बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा कुठं आहे माहिती आहे का?

बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा कुठं आहे माहिती आहे का? Where is first statue of dr babasaheb ambedkar;

Update: 2021-04-14 06:10 GMT


बाबासाहेबांचा देशातला पहिला पुतळा कुठं आहे माहिती आहे का? जाणून घ्या… या विशेष बातमीतून

आज देशात सर्वाधिक पुतळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आहेत. गिनीज बुकात तशी नोंद आहे. ७० वर्षापूर्वी भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा त्यांच्या हयातीत शाहू महाराजांच्या नगरीत बसवण्यात आला, ही गोष्ट फार थोड्या लोकांना ठाऊक आहे.

कोल्हापूरचे शाहूभक्त माजी आमदार दिवंगत बाबूराव धारवाडे यांनी 'जुनं कोल्हापूर' या आपल्या पुस्तकात ही माहिती दिली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्या आधीच २० ऑगस्ट २००४ रोजी लोकमत कोल्हापूर आवृत्तीच्या पहिल्या अंकात त्याबाबतची बातमीही मी दिली होती.

महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने नि कार्याने भाई माधवराव बागल चांगलेच प्रभावित झाले होते. फुले आंबेडकरांपासून तरुणांना या शाहू नगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे हा भाईजींचा ध्यास होता. यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राँझचे पुतळे करून घेतले आणि दि. ९ डिसेंबर १९५० रोजी हजारो लोकांसमोर अनावरण केले. या समारंभाचे वैशिष्टय़ म्हणजे पुतळे अनावरणसाठी कोणाही बड्या पाहुण्यास आणण्यात आले नव्हते.

भाईजी म्हणाले होते, "करवीर जनतेच्या हस्तेच हा अनावरणाचा कार्यक्रम होईल" बिंदू चौकाच्या डाव्या-उजव्या बाजूच्या लोकातून भाईजींनी दोन सामान्य माणसांना हाताला धरून नेले नि त्यांच्या हस्ते या पुतळ्यांचे अनावरण केले. खऱ्या अर्थाने जनतेच्या हस्ते होणारा असा हा समारंभ विरळा.

डॉ बाबासाहेब आंबेडकर १९५२ साली राजाराम महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनासाठी कोल्हापूरला आले होते. तेव्हा त्यांनी स्वतः हा पुतळा पहिला आहे.

(छायाचित्र सौजन्य : उदय बाबूराव धारवाडे Uday Dharwade)

Tags:    

Similar News