदानी समूहावर केलेला हल्ला हा भारतीयांवरील युध्दापेक्षा कमी नसल्याचे ट्वीट @BjpLekha यांनी केले आहे.
@AarnaBjp या ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करून म्हटले आहे की, खोट्या आरोपांच्या आधारे तुम्ही अदानींना निराश करू शकत नाहीत. हा अहवाल न्यायालयाने बंद केलेली जुनी प्रकरणे आणि अपूर्ण बातम्यांवर आधारित आहे.
हिंडेनबर्गच्या रिपोर्टनंतर शेअर बाजारात खळबळ उडाली आहे. तर अदानी समूहाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यापार्श्वभुमीवर काँग्रेसने (Congress) हिंडेनबर्ग रिपोर्टवरून अदानी समूहावर टीकास्र सोडले आहे. दुसरीकडे भाजपच्या (BJP Supporter) अनेक समर्थक ट्विटर अकाऊंटवरून अदानींचे समर्थन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. ज्या अकाऊंटवरून अदानींचे समर्थन केले आहे. त्या प्रत्येक अकाऊंटच्या प्रोफाईलला भाजपचे पक्षचिन्ह कमळ असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजप समर्थक अदानींना पाठींबा का देत आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातूनच ये रिश्ता क्या कहेलाता है? असा प्रश्न उपस्थित होत आहे.