#RussiaUkraineConflict : रशिया-युक्रेन युद्धाची व्याप्ती वाढली, फ्रान्सचा गंभीर इशारा
रशिया- युक्रेन युदधाच्या तिसऱ्या दिवशी महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. रशियन फौजांनी युक्रेनमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. पण युक्रेनकडून कडवा प्रतिकार केला जात असल्याचा दावा अमेरिका आणि ब्रिटनने केला आहे. युक्रेनने दिलेल्या प्रत्युरातमध्ये रशियाचे अपेक्षेपक्षा जास्त नुकसान झाल्याचा दावा ब्रिटनने केला आहे.
आतापर्यंत १९८ जणांचा बळी
रशियाच्या सैन्याने केलेल्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये आतापर्यंत १९८ जणांचा बळी गेल्याची माहिती युक्रेनच्या अध्यक्षांनी दिली आहे. तसेच हल्ल्यांमध्ये १ हजार १५ लोक जखमी झाले आहेत. त्यापैकी ३३ लहान मुलं आहेत, अशीही माहिती युक्रेनने दिली आहे.
फ्रान्सचा रशियाला गंभीर इशारा
या दरम्यान रशियन फौजा युक्रेनची राजधानी कीवच्या ३० किलोमीटरपर्यंत पोहोचल्या आहेत. या दरम्यान आता हे युद्ध आणखी वाढणार आणि त्याची व्याप्ती देखील वाढेल असा इशारा फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी दिला आहे. "हे युद्ध लांबणार आणि त्याचे दीर्घकालीन गंभीर परिणाम होतील" असे भाकीत मॅक्रॉन यांनी वर्तवले आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या या युद्धासाठी जगाने तयार रहावे असा इशाराही त्यांनी दिला आहे. युक्रेनच्या नागरिकांच्या या संघर्षात फ्रान्स युक्रेनच्या बाजूने उभा राहील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. फ्रान्स रशियाला ठोस उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी आधीच दिला आहे. तसेच युक्रेनच्या मदतीसाठी शस्त्रास्त्र पाठवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या दरम्यान पोलंडने युक्रेनसाठी आता शस्त्रास्त्र पाठवली आहेत. पोलंडचे भारतातील राजदूत एडम बुरावोस्की यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे, की पोलंड आणि युरोपियन युनियनमधील सर्व राष्ट्रांनी आता युक्रेनला शस्त्रास्त्र पाठवण्यास सुरूवात केली आहे. तसेच युक्रेनमधील निर्वासितांना पोलंडमध्ये प्रवेश दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
रशियाला SWIFTमधून बाहेर काढण्याची अनेक राष्ट्र तयार
दरम्यान रशियाच्या आर्थिक कोंडी करण्यासाठी जर्मनी आणि हंगेरी यांनी SWIFT या आर्थिक प्रणालीमधून रशियाला बाहेर काढण्यास पाठिंबा द्यावी असे आवाहनही युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी केले आहे. युरोपातील बहुतांश सर्व राष्ट्रे ही युक्रेनसोबत आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे.
एकीकडे रशियाने युक्रेनमध्ये मोठी मुसंडी मारल्याचा दावा केला आहे. पण दुसरीकडे युक्रेनने राजधानी कीवमध्ये सैन्य उपस्थित आहे, तसेच रशियन फौजांशी आम्ही लढत आहोत, असे स्पष्ट केले आहे.
पुतीन यांचा नियोजन फसल्याचा युक्रेनचा दावा
या दरम्यान पुतीन यांचे नियोजन फसले आहे आणि युक्रनेच्या सैनिकांनी रशियन सैनिकांना पकडले असल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांनी केला आहे. कीव शहरात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इथे इंटरनेटही आता सुरळीत चालत नाहीये. झेलेन्स्की हे स्वत: ट्विटरच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत, तसेच नागरिकांनी कोणत्याही अफावांर विश्वास ठेवू नये असे आवाहन करत आहेत.