यूपीएच्या घटक दलातील पक्षांची बैठक दिल्ली येथे पार पडली. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, द्रमुक नेते टीआर बाळू तसेच डावे नेते सीताराम येचूरी उपस्थित होते.
दरम्यान, या बैठकीत आगामी काळामध्ये भाजप समोर कशा पद्धतीने रणनीती आखायची यासंदर्भात चर्चा पार पडली. तसेच, "ममता बॅनर्जी आणि यूपीएचा राजकीय शत्रू जर भाजप असेल तर एकत्र लढणं योग्य आहे." अशी समजूत ममता बॅनर्जी यांची काढण्यात यावी याबद्दल चर्चा झाली. मात्र, ममता बॅनर्जी यांची समजूत कोण काढणार? याबाबत यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, 'ज्येष्ठांनी ममता बॅनर्जी यांची समजूत काढावी' असं मत व्यक्त केलं. थोडक्यात सोनिया गांधी यांचा इशारा शरद पवार यांच्याकडे असल्याचं दिसून येतं.
गेल्या काही दिवसांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये, 'काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच भाजपच्या अनेक नेत्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. त्यामुळे, एकीकडे ममता बॅनर्जी या 2024 ला विरोधी पक्षाचा चेहरा होण्यासाठी समविचारी पक्षाच्या नेत्यांना स्वपक्षात घेत आहेत. ममता यांचं स्व पक्ष विस्तारण्याचं धोरण काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच मोठं नुकसान करणारं ठरतं आहे.