शरद पवारांसाठी 12 डिसेंबर महत्त्वाचा का ?
"१२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. तो माझा वाढदिवस आहे म्हणून नाही तर १२ डिसेंबर हा माझ्या आईचाही जन्मदिवस आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जन्मदिनी सांगितलं.'';
HEADER: शरद पवारांसाठी 12 डिसेंबर महत्त्वाचा का ?
ANCHOR: "१२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. तो माझा वाढदिवस आहे म्हणून नाही तर १२ डिसेंबर हा माझ्या आईचाही जन्मदिवस आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जन्मदिनी सांगितलं.''
८१ या जन्मदिनी शरद पवार यांनी त्यांच्या शब्दात मांडलेल्या भावना....
आज वाढदिवसानिमित्त नेहरु सेंटरला आयोजित कार्यक्रमात सर्वांनी माझ्यावर शुभेच्छांच्या केलेल्या वर्षावाने भारावून गेलो आहे. यापूर्वी अनेकदा माझा वाढदिवस साजरा झाला. मी पन्नास वर्षांचा झालो तेव्हा नागपूरला विदर्भातील सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन वाढदिवस साजरा केला.
मी ६१ वर्षांचा झालो तेव्हा श्री. भुजबळ यांनी पुढाकार घेऊन नाशिकमध्ये स्व. अटलजींच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा केला. ७५ वर्षांचा झालो तेव्हा दिल्लीत राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राजकीय पक्षांचे अध्यक्ष आणि १५ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.
साधारण तुम्ही लक्षात घेतलं तर ५०, ६१, ७५ या तीन टप्प्यावर वाढदिवसाचे कार्यक्रम झाले. पण ८१व्या वाढदिवसाला कार्यक्रम असावा असे काही मला वाटत नव्हते. पण पक्षाने आणि अध्यक्षांनी निर्णय घेतला व तुम्ही सर्वांनी प्रेमाने कार्यक्रम आयोजित केला. त्याबद्दल मी अंतःकरणापासून आपला आभारी आहे.
देशात, महाराष्ट्रात आणखी काम करण्यासाठी तुम्ही सर्वांनी मला प्रोत्साहन दिले आहे. १२ डिसेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. तो माझा वाढदिवस आहे म्हणून नाही तर १२ डिसेंबर हा माझ्या आईचाही जन्मदिवस आहे.
योगायोग म्हणजे आमच्या कुटुंबातील दोन-तीन सदस्यांचा याच दिवशी वाढदिवस असतो. तर पाठोपाठ १३ डिसेंबरला पत्नीचाही वाढदिवस येतो.
आज खऱ्या अर्थाने काही गोष्टींच्या संदर्भातीस निकाल आपल्याला घ्यावा लागेल. पक्ष लहान असेल, मर्यादित कार्यकर्ते असतील, पण बांधिलकी असलेले कार्यकर्ते हे राष्ट्रवादीचे वैशिष्ट्य आहे. आज असंख्य प्रश्न देश आणि सामान्य लोकांसमोर आहेत.
त्याचे उत्तर शोधण्यासाठी प्रभावी नीतीने काम करणारा पक्ष आणि कार्यकर्ता कोणता? हा प्रश्न समोर आला असता लोकांनी आपल्याच पक्षाचे नाव घ्यावे अशा पद्धतीने पक्षाची बांधणी करावी लागेल.
मी महाराष्ट्रामध्ये फिरत असतो. लोकांना भेटल्यानंतर मला एक प्रकारचे मानसिक समाधान मिळते. अनेक ठिकाणी मी जातो. कधी मराठवाड्यात गेल्यानंतर औरंगाबादला संध्याकाळी उपेक्षित समाजातून पुढे आलेल्या तरुणांसोबत चर्चा करतो. त्यांना ऐकण्याची संधी मिळते.
अलीकडच्या काळामध्ये नव्या पिढीमध्ये विचार करणारे, लिहिणारे लोक फार मोठ्या प्रमाणावर तयार झाले आहेत. ते सहजपणे बोलून जातात. कालच मी एक प्रसंग सांगितला. मला आठवतंय, मी एकदा संध्याकाळी औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेजमधील तरुणांशी संवाद साधत होतो.
या महाविद्यालयात विशेषतः विदर्भातील दलित समाजाचे अनेक तरुण-तरुणी शिक्षण घेण्यासाठी येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे महाविद्यालय काढल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाबद्दल आस्था आणि आकर्षण वाटते. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत मी अनेकदा संवाद साधला.
तिथे गेल्यानंतर अनेकांचे विचार ऐकायला मिळतात. त्यांच्या मनातली अस्वस्थता कळते. अन्याय-अत्याचाराबद्दल ते काय म्हणतात याची जाणीव होते. समाजकारण जर आपण करणार असू तर त्यांच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करु शकतो, याचा विचार करता येतो.
काल मी सांगितलेली लहानशी कविता मला पूर्ण आठवत नाही. कदाचित त्या कवीचे नाव मोतीलाल राठोड असावे. मोतीलाल बंजारा समाजातील विद्यार्थी होता. मोतीलालशी संवाद साधताना त्याने लिहिलेली कविता ऐकवली. कवितेचे नाव होते 'पाथरवट'.
पाथरवट म्हणजे छिन्नी हाती घेऊन हातोडीने दगड फोडणारे पाथरवट. या कवितेचे मर्म असे होते की, ज्या व्यक्तीच्या हातांनी दगडातून मूर्ती घडवली त्याच व्यक्तीला मंदिरात येऊ दिले जात नाही. ही तुमची समाज रचना आम्हाला उद्ध्वस्त करायचीय आहे, अशी या कवितेमागची भावना होती.
अशी एखादी कविता ऐकल्यानंतर रात्री झोप येत नाही. आपण स्वतः गुन्हेगार असल्याची भावना निर्माण होते. समाजातील उपेक्षित, वंचितांवर जे अन्याय झाले ते दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची पराकाष्ठा करणे आज गरजेचे आहे. अशा कविता ऐकल्यावर जो अस्वस्थ होतो तो पक्षाचा खरा कार्यकर्ता आहे.
पंधरा दिवसांपूर्वी मी विदर्भ दौरा केला. या भागातील आदिवासी लोक अनेक संकटांना तोंड देतात. नक्षलवादाचा त्रास आहे. यातून मार्ग काढून आज तेथील तरुण पिढी शिक्षित होण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न करतेय. राजकीय विचारांबाबत त्यांच्याशी बोललो तर त्यांना राष्ट्रवादीचा विचार जवळचा वाटतो.
त्यांची एवढीच अपेक्षा आहे की, या जगात सन्मानाने जगण्याचा आमचा अधिकार आम्हाला द्या. माझे आग्रहाचे सांगणे आहे की, पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्ते तयार होतात. संधी मिळून काही लोक विधिमंडळ, लोकसभेत जातात.
पण त्यासोबत अस्वस्थ माणसाच्या सुख-दुःखात जो समरस झाला नाही तो खरा कार्यकर्ता नाही. म्हणून या घटकांशी बांधिलकी हे सूत्र मनात ठेवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आज समाजातील काही वर्गाला अद्यापही सन्मानाने जगण्याची संधी आहे, असे वाटत नाही.
तसे वाटत नसेल तर ते दुरुस्त करण्याची काळजी आपण घेतली पाहीजे. आपल्यातले अनेक लोक सामान्यांना उभे करण्यासाठी काळजी घेत असतात. त्यामुळेच राष्ट्रवादीकडे पाहण्याचा सामान्य माणसाचा दृष्टीकोन वेगळा आहे. या देशातील ५६ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. ते काळ्या आईशी इमान राखतात.
मला आठवतंय मी कृषी मंत्री म्हणून शपथ घेतली त्याच संध्याकाळी माझ्याकडे एक फाईल आली. फाईलमध्ये लिहिले होते, देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा नसल्यामुळे देशाला भुकेचा सामना करावा लागेल. त्यामुळे आपल्याला तातडीने अमेरिका, ब्राझीलमधून धान्य आयात करावे लागेल.
आपला देश शेतीप्रधान असूनही आपण दोन वेळचे अन्न देऊ शकत नाही, याचे मला आश्चर्य वाटले. मी काही फाईलवर सही केली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा फोन आला. त्यांनी मला फाईलवर सही करण्याबाबत विचारले.
पण मी त्यांना सांगितले की, ही परिस्थिती बदलण्यासाठी मी विचार करतोय. त्यांनी मला सांगितले की नक्कीच विचार करा पण पुढच्या महिन्यासाठी आपल्याला तातडीने धान्य हवे आहे, त्यासाठी आता सही करा. मी जड हाताने त्या फाईलवर सही केली. पण ती अस्वस्थता मला स्वस्थ बसू देत नव्हती.
त्यानंतरच्या काळात मी शेतकऱ्यांना उभारी दिली. त्यांच्या मालाला योग्य किंमत दिली. परिणामस्वरुप दहा वर्षांनी आपला देश हा जगाला अन्न धान्य पुरविणारा देश बनला. हे कुणी केले? तर काळ्या आईशी इमान राखणाऱ्या कर्तृत्ववान, कष्टकरी शेतकऱ्यांनी.
त्यामुळे आपल्या समाजानेसुद्धा कर्तृत्व दाखविणाऱ्यांना संधी देणे, प्रोत्साहीत करणे गरजेचे आहे. हे केलं तर समाजाचा चेहरा बदलू शकतो. आज कामगार, शेतकरी, शेतमजूर, माथाडी कामगार असेल यातल्या प्रत्येक घटकाला सन्मान दिला, प्रतिष्ठा दिली तर हा प्रत्येक घटक देशाचा चेहरा बदलू शकतो.
या सर्वांवर आधारीत राजकारण, समाजकारण करण्याची दृष्टी तुम्ही आणि मी ठेवली तर माझी पूर्ण खात्री आहे की या देशाचा चेहरामोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख मघाशी काही लोकांनी केला.
आपल्याकडे अनेक लोक डॉ. आंबेडकरांचे नाव घेतल्यानंतर सांगतात की त्यांनी घटना लिहिली. घटना लिहीली हे खरंच आहे. हा देश एकसंध ठेवण्यात घटनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. पण बाबासाहेबांची दृष्टी या घटनेच्याही पुढे होती.
आपण स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिशांच्या अंतरिम सरकारने बनविलेल्या मंत्रिमंडळात जल आणि विद्युत खात्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर होती. १९४७ च्याही दहा वर्ष आधी बाबासाहेबांनी काही निर्णय घेतले होते. स्वातंत्र्याच्या आधी भाक्रा नांगल सारखे सर्वात मोठे धरण बांधण्यात आले.
हिमालयातून येणारा थेंब न थेंब साठवला पाहीजे, ते पाणी शेतीला दिले पाहीजे तसेच धरणाच्या माध्यमातून विजेची निर्मिती केली पाहीजे, वीजेचा पुरवठा केल्याशिवाय दारिद्र्य जाणार नाही त्यासाठी राज्याराज्यामध्ये विजेचे ग्रीड निर्माण केले पाहीजे, असा विचार बाबासाहेबांनी त्या काळात केला.
आज जे प्रश्न आहेत त्याचा विचार आपण यापद्धतीने केला पाहीजे. महात्मा जोतिबा फुले हे देखील आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. महात्मा फुलेंनी त्याकाळात इंग्लंडहून आलेल्या ब्रिटिश राजाला जलसंधारण कामासाठी कैद्यांना खडी फोडण्याच्या शिक्षेऐवजी त्यात बदल करण्यास सांगितले.
पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी संकरित बियाणे देण्याची मागणी केली. तसेच दूधाचे उत्पादन वाढविण्यासाठी ब्रिटिशांनी परदेशातून वळू पाठवावेत, जेणेकरुन संकर होऊन उत्पादन वाढेल, अशीही मागणी त्यांनी केली होती. याचा अर्थ शेकडो वर्षांपूर्वी महात्मा फुले आधुनिक विचार करत होते.
आज इतकी वर्षे झाल्यानंतरही त्यांचे नाव देशातील कानाकोपऱ्यात घेतले जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, युपी आणि बिहारमध्ये महाराष्ट्रापेक्षाही जास्त डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे पुतळे आहेत. घराघरात या दोन्ही महापुरुषांचा विचार जोपासला जातो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आधुनिकता.
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचाही उल्लेख अनेकदा केला जातो. त्यांचे विचार देखील आधुनिक होते. शाहू महाराजांना भेटायला आलेल्या एका ज्योतिषाचा प्रसंग सर्वपरिचित आहे. त्या ज्योतिषालाही शाहू महाराजांनी ठामपणे सांगितले होते की, मी आधुनिकतेवर विश्वास ठेवतो, भंपकतेवर माझा विश्वास नाही.
आज समाजकारण, राजकारण बदलत आहे. यावेळी आधुनिकतेचे सूत्र नजरेसमोर ठेवून आपल्याला कार्यकर्त्यांचा संच तयार करायचा आहे. समाजाचा चेहरा कसा बदलेल, तसेच दारिद्र्य आणि इतर चुकीच्या गोष्टी घालविण्यासाठी काम करावे लागेल.
फुले, शाहू, आंबेडकर यांचे आपण नाव घेतो त्याचे कारण त्यांची विचारधारा आहे. त्यांची दृष्टी समाजाला पाच-पन्नास वर्ष पुढे नेणारी होती. त्यांच्या सूत्रावर आधारित काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, ही भावना मनात ठेवून विचार केला पाहीजे.
त्यासाठी वाचन केले पाहीजे, आपली वैचारिक बैठक मजबूत केली पाहीजे आणि त्यातून नवी पिढी तयार केली पाहीजे. हे सर्व आपण कराल, अशा अपेक्षा मी यानिमित्ताने व्यक्त करतो