राहुल गांधी जिथे जातात तिथे काँग्रेसचा पराभव निश्चित, देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल
गोव्याच्या विधानसभा निवडणूकीच्या निमीत्ताने आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. त्यातच गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोवा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर युवा संवाद कार्यक्रमात काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.;
गोवा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपसह सर्वच पक्ष जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यातच गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी युवा संवाद कार्यक्रमात गोव्यातील युवकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
गोव्यात युवा संवाद कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे युवकांच्या आयुष्यात मोठा बदल होणार असल्याचे म्हटले आहे. तर यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेती प्रश्नांवर गोव्यातील युवकांना उत्तरे दिले. तर पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आधुनिक गोव्याचे निर्माते अशी ओळख असलेले मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात भाजपने गोव्याचा चेहरा बदलला. तसेच गोव्यातील पर्यटनाला जागतिक कीर्ती मिळवून देण्यासाठी भाजपने पायाभूत सुविधांच्या निर्मीतीवर लक्ष दिले. तर काँग्रेसने सत्तेवर असताना गोव्याच्या विकासासाठी जितका निधी दिला. त्यापेक्षा तीन पट निधी पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे सांगत मोदींचे कौतूक केले.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोव्यात काँग्रेस सत्तेत असताना दररोज भ्रष्टाचाराचे नवे प्रकरणे बाहेर येत होती. एकही दिवस भ्रष्टाचार बाहेर न येता जात नव्हता. तर काँग्रेसने गोव्याचे लचके तोडण्याचे काम केले. त्यामुळे काँग्रेसचा पराभव निश्चित आहे. कारण राहुल गांधी जिथे जातात तिथे काँग्रेसचा पराभव निश्चित होतो. त्यामुळे काँग्रेस हे बुडते जहाज आहे.
ममता बॅनर्जींबद्दल काय म्हणाले फडणवीस?
यंदा गोव्याच्या निवडणूकीत तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी एन्ट्री केल्याने निवडणूकीची रंगत वाढली आहे. तर ममता बॅनर्जी यांनी गोव्यासाठी जाहीरनामा प्रसिध्द केला. तर ममता बॅनर्जी यांनी गोवेकरांना आश्वासन दिलेली एकतरी गोष्ट पश्चिम बंगालमधील जनतेला दिली आहे का?, असा सवाल फडणवीस यांनी केला. तर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, गरीबी, बेरोजगारी यासह गुन्हेगारीचा दर सर्वाधिक असलेले राज्य म्हणून पश्चिम बंगालची ओळख आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींवर टीका केली तर त्याचे हात पाय तोडले जातात किंवा त्याचा खून करून लटकवलेले दिसते. त्यामुळे गोव्यातील जनतेने ममता बॅनर्जींना नाकारायचे ठरवले आहे. म्हणून गेल्या महिनाभरात ममता बॅनर्जी गोव्याकडे फिरकल्या नाहीत.
आपबद्दल काय म्हणाले फडणवीस?
आम आदमी पक्षाने गोव्यासाठी जाहीरनामा प्रसिध्द केला. त्यात गोव्यातील नागरीकांना मोफत शिक्षण, मोफत पाणी आणि चांगली आरोग्य सुविधा देण्याचे जाहीर केले. तर 18 वर्षावरील महिलांना 1 हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी आपवर निशाणा साधला.
फडणवीस म्हणाले की, आम आदमी पक्षाला दिवसातून तीन खोटं बोलल्याशिवाय जेवण पचत नाही. त्यामुळे आम आदमी पक्ष दररोज तीन खोटे बोलत असतो. तसेच केजरीवाल गोव्यातील जनतेशी खोटे बोलत आहेत. तर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, दिल्ली हे राजधानी शहर असल्याने दिल्लीच्या पोलिस यंत्रणेचा, रस्त्यांच्या विकासाचा खर्च केंद्र सरकार करते. त्यामुळे केजरीवाल यांच्याकडे शिक्षण, आरोग्य आणि वीज मोफत देण्यासाठी पैसे येतात. पण गोव्यासाठी केजरीवालांची घोषणा जुमला ठरणार आहे.
त्यामुळे भाजपकडून व्हिजन असलेला नेता मुख्यमंत्रीपदी बसणार आहे. त्यामुळे युवकांनी गोव्याच्या विकासासाठी आपल्या मतासह आपल्या परिवाराला आणि नातेवाईकांनाही भाजपला मत देण्यास सांगावे. यातूनच गोव्याचे भविष्य ठरणार आहे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.