डिसले गुरूजींच्या निमित्ताने....
आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून वादात अडकलेल्या रणजीत डिसले गुरूजींबाबत माध्यमांमध्ये विविध स्वरुपाच्या बातम्या येत आहेत. पण या निमित्ताने शिक्षण व्यवस्थेच्या भयाण स्थितीबद्दलही काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
रणजीत डिसले गुरूजींबद्दल राज्यातील दोन मोठ्या माध्यमांनी २ वेगवेगळ्या बातम्या दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डिसले गुरूजींनी शाळेत हजेरी न लावताच पगार तसंच इतर सुविधा घेतल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवलं, पण त्यांच्या ज्ञानाचा स्थानिक लोकांना काही फायदाच झाला नाही असं समोर आलं. डिसले गुरुजींनी नेमकी हजेरी लावली की नाही यावर महाराष्ट्रातील मोठ्या मिडीया हाऊसेसच्या दोन भिन्न बातम्या आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थी वर्गातच येत नसल्याने ज्या ध्येयासाठी आपण शिक्षक बनलो ते ध्येय पूर्ण होत नसल्याने आपल्याला दिलेला पगार परत घ्यावा यासाठी एका प्रोफेसर ने अर्ज दिलाय. विद्यापिठाने अशा पद्धतीने पगार परत घेता येत नाही म्हणून असमर्थता व्यक्त केलीय. तर डिसले गुरूजींच्या ज्ञानाचा जिल्हापरिषदेच्या विद्यार्थ्यांना काहीच उपयोग न होऊनही राज्य सरकारने त्यांना अभय देण्याचा निर्णय घेतला आहे.
डिसले गुरूजींसारखे अनेक शिक्षक वर्षांनुवर्षे शाळांचं तोंडही पाहत नाहीत. राज्यातील अनेक शाळांमधले शिक्षक हे तालुक्याच्या ठिकाणी राहतात, शिक्षक संघटनांचं काम पाहतात आणि त्या राजकारणातून सरकारवर दबाव आणतात अशा पद्धतीच्या बातम्या आपण नेहमीच ऐकल्या आहेत. एकूणच शिक्षण व्यवस्थेचं भयाण रूप आपल्याला दिसतंय. तर दुसरीकडे आई-बापांनी मर-मर मेहनत करून मुला-मुलींना शाळा-कॉलेज मध्ये पाठवायचं आणि त्या मुला-मुलींनी वर्गखोलीचं तोंडही पाहायचं नाही अशाही घटना समोर येतात. चच्चा विधायक है हमारें कल्चर सगळीकडे रूजल्यामुळे कारवाया सुरू झाल्या की सरकार कडून दबाव आणायचं काम केलं जातं. अनेक विद्यार्थीही गैरहजर राहून परीक्षेला बसू द्या म्हणून दबाव टाकतात. अशा परिस्थितीत शिक्षण व्यवस्थेतून कुठल्या प्रकारचे नागरिक निर्माण होणार आहेत हा प्रश्न निर्माण होतो. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार असं म्हटलं जातं. सध्या आसपास सुशिक्षित लोकांचं जे वर्तन दिसतंय त्याची बीजं शिक्षण व्यवस्थेच्या अशा ऱ्हासात सापडतात.