आपण कधी सुधारणार?

कोरोनाच्या दुसर्या लाटेने अक्षरश: महाराष्ट्र मध्ये धुमाकूळ घातला असताना आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. अजूनही लोक कोरोना नियम पायदळी तुडवत असल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनत असल्याचा निष्कर्ष काढला आहे डॉ.स्वाती आनंद यांनी..;

Update: 2021-04-15 13:53 GMT

हॉस्पिटल बाहेर रिक्षात, रुग्णवाहिकेत...अगदी मिळेल त्या खाजगी वाहनात स्वतःला ऑक्सिजन लावून किंवा अगदी तेही उपलब्ध नसल्याने तळमळत असलेले रुग्ण आपण आताशा न्यूज चैनलवर रोज पाहतो... रोज एकदा तरी कोणत्या न कोणत्या शहरातील

स्मशानभूमीत महानगरपालिकेच्या स्वच्छता दूतांनी पेटवलेल्या धडधडणार्या चिता सुन्न नजरेने आपण पाहतोय...

आपल्यात अगदी रोज उठबस करणारे नात्यातले..ओळखीतले...अन अगदी अनोळखी असलेलेही कितीतरी जिवंत चालती बोलती माणसे सहज गायब होताहेत ...फिरून कधीही न परतण्यासाठी..!!

इतकं सगळं होऊनही, कोणालाही या भयंकर परिस्थितीच गांभीर्य वाटू नये हे विशेष ..!

धडधडीत रोज शेकडो माणसांच्या चिता पेटताहेत अन काही महाभाग कोरोना वैग्रे कुछ नही ,म्हणून समाजाची दिशाभूल करताहेत...

गावाकडची जुनी माणसेही म्हणताहेत..

कोरोना शहरात..आमच्या गावात मुळीच नाही...

पण आत्ता आलेली ही दुसरी लाट गावांगावांमध्येही पसरतेय...

आरोग्य यंत्रणा..सरकारी अधिकारी ...अगदी या सर्व कामाशी निगडित अधिकारीही..हे सारे देव आहेत, की अमृत पिऊन आलेले आहेत??

प्रत्येक व्यक्तीला त्याचा जीव मौल्यवान असतो, मग त्यांनाही आहेच न, त्यांनाही त्यांच्यामुळे त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अशा जीवघेण्या आजाराची लागण होईल ही भीती नसेल का??

तरीही प्रथम श्रेणीत ही सर्व आरोग्ययंत्रणा, पोलीस प्रशासन आपल्या सेवेसाठी दिवस रात्र लढा देतेय अन...

आपण काय करताय?? तर मास्क गळ्यात अडकून रस्त्यावर पिचकाऱ्या मारताय..??

कोणी शिकवायचा प्रयत्न केलाच तर थेट त्याच्या गळ्यात हात..?

काय चालू आहे हे..??

एवढं निगरगट्ट, कसं काय वागू शकतो माणूस??

आपल्यातल्या संवेदना इतक्या बोथट झाल्यात का??की या साऱ्यातून आपण काहीच शिकलो नाही...अजून किती बळी गेल्यावर आपले डोळे उघडतील..?

याला प्रशासन जबाबदार नाही तर जबाबदार आहे आपलं बेजबाबदार वागणं!!

परवा एका गरजू पेशंट साठी नामांकित हॉस्पिटल च्या कोविड वार्ड मध्ये काम करणाऱ्या माझ्या एका डॉक्टर मित्राला फोन केला..

पेशंटची ऑक्सिजन पातळी खालावत चाललेली..

त्याला तातडीने बेड मिळणे गरजेचे होतं...

मात्र एकही बेड शिल्लक नाही...??

हॉस्पिटलमध्ये असलेल्या कितीतरी बेड वर अगदी घरी विलगिकरण केले तरी चालतील असे रुग्ण होते...

काही वजनदार लोकांचे नातेवाईक ज्यांनी आत बेड अडवून ठेवले होते ..

अन बाहेर खरी गरज असलेले रुग्ण तडफडून जीव सोडत होते.....

काही पेशंट तर ट्रेटमेंटची गरज नसतानाही, काहीतरी मेडिसिन द्याच म्हणून, तिथे जीवावर उदार होऊन काम करणाऱ्या डॉक्टर ,सिस्टर्स यांच्यावर अगदी धावून जाताहेत... आरडाओरडा करून मुद्दाम प्रशासनाला त्रास देत आहेत...

यातून होणारे डॉक्टरांना मारहाणीचे प्रमाण आजही कमी नाही...

अक्षरशः अरेरावी करणाऱ्या रुग्णांना उलट उत्तर द्यायला जायचे म्हणजे जीवांवर खेळायचे अशी अवस्था काही कोविड सेंटर मध्ये आहे..

धड काम बंद करता येत नाही...अन शांतीने करताही येत नाही...अशी परिस्थिती...त्या मित्राने मला कथन केली... मला फार वाईट वाटले.. केवढा कृतघ्न होत चालला आहे माणूस!!!

औषधांचा तुटवडा आहेच..

आरोग्यव्यवस्था कोलमडून पडली आहे... हे सर्वांनाच माहीत आहे...

त्यात कोविड सेंटर मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आणि इतर सेवा देणारे कर्मचारी यांचा काय दोष आहे?? त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सुविधा देण्याचा ते प्रयत्न करताहेत न...?

अन हो राज्यात कोविड ने मृत्यू पावलेले ,ज्यांना आपण कोरोना योध्दा म्हणून नाव,प्रमाणपत्र देऊन मोकळे झालो...त्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटूंबियांना एकदा विचारा...त्यांनी काय गमावलं...? उत्तर येईल सर्वस्व!!

डॉक्टर म्हणजे देव नाहीत...!!

काही दिवसात औषधांचा पुरवठा सुरळीत होईल ... अशी आश्वासने मिळताहेत..होईलच!!

दवाखान्यात गरज असलेल्याच रुग्णांना दाखल करून घ्यायला हवं... म्हणजे गरजू व्यक्तींना बेड मिळेल अन प्रशासनावरील अतिरिक्त भर कमी होईल...

मात्र घरी विलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांनी जबाबदारीने विशेष काळजी स्वतःची अन समाजाची घ्यायला हवी...दिलेले नियम पाळायला हवेत.

नाहीतर , असेच रुग्णालयाबाहेर खरी गरज असलेले रुग्ण तडफडून मरतील..!!

आता खरं सांगा ,याला जबाबदार कोण??

कोरोनासारख्या आजाराला हरवणं मुळीच कठीण नाही

इथं फक्त माणसाने ,माणसाशी ,माणुसकीने,जबाबदारीने वागायला हवं... !!

नाहीतर, आज चितेवर असलेले जात्यात आहेत अन

आपण सुपात... हे नक्की!!

(परवा ज्या रुग्णासाठी बेड मिळवून देण्याचा निरर्थक प्रयत्न करत होते..त्याचा आज सकाळी कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला!!)

थोडा विचार करायला हवा...कुठं चाललो आहोत आपण...काळजी घ्या घरी रहा...🙏🏻!!

©®डॉ.स्वातीआनंद

Pic: नेरळ जिल्हा रायगड येथील येथील डॉ. गिरीश गायकवाड क्लिनिक बाहेरील पेशंटच्या गाडीमध्ये लावलेले सलाईन आणि सुरू असलेली उपचार

Tags:    

Similar News