गुजरातमधील 3 हजार किलो हेरॉईन मागे नक्की कोण आहे?
एवढ्या मोठ्या कारवाईवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा गप्प का?;
अफगाणिस्तान अफूची लागवड आणि तस्करीसाठी ओळखलं जातं. मात्र, तालिबान सत्तेवर आल्यापासून त्याची सावली भारतावरही पडू लागली आहे. अलीकडेच, गुजरातच्या मुंद्रा बंदरावर पकडण्यात आलेली हेरॉईन अफगाणिस्तानातून आली असल्याचं बोललं जात आहे. सुमारे तीन हजार किलोग्रॅम असलेल्या या हेरॉइन ची किंमत सुमारे 9 हजार ते 21,000 कोटीच्या दरम्यान असल्याचं वृत्त विविध माध्यमांनी दिलं आहे.
या निमित्ताने गुजरात अंमली पदार्थांच्या तस्करीचे ठिकाण का बनत आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यातच काँग्रेसने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे स्थायी प्रमुख पद गेल्या 18 महिन्यांपासून रिक्त असल्याने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे..
'नारकोटिक्स जिहाद'
पूर्वी भाजपने केरळमध्ये 'नारकोटिक्स जिहाद'चा मुद्दा उपस्थित करत काही संघटना भारतात अंमली पदार्थ विकत आहेत आणि तरुणांना लक्ष्य करत आहेत. हा आरोप करताना एका विशिष्ट समुदायावर स्पष्टपणे निशाणा साधण्यात आला होता. या विशिष्ट समुदायाचे लोक भारताला पद्धतशीरपणे निशाणा बनवत आहेत. अशी कथा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
आता हे जप्त केलेले हेरॉईन अफगाणिस्तानातून आल्याने पुन्हा एकदा या गोष्टीला दुजोरा मिळण्याची शक्यता आहे.
नेत्यांचं म्हणणं काय ?
दरम्यान, या मुद्यावरून राजकारण सुद्धा सुरु झालं आहे आणि असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, सुशांत सिंह राजपूत च्या प्रकरणात ड्रग्स ड्रग्स ओरडणारे लोक आणि माध्यमांतील एक वर्ग आता गप्प का आहे?
शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्वीट केलं आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्या म्हणतात –
"59 ग्रॅम मारिजुआना पकडल्याबद्दल माध्यमांवरील अँकर मनाला भिडेल अशा पद्धतीने बोलले. पण आता 3,000 किलो हेरॉईन पकडल्यावर असं काहीच झालं नाही. हे जाणून आश्चर्य वाटतं. हे स्पष्ट आहे की टेलिव्हिजन चॅनल्सचा राग सरकारच्या सेवेवर अवलंबून आहे."
59 grams of marijuana found in a WhatsApp chat conversation had led to near heart seizures of TV newstainment anchors.
— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) September 21, 2021
Surprised to note that 3000kgs of heroin found has not had the same result.
Clearly these newstainment channels outrage also depends on their Sarkar ki seva.
तर, काँग्रेस प्रवक्ता पवन खेरा म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरातचे आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी गुजरात सर्वात पसंतीचा मार्ग कसा बनला?" पुढे खेरा म्हणतात "ही चिंतेची बाब आहे की अंमली पदार्थांची ही खेप नियोजित पद्धतीने सापळा रचून पकडली गेली नाही, ती डीआरआयच्या नियमित तपासणीत पकडली गेली आहे. यापूर्वी अशा 10 खेपा तरी गुजरातमधून आल्या असतील का ?
दरम्यान, काँग्रेस प्रवक्त्यांनी याची देखील आठवण करून दिली की, जानेवारी 2020 मध्ये पाच पाकिस्तान्यांना गुजरातमध्येच पकडण्यात आले होते. जे 175 कोटी रुपयांच्या ड्रग्सची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. तसेच, एप्रिल 2021 ला आठ पाकिस्तान्यांना 150 कोटी रुपयांच्या ड्रग्ससह गुजरातमध्ये, अटक करण्यात आली होती.
मुंद्रा बंदर गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाच्या नियंत्रणाखाली आहे, म्हणजेच ते या कंपनीद्वारे चालवले जाते. तसेच, अदानी समूहाने कंटेनर जप्त करण्याची पुष्टी केली आहे, परंतु देशातील कोणत्याही बंदर ऑपरेटरला कंटेनर उघडण्याचा आणि तपासण्याचा अधिकार नाही. असं अदानी समुहाचं म्हणणं आहे.
डीआरआयचे म्हणणे काय?
डायरेक्टरेट ऑफ़ रेवेन्यू इंटेलीजेन्सने (डीआरआय) दोन कंटेनर जप्त केले होते. या प्रकरणात, गुजरातमधील अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, गांधीधाम आणि मांडवी येथे शोध घेण्यात आला होता.
यासोबतच, डीआरआयच्या टीमने काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात आशी ट्रेडिंग कंपनीचे ऑपरेटर एम सुधाकर आणि त्यांची पत्नी दुर्गा वैशाली यांना चेन्नई येथून अटक करून भुज येथे आणले होते. दरम्यान, दोघांनाही सोमवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा विशेष न्यायाधीश सीएम पवार यांनी दोघांना दहा दिवसांची कोठडी सुनावली.